सुमेध वाघमारे
नागपूर : दिवाळीपूर्वी कमी झालेल्या कोरोनाबाधितांची संख्या आता वाढत असताना ‘सारी’चे (सिव्हिअरली अक्यूट रेस्पिरेटरी इलनेस) संकटही गडद होत चालले आहे. मेयोमध्ये जानेवारी ते आॅक्टोबर या दहा महिन्यात सारीचे १३०४ रुग्ण आढळून आले. यातील १२९ रुग्णांचा जीव गेला. सध्या या आजाराचे ३७ रुग्ण उपचाराखाली असल्याने संबंधित वॉर्ड फुल्ल झाला आहे. सारीच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे नागरिक धास्तावले आहेत.
''''सारी''''च्या रुग्णांमध्ये ''''करोना''''सारखीच लक्षणे असतात. रुग्णाला सर्दी, ताप, खोकला येतो. श्वास घ्यायलाही त्रास होतो. हे एक इन्फेक्शन आहे. ''''सारी'''' हा आजार विषाणूमुळे किंवा साथीमुळे अशा दोन्ही प्रकारचा असू शकतो. यामुळे सारीचा प्रत्येक रुग्णाला संशयीत कोरोनाबाधित म्हणूनच पाहिले जाते. फटाक्यांचे प्रदूषण व वातावरणात झालेल्या बदलांमुळे सारीचे रुग्ण वाढल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे. सारीमध्ये न्यूमोनिया, श्वसनदाह, रक्त शुद्धीकरण क्षमता कमी होणे, आदी लक्षणेही आढळतात. ''''सारी''''च्या रुग्णाला व्हेंटीलेटरवर ठेवण्याशिवाय पर्याय नसतो. कमी काळात रुग्णाची स्थिती गंभीर होतो. वयोवृद्ध व्यक्ती, बालके आणि रोगप्रतिकारक शक्ती कमी असलेल्यांमध्ये याचा फैलाव लवकर होवू शकतो. हा श्वसनासंबंधी आजार आहे.
-आॅगस्ट ते आॅक्टोबर महिन्यात सर्वाधिक नोंद
मेयोमध्ये सारीच्या सर्वाधिक रुग्णांची नोंद आॅगस्ट ते आॅक्टोबर या तीन महिन्यात झाली.
उपलब्ध माहितीनुसार, जानेवारीत ४८, फेब्रुवारीत ५४, मार्चमध्ये ५२, एप्रिलमध्ये ६३, मेमध्ये ४४, जूनमध्ये ६२, जुलैमध्ये १२०, आॅगस्टमध्ये २९४, सप्टेंबरमध्ये २९१ तर आॅक्टोबर महिन्यात २७६ सारीचे रुग्ण आढळून आले.
-सप्टेंबर महिन्यात सर्वाधिक मृत्यू
मागील दहा महिन्यात सारीसोबतच कोविड पॉझिटिव्हअसलेल्या १२९ रुग्णांचा मृत्यू एकट्या मेयो रुग्णालयात झाला आहे. सर्वाधिक मृत्यू सप्टेंबर महिन्यात झाले. ४७ मृत्यूची नोंद झाली. या शिवाय, जानेवारीत चार, फेब्रुवारीत नऊ, मार्चमध्ये पाच, एप्रिलमध्ये आठ, मेमध्ये चार, जूनमध्ये आठ, जुलैमध्ये पाच, आॅगस्टमध्ये २९, तर आॅक्टोबर महिन्यात १० रुग्णांचे मृत्यू झाले. विशेष म्हणजे, सारीची लक्षणे असलेली म्हणजे सारी संशयित १०२ रुग्णांचेही बळी गेले आहेत.
-सारीसाठी नवीन वॉर्ड
दरम्यानच्या काळत कमी झालेले सारीचे रुग्ण आता पुन्हा वाढताना दिसून येत आहे. सध्या ३७ रुग्ण असून वॉर्ड फुल्ल झाला आहे. या रुग्णांसाठी नवीन वॉर्ड तयार केला जात आहे.
-डॉ. रवी चव्हाण
वैद्यकीय अधिक्षक, मेयो