नागपूर : युग हत्याकांडाचा सूत्रधार राजेश दवारे याला विचारपूस करताना आलेल्या एका फोन कॉलने पोलिसांच्या तपासाची दिशाच बदलवून टाकली. तो फोन कॉल येताच पोलिसांनी तासाभरातच राजेशला पोपटासारखे बोलते केले. राजेश मागील महिनाभरापासून मोठा हात मारण्याच्या तयारीत होता. मित्राच्या मदतीने खासगी फायनान्स कंपनीकडून लाखो रुपये लुटण्याची योजना होती. परंतु ती अपयशी ठरल्याने युगचे अपहरण करण्याची योजना आखण्यात आली. या हत्याकाडांतील एकेक गोष्ट आता उघडकीस येऊ लागली आहे. आरोपी सूत्रधार राजेश याला ऐशोआरामात राहण्याची सवय होती. त्यामुळे कमी वेळात जास्तीत जास्त पैसा कमवण्याचे त्याचे स्वप्न होते. त्यामुळे कॉलेजचा अभ्यास करण्याऐवजी तो आपले स्वप्न पूर्ण करण्याच्या योजना आखत होता. पोलीस सूत्रानुसार राजेशने एका महिन्यापूर्वी मोठा हात मारून कोट्यवधी रुपये कमावण्याची योजना आखली होती. या योजनेत त्याने अरविंद सिंह, संदीप आणि आपल्या दोन नातेवाईक बंधूंनाही सामील केले होते. या योजनेची सुरुवात संदीपच्या ‘टीप’ने होणार होती. संदीप कामठी रोडवरील एका खासगी फायनान्स कंपनीत काम करतो. तो राजेशचा मित्र आहे. राजेशने संदीपच्या मालकाला लुटण्याची योजना आखली होती. संदीपचा मालक महिन्यात दोन वेळा मोठी रक्कम घेऊन घरी जातो. त्यांना लुटण्याची त्याची योजना होती. एक-दोनदा त्याने मालकाला लुटण्याचा प्रयत्नही केला. परंतु त्यात त्याला यश आले नाही. त्यामुळे डॉ. मुकेश चांडक यांच्या ८ वर्षाचा मुलगा युग याचे अपहरण करण्याचा निर्णय घेतला. डॉ. चांडक यांना युगसह मोठा मुलगा ध्रुव आहे. ध्रुव शांत स्वभावाचा मुलगा आहे तर युग हा चंचल स्वभावाचा होता. तो लहान असल्याने चांडक दाम्पत्याचा तो लाडका होता. त्यामुळे ध्रुव ऐवजी युगचे अपहरण करण्याचा त्याने निर्णय घेतला. मिळालेल्या माहितीनुसार राजेशने अपहरणाच्या १५ दिवसांपूर्वी अरविंद, संदीप आणि आपल्या नातेवाईक बंधूंना युगच्या अपहरणाची योजना सांगितली. काम यशस्वी झाल्यास चौघांनाही कोट्यवधी रुपये देण्याचे आमिष दाखविले. युग हा डॉ. चांडक यांचा अतिशय लाडका मुलगा असल्याने ते पोलिसात न जाता एक दोन दिवसातच पैसे देतील, याचा विश्वास दिला. तेव्हापासून ते या योजनेवर चर्चा करू लागले. राजेशने त्यांना सांगितले की, अपहरण केल्यानंतर युगला आपल्या घरातील पलंगाखाली लपवून ठेवले जाईल. ओरडू नये म्हणून त्याच्या तोंडाला पट्टी बांधली जाईल. अरविंद डॉ. चांडक यांना फोन करेल. तसेच त्याचा भाऊ अंकुशसह युगची देखभालसुद्धा करेल. पैसे घेण्यासाठी राजेशचे दोन्ही भाऊ जातील. सुरुवातीला राजेशच्या बोलण्यावर सर्वांनाच विश्वास बसला. पाच सहा दिवसानंतर ही योजना यशस्वी होणार नाही. आपण पकडले जाऊ असे संदीप व त्याच्या दोन्ही नातलग भावांना वाटू लागले. युगचे नंतर काय करणार, असा प्रश्न ते राजेशला विचारू लागले. त्यावर राजेश काही सांगत नव्हता. त्यामुळे संदीप व दोन्ही नातलग भावांनी त्याच्याशी दुरावा केला. अरविंद सुद्धा घाबरला होता. परंतु त्याला समजवण्यात राजेश यशस्वी ठरला. तसेच राजेशने या कामात त्याचा भाऊ अंकुशलाही सामील करून घेतले. घटनेच्या दिवशी १ सप्टेंबर रोजी दुपारी युगचे अपहरण केल्यानंतर राजेश अरविंदसोबत आपल्या घरी पोहोचला. त्याने घराचा दरवाज्याला बाईकच्या धडकेने खोलण्याचा प्रयत्न केला. आवाज ऐकून शेजारी राहणाऱ्या नातेवाईक महिलेची त्याच्यावर नजर गेली. त्यांनी युगबाबत विचारणा केली. तो कोण आहे, त्याला का आणले, असा प्रश्न केला. तेव्हा युगला घरी ठेवणे सुरक्षित नसल्याचे राजेशच्या लक्षात आले. त्याने त्याचा भाऊ अंकुशला महिला नातेवाईक घरी परत गेल्यावर मिस कॉल देण्यास सांगितले. भावाने आईला दिली माहिती राजेशचा भाऊ अंकुश याने आपल्या आईला फोन करून राजेशने अरविंदच्या मदतीने युगचे अपहरण केल्याचे सांगितले. राजेशची आई त्यावेळी पारडसिंगा येथे होती. अपहरणाची माहिती होताच त्याची आई नागपूरला परतली. ती आपल्या एका जवळच्या व्यक्तीला घेऊन लकडगंज पोलीस ठाण्यात पोहोचली. परंतु तेथील वातावरण पाहून ती परत आली. तिने स्कुटीला दुसऱ्या जागी लपवून ठेवले. दुसऱ्या दिवशी अरविंदला फोन करून घरी येण्यास सांगितले. परंतु त्याने नकार देताच त्याला भेटायला ती टेका नाका येथे गेली. पोलिसांनी विचारणा केली तर कोराडी मंदिंरात दर्शनासाठी गेल्याचे सांगशील असेही तिने त्याला सांगितले.
एका कॉलने बदलली तपासाची दिशा
By admin | Updated: September 8, 2014 02:17 IST