लाेकमत न्यूज नेटवर्क
रेवराल : माैदा तालुक्यातील चाचेर-खंडाळा राेडवर दुरुस्तीअभावी ठिकठिकाणी खड्डे तयार झाले आहेत. त्या खड्ड्यांमुळे वाहतूक करताना वाहनचालकांना अडचणींना सामाेरे जावे लागत असून, अपघात व वाहनांचे नुकसान हाेण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे या मार्गाची तातडीने दुरुस्ती करावी, अशी मागणी खंडाळा येथील उपसरपंच संकेत झाडे यांच्यासह नागरिकांनी केली असून, आंदाेलनाचा इशारा दिला आहे.
हा मार्ग राज्य शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारित आहे. हा या भागातील मुख्य मार्ग असल्याने त्यावर सतत रहदारी असते. वारंवार मागणी करूनही या मार्गाची वेळीच दुरुस्ती करण्यात न आल्याने हा राेड खड्डेमय झाला आहे. त्यातही चाचेर ते खंडाळा या पाच किमी अंतरात खड्ड्यांचे प्रमाण, त्यांची खाेली व आकार अधिक आहे. या राेडवरून मार्गक्रमण करताना खड्डे चुकविण्याच्या नादात किंवा अनावधानाने वाहन खड्ड्यात शिरल्यास अपघात हाेतात.
अपघातात एकीकडे वाहनचालकांना जखमी व्हावे लागत असून, दुसरीकडे खड्ड्यांमुळे त्यांना वाहनांचे नुकसानही सहन करावे लागते. हा मार्ग माैदा व नागपूरला जात असल्याने या भागातील नागरिकांना या मार्गाशिवाय प्रवासाला दुसरा राेड नाही. त्यामुळे शेतकरी, कर्मचारी, विद्यार्थी व इतर नागरिकांना याच मार्गाचा वापर करावा लागत असून, या मार्गावरून शेतमालासह अन्य साहित्याची वाहतूक करावी लागते. अपघात, वाहनांचे नुकसान व जीवितहानी टाळण्यासाठी या मार्गाची तातडीने दुरुस्ती करण्यात यावी, अशी मागणी खंडाळा व परिसरातील गावामधील नागरिकांनी केली असून, आंदाेलनाचा इशारा दिला आहे.