नागपूर : अन्नधान्याच्या उत्पादनात मोठ्या प्रमाणात रासायनिक खतांचा आणि कीटकनाशकांचा वापर वाढला आहे. त्यामुळे जमिनीचा कस कमी झाला आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या सर्वेक्षणानुसार अन्नधान्यातून मोठ्या प्रमाणात रासायनिक घटक मानवाच्या शरीरात जात असल्याने, नवनवीन आजार पसरत आहेत. याची केंद्र सरकारने गंभीर दखल घेतली असून, विषमुक्त अन्न मानवाला मिळावे म्हणून केंद्र सरकारच्या कृषी मंत्रालयाने २००४ पासून सेंद्रीय शेतीसाठी स्वतंत्र शाखा निर्माण करून, सेंद्रीय शेतीला प्रोत्साहन देत आहे. सेंद्रीय शेतीला प्रोत्साहन देणारे प्रादेशिक केंद्र नागपुरात आहे. या केंद्राकडे महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, गुजरात व गोवा या राज्याचा कार्यभार आहे. हे केंद्र सेंद्रीय शेतीचा प्रचार आणि प्रसाराचे कार्य करते. सेंद्रीय शेतीसाठी काम करणार्या स्वयंसेवी संस्था, राज्य सरकारचे कार्यालय, कृषी विद्यापीठ व विद्यार्थी, शेतकरी यांच्यासाठी प्रशिक्षण कार्यक्रम राबविते. सेंद्रीय शेतीसाठी आवश्यक असणार्या जीवाणू खतांचा समावेश फर्टिलायझर कंट्रोलर अॅक्ट १९८५ अंतर्गत झाल्याने, जीवाणू खतांची तपासणी, त्यांच्या गुणवत्तेची तपासणी नि:शुल्क करते. सेंद्रीय शेतीसाठी काम करणार्या ग्रुपला सर्टिफिकेशन करून देते. सेंद्रीय शेतीच्या प्रचार आणि प्रसाराच्या या कामाबरोबरच सेंद्रीय शेतीच्या माध्यमातून उद्योजक कसा निर्माण व्हावा, यासाठी आर्थिक सहाय्य करते. गेल्या वर्षी नागपूर केंद्राने चार राज्यात २७ प्रशिक्षण कार्यक्रम राबविले. पाच लोकांना उद्योगासाठी अर्थसाहाय्य केले आहे. केंद्र सरकारच्या सहकार्याने सेंद्रीय शेतीकडे मोठ्या प्रमाणात शेतकरी वळत असल्याचे चित्र आहे. (प्रतिनिधी)
सेंद्रीय शेतीला केंद्राचा आधार
By admin | Updated: May 11, 2014 01:28 IST