प्रभू रामचंद्रांची शोभायात्रा काढणार कशी? : गांधीसागर येथील काम अर्धवट, एकाच बाजूने सुरू आहे वाहतूक नागपूर : महापालिका निवडणुका विचारात घेता गेला पावसाळा संपताच शहरातील सर्व भागात दुसऱ्या टप्प्यातील सिमेंट रोडच्या भूमिपूजनाचा धडाका लावला होता. सुरुवातीला दिवस-रात्र या रोडची कामे सुरू होती. कामाची गती लक्षात घेता सहा महिन्यात सिमेंट रोडची कामे पूर्ण होतील, असा शहरातील नागरिकांना विश्वास होता. परंतु निवडणुका संपताच कामे ठप्प पडली. कॉटन मार्केट चौक ते गांधीसागर तलाव दरम्यानच्या रोडचे काम सुरू आहे. परंतु कामाची गती संथ असल्यामुळे श्रीरामनवमीला पोद्दारेश्वर राममंदिर येथून निघणाऱ्या शोभायात्रेला अडथळा निर्माण झाला आहे. तलावाच्या भागात एकाच बाजूने वाहतूक सुरू असल्याने या मार्गावरून शोभायात्रा जाणार कशी, असा प्रश्न रामभक्तांना पडला आहे. रामनवमीला निघणाऱ्या शोभायात्रेत नयनरम्य चित्ररथ, पथके सहभागी होतात. शोभायात्रेसोबतच चित्तथरारक असे साहसी प्रयोग सादर केले जातात. शोभायात्रा बघण्यासाठी हजारो भाविकांची गर्दी होेते. यात लहान बालकांचाही मोठ्या प्रमाणात समावेश असतो. परंतु गांधीसागर तलाव परिसरात सिमेंट रोडच्या अर्धवट कामामुळे भाविकांना शोभायात्रा बघताना अडचणींचा सामना करावा लागणार आहे. नागपूर शहरातील सिमेंट रोडवर तीन टप्प्यात ६१९ कोटींचा खर्च केला जाणार आहे. यातून १३२ सिमेंट रोडची कामे केली जात आहेत. पहिल्या टप्प्यात १०४ कोटींची क ामे हाती घेण्यात आली. यातील ८० टक्के कामे पूर्ण झाली. दुसऱ्या टप्प्यात २८० कोटींची कामे केली जाणार आहेत. निविदा काढलेल्या कामांना महापालिका निवडणुकीपूर्वी धडाक्यात सुरुवात करण्यात होती. एकाच वेळी शहराच्या विविध भागात या कामाला सुरुवात केल्याने शहराला बांधकामाचे स्वरूप आले होते. यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण झाला होता. निवडणुकीमुळे सहा महिन्यात रोडची कामे पूर्ण होतील, असे चित्र महापालिक ा प्रशासन व पदाधिकाऱ्यांनी निर्माण केले होते. निवडणूक प्रचारातही सिमेंट रोडचा मुद्दा महत्त्वाचा होता. विकास कामे होत असल्याने शहरातील नागरिकांनीही सहकार्य केले. परंतु निवडणूक संपताच शहरातील सिमेंट रोडच्या कामाची गती अचानक संथ झाली आहे. काही रोडची कामे तर ठप्पच आहेत. त्यातच शिल्लक रोडच्या निविदा काढण्याची प्रक्रिया सुरू आहे.राज्य सरकार,महापालिका व नासुप्र यांच्या निधीतून सिमेंट रोडची कामे हाती घेतली आहेत. कामाची गती विचारात घेता ती उन्हाळ्यात पूर्ण होण्याची शक्यता कमीच आहे. पावसाळ्यात सिमेंट रोडची कामे बंदच राहतात. त्यामुळे पावसाळ्यापूर्वी कामे पूर्ण न झाल्यास शहरातील नागरिकांना सलग सहा ते आठ महिने हा त्रास सहन करावा लागणार आहे. (प्रतिनिधी) तिसऱ्या टप्प्यातील कामे पुढील वर्षात दुसऱ्या टप्प्यातील रखडलेल्या सिमेंट रोडची कामे व महापालिकेच्या आर्थिक स्थितीचा विचार करता, तिसऱ्या टप्प्यातील कामांना या वर्षात सुरुवात होण्याची शक्यता कमीच आहे. डिसेंबर २०१७ नंतरच या कामांना सुरुवात होण्याची शक्यता महापालिके च्या अधिकाऱ्यांनी वर्तविली.
शोभायात्रेच्या वाटेत सिमेंट रोडचा अडसर
By admin | Updated: April 2, 2017 02:49 IST