सावनेर : दुसऱ्या टप्प्यात काेराेना संक्रमण वाढत असून, ते राेखण्यासाठी तसेच नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने लसीकरण करावे, यासाठी ग्रामपंचायत प्रशासनाच्यावतीने वाकाेडी (ता. सावनेर) येथे जनजागृती अभियान राबवण्यात आले.
यात ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी ध्वनिक्षेपणाद्वारे तसेच घराेघरी जाऊन नागरिकांना मनात भीती न बाळगता काेराेना लसीकरण करवून घेण्याचे तसेच काेराेना संक्रमण टाळण्यासाठी मास्कचा नियमित वापर करणे, विनाकारण घराबाहेर न पडणे, गर्दीत न जाणे, गर्दी करणे टाळणे, कुठेही अनावश्यक स्पर्श न करता हात साबणाने वारंवार धुणे यासह अन्य बाबींचे पालन करण्याचे आवाहन केले. यावेळी पदाधिकाऱ्यांनी नागरिकांच्या शंकांचे निरसन केले. या अभियानात पंचायत समिती उपसभापती प्रकाश पराते, सरपंच मनोहर जुनघरे, वैद्यकीय अधिकारी डॉ. महाकाळकर, उपसरपंच अरुण कुंभारे, ग्रामपंचायत सदस्य जगदीश खोरगडे, ग्रामसेवक देवेंद्र जुवारे यांच्यासह ग्रामपंचायत, आराेग्य व महसूल विभागाचे कर्मचारी सहभागी झाले हाेते.