परिवहन मंडळाची बस : मोठा अनर्थ टळलानागपूर : मोरभवनमध्ये एक प्रवासी बस पेटल्यामुळे प्रचंड खळबळ उडाली. शनिवारी दुपारी ४ च्या सुमारास ही घटना घडली. काही मिनिटांपूर्वीच बसमधून प्रवाशांसह चालक, वाहक उतरल्यामुळे आणि बस पूर्णत: रिकामी झाल्यामुळे मोठा अनर्थ टळला. चंद्रपूर डेपोची एमएच १२ / ईएफ ६९७६ क्रमांकाची बस शनिवारी दुपारी ३.४५ च्या सुमारास चंद्रपूरहून मोरभवन बसस्थानकात आली. बसमधून सर्वच्या सर्व प्रवासी उतरले. चालक डी. आर. टाकळकर आणि वाहक गौतम दमके नोंद करायला स्थानकातील नियंत्रण कक्षात गेले. अचानक बसच्या समोरच्या भागातून भडका उडाला. काही कळायच्या आतच आगीने संपूर्ण बसला कवेत घेतले. या प्रकारामुळे बसस्थानकात एकच गोंधळ निर्माण झाला. प्रवाशांची आरडाओरड, धावपळ यामुळे गोंधळात जास्तीच भर पडली. परिवहन मंडळाच्या कर्मचाऱ्यांनी पोलीस तसेच अग्निशमन दलाला कळविले. सीताबर्डी पोलीस तसेच अग्निशमन दलाचे जवान काही वेळेतच मोरभवनमध्ये पोहचले. त्यांनी १० मिनिटातच आगीवर नियंत्रण मिळवले. मात्र, तोपर्यंत बसच्या आत-बाहेरचा भाग पुरता जळाला होता. प्रवासी बसणारच होते ही बस चंद्रपूरहून आली. काही वेळेनंतर प्रवासी घेतल्यानंतर ही बस पुन्हा चंद्रपूरला जाणार होती. मोरभवनमध्ये बसमधील सर्वच्या सर्व प्रवासी उतरले. बसमध्ये पुन्हा चंद्रपूरला जाणारे प्रवासी बसवून काही वेळेतच चालक-वाहक ही बस मोरभवनमधून बाहेर काढणार होते. प्रवासी बसमध्ये बसण्याच्या तयारीतच होते. जर धावती बस पेटली असती किंवा प्रवासी बसमध्ये असते तर भयंकर दुर्घटना घडली असती. सुदैवाने रिकाम्या बसला आग लागली. डिझेल टँकपर्यंत आग पोहचण्यापूर्वी विझवण्यात आली. त्यामुळे मोठा अनर्थ टळला. वायरिंगने लागली आगइंजिनजवळचे वायरिंग जळाल्यामुळे बसला आग लागल्याचे सांगितले जाते. रखरखत्या उन्हात दूरवरून बस आल्यामुळे इंजिनसह बाजूचा भाग गरम झाला. त्याचमुळे वायरिंग जळाली अन् ही भीषण आग लागल्याचा अंदाज आहे. वाहतुक निरीक्षक दीपक तामगाडगे यांच्या माहितीवरून सीताबर्डी पोलिसांनी नोंद केली.
मोरभवनात प्रवासी बस पेटली
By admin | Updated: May 25, 2015 02:52 IST