विक्रम मॅथ्यूस : थॅलसेमिया व सिकलसेलवर राष्ट्रीय परिसंवाद लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : सिकलसेल, थॅलसेमिया या गंभीर आजारावर ‘बोन मॅरो रोपण’ हा यशस्वी उपचार आहे. संबंधित रुग्णास त्याच्याशी जुळणारा स्टेमसेल दाता उपलब्ध झाल्यास, त्याला नवे आयुष्य मिळू शकते. परंतु कोवळ्या वयात म्हणजे सात वर्षाच्या आत हे प्रत्यारोपण केल्यास याचा यशाचा दर ९० ते ९५ टक्के असतो. यामुळे पालकांनी याला गंभीरतेने घ्यायला हवे, अशी माहिती प्रसिद्ध बोन मॅरो प्रत्यारोपण तज्ज्ञ डॉ. विक्रम मॅथ्यूस यांनी येथे दिली. थॅलसेमिया व सिकलसेल सेंटर व इंडियन मेडिकल असोसिएशन (आयएमए) नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने रविवारी एका हॉटेलमध्ये थॅलसेमिया व सिकलसेलवर राष्ट्रीय परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते मुख्य वक्ता म्हणून बोलत होते. परिसंवादाच्या उद्घाटनप्रसंगी खा. डॉ. विकास महात्मे, आ. डॉ. मिलिंद माने, थॅलसेमिया व सिकलसेल सेंटरचे संचालक डॉ. विंकी रुघवानी, ‘आयएमए’चे सचिव डॉ. प्रशांत राठी, बालरोग तज्ज्ञ डॉ. दीप्ती जैन व डॉ. हरीश वरभे उपस्थित होते. डॉ. मॅथ्यूस म्हणाले, थॅलसेमियाच्या रुग्णाला दर महिन्याला नवे रक्त द्यावे लागते. त्यामुळे शरीरातील लोहाचे प्रमाण वाढते. ते नियंत्रित करण्यासाठी औषधे घ्यावी लागतात. या आजारावर कायमचा पर्याय म्हणून बोन मॅरोचे रोपण आहे. परंतु तंतोतंत जुळणारा बोन मॅरो मिळणे अवघड असते म्हणून स्वत:हून बोन मॅरो दाते सामोर येणे आवश्यक झाले आहे. अलीकडच्या काळात असाध्य रोगांपासून मुक्ती मिळवण्यासाठी ‘स्टेम सेल’ थेरपी महत्त्वाची मानली जाते. परंतु अद्यापही ही थेरपी संशोधनाच्या कक्षातच आहे. यामुळे रुग्ण व नातेवाईकांनी याच्या भूलथापांना बळी पडू नये, असेही ते म्हणाले. आ. डॉ. मिलिंद माने म्हणाले, सिकलसेल या गंभीर आजाराबाबत शासनाने अनेक निर्णय घेतले आहे. परंतु प्रशासकीय अडचणीमुळे काही निर्णय अमलात आले नाही. याचा फटका केवळ रुग्णालाच बसत नाही तर यासाठी धडपड करणाऱ्या लोकप्रतिनिधींनाही बसतो. अशावेळी रुग्ण, नातेवाईक व सामाजिक कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन त्याकडे लक्ष वेधण्याची गरज आहे. खा. डॉ. विकास महात्मे म्हणाले, सिकलसेल, थॅलसेमिया रुग्णांच्या समस्या चर्चा करून सोडविणे शक्य आहे. हे दोन्ही आजार टाळता येतात. लग्नापूर्वी रक्ताची तपासणी करून थॅलसेमिया व सिकलसेल असण्याची शक्यता पडताळून पाहिल्यास या आजाराला प्रतिबंध बसेल. असेही ते म्हणाले. प्रास्ताविक डॉ. विंकी रुघवानी यांनी केले. ते म्हणाले, गेल्या दोन वर्षात सरकारकडून थॅलसेमिया व सिकलसेलच्या रुग्णांना आवश्यक मदत मिळत आहे. विशेषत: मुख्यमंत्री सहायता निधीतून २७ रुग्णांना बोन मॅरो प्रत्यारोपणासाठी प्रत्येकी तीन लाखांची मदत मिळाली आहे. परंतु रुग्णांना मिळणाऱ्या नि:शुल्क औषधांमध्ये खंड पडणार नाही याकडेही सरकारने लक्ष देणे व मोफत बससेवा योजना सुरू करणे आवश्यक आहे. संचालन वैशाली बागडे व सोनल ठक्कर यांनी केले तर आभार डॉ. प्रशांत राठी यांनी मानले. दुसऱ्या सत्रात डॉ. वरभे, डॉ. जैन व डॉ. रुघवानी यांनी विविध विषयांवर मार्गदर्शन केले. कार्यक्रमाला सिकलसेल सोसायटी आॅफ इंडियाचे अध्यक्ष संपत रामटेके, प्रताप मोटवानी, यांच्यासह मोठ्या संख्येत सिकलसेल, थॅलसेमियाचे रुग्ण व त्यांचे पालक उपस्थित होते.
कोवळ्या वयातच बोन मॅरो रोपण आवश्यक
By admin | Updated: May 8, 2017 02:25 IST