लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : वीज बिलात सवलत देण्याच्या मुद्यावरून भारतीय जनता युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी सोमवारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचीच गाडी अडविली. वीज बिलात सूट देण्यात यावी यासाठी यावेळी निदर्शने करण्यात आली व सरकारविरोधी घोषणा देण्यात आल्या.
ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी ‘लॉकडाऊन’च्या कालावधीतील वीज बिलात सवलत देण्यात येईल, अशी घोषणा केली होती. मात्र त्याची पूर्तता झाली नाही. सरकारने आश्वासन पाळले नाही याचा विरोध भाजपाकडून मागील काही महिन्यापासून सातत्याने करण्यात येत आहे. उपमुख्यमंत्री नागपूर दौऱ्यावर आले असताना वाढीव वीज बिलमाफीची मागणी करणारे निवेदन देण्यासाठी ‘भाजयुमोे’चे कार्यकर्ते जमले होते. मात्र, ताफा समोर जाताना दिसल्याने कार्यकर्त्यांनी वाडीतील ऑर्डनन्स फॅक्टरी कॉलनीच्या प्रवेशद्वाराजवळ त्यांची गाडी अडविली. यावेळी युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी सरकारविरोधी घोषणाही दिल्या. पोलिसांनी काही कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. उपमुख्यमंत्र्यांनी आमचे निवेदन स्वीकारले नाही. त्यामुळे आम्ही त्यांच्या गाडीला अडविण्याचा प्रयत्न केला, असे ‘भाजयुमो’च्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले.