कळमेश्वर : काेराेना संक्रमणाला आळा घालण्यासाठी प्रशासनाने पुन्हा एकदा कंबर कसली आहे. वारंवार सूचना देऊनही जे नागरिक मास्क वापरत नाहीत अथवा फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन करीत नाही, त्यांना सावध हाेणे गरजेचे आहे. कारण कळमेश्वर ब्राह्मणी नगर परिषद व पाेलीस प्रशासनाने अशा नागरिकांवर दंडात्मक कारवाई करायला सुरुवात केली आहे.
कळमेश्वर ब्राह्मणी नगर प्रशासनाने पाेलिसांच्या मदतीने उपाययाेजनांचे पालन न करणाऱ्या नागरिकांवर दंडात्मक कारवाई करण्याची माेहीम सुरू केली आहे. या माेहिमेंतर्गत साेमवार (दि. २३)पासून गुरुवार (दि. २६)पर्यंत मास्क न वापरणाऱ्या नागरिकांवर दंड ठाेठावत त्यांच्याकडून एकूण ५२ हजार रुपयांचा दंड वसूल केला आहे. ही माेहीम यापुढेही राबविली जाणार आहे, अशी माहिती पालिकेच्या मुख्याधिकारी स्मिता काळे यांनी दिली.
यासाठी पालिका प्रशासनाने पाच पथके तयार केली असून, त्यात पालिका व पाेलीस कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. ही पथके शहरातील बाजार चाैक, बसस्थानक परिसर, ब्राह्मणी फाटा, एमआयडीसी चाैक, कळमेश्वर-काटाेल मार्ग, कळमेश्वर-नागपूर मार्ग, कळमेश्वर- सावनेर मार्गावर फिरत असून, मास्क न वापरणाऱ्या व गर्दीच्या ठिकाणी फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन न करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करीत आहेत, असेही स्मिता काळे यांनी स्पष्ट केले. प्रशासनाच्या या माेहिमेचे सामान्य नागरिकांनी स्वागत केले आहे.