मेहा शर्मा/लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : शहरात कोरोना संक्रमणाची दुसरी लाट उग्र रूप धारण करीत आहे. रुग्ण उपचारार्थ हॉस्पिटल्ससाठी एका स्थळावरून दुसऱ्या स्थळापर्यंत भटकत आहेत. स्थानिक प्रशासनाकडूनही हॉस्पिटल्समध्ये किती बेड्स उपलब्ध आहेत, याची योग्य माहिती पुरविली जात नाही. मनपाच्या संकेतस्थळावरही माहिती अपडेट होत नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे अनेक रुग्ण इस्पितळापर्यंत पोहोचण्याआधीच प्राण सोडत आहेत.
सर्वसामान्य नागरिकांना एका क्लिकवर शहरात बेड्सच्या उपलब्धतेसंदर्भात माहिती मिळेल, असा दावा मनपाकडून करण्यात आला होता. त्यासाठी मनपाने http://nsscdcl.org/covidbeds/AvailableHospitals.jsp संकेतस्थळ जारी केले होते. परंतु वास्तवात या संकेतस्थळावर दिली जाणारी माहिती चुकीची असल्याचे स्पष्ट होत आहे. संकेतस्थळावर दाखविल्या जाणाऱ्या बेडच्या उपलब्धतेनंतर रुग्ण संबंधित इस्पितळात पोहोचल्यावर तेथे बेड रिकामा नसल्याचे सांगितले जात आहे. लोकमतने यासंदर्भात मनपा आयुक्त राधाकृष्ण बी. यांच्याशी संवाद साधला असता, त्यांनी संबंधित इस्पितळांवरच दोषारोपण केले आहे. इस्पितळांकडूनच बेड्सच्या उपलब्धतेसंदर्भातील माहिती वेळेवर अपडेट केली जात नसल्याने, लोक गाफिल होत असल्याचे त्यांनी सांगितले. ही स्थिती बघता त्यांनी स्मार्ट सिटीच्या टीमला गुगल शीट बघून स्वत: प्रकरणांवर देखरेख ठेवण्याचे निर्देश दिले आहेत. बेड्सची तूट बघता कोरोना संक्रमणाच्या पहिल्या लाटेदरम्यान शहरात १५०० बेड्स उपलब्ध करण्यात आले होते. सद्यस्थितीत ही संख्या वाढून ५,८०० पर्यंत पोहोचली आहे. पहिल्या लाटेदरम्यान दररोज १६०० संक्रमित येत होते. दुसऱ्या लाटेत दररोज ६ ते ७ हजार संक्रमितांची प्रकरणे येत आहेत. अप्रत्यक्षरीत्या ही वाढ झाल्याने यासाठी कुणीच तयार नव्हते. त्यामुळे आता कोणत्याही स्टेडियम किंवा सभागृहात अस्थायी जम्बो हॉस्पिटल सुरू करण्याऐवजी मेडिकलमध्येच निधी खर्च करून जम्बो हॉस्पिटल सुरू करणे योग्य ठरेल, असे राधाकृष्ण बी. म्हणाले. विशेष म्हणजे, या समस्येशी सामना करण्यासाठी स्टाफ आणायचा कुठून, हा प्रमुख प्रश्न असून शहरात असलेले ४० हजार डॉक्टर्स सेवाभावी म्हणून पुढे का येत नाहीत, असा सवाल राधाकृष्ण बी. यांनी उपस्थित केला आहे.
---------------