एअर व्हाईस मार्शल चाफेकर : सारथीच्या कला-साहित्य, उद्योग-व्यापार, क्रीडा क्षेत्रातील पुरस्कारांचे वितरण नागपूर : प्रोत्साहन जीवनाचे एक अंग आहे. प्रोत्साहन म्हणून दिले जाणारे पुरस्कार हे उभरत्या प्रतिभावंतांमध्ये यश मिळविण्यासाठी उत्साह वाढवितात. सारथी संस्था हे एक चांगले व प्रशंसनीय काम करीत आहे. आपणही आपल्या जीवनात इतरांना असेच प्रोत्साहन देऊ. आज सैन्यात युवक व विशेषत: युवती उत्तम काम करीत आहेत. त्यांना सैन्याविषयी मार्गदर्शन करण्यासाठी आपण सदैव तत्पर राहू, असे मत एअर व्हाईस मार्शल एस.सी. चाफेकर यांनी व्यक्त केले. सारथी संस्थेतर्फे शनिवारी उत्तर अंबाझरी मार्गावरील कुसुमताई वानखेडे सभागृहात आयोजित सारथी पुरस्कार वितरण सोहळ्यात चाफेकर बोलत होते. यावेळी चाफेकर यांच्या हस्ते कला-साहित्य क्षेत्रासाठी लोकमतच्या नागपूर आवृत्तीचे संपादक सुरेश द्वादशीवार, अभिनेत्री प्रसिद्धी आयलवार, क्रीडा क्षेत्रासाठी क्रिकेटर फैज फजल, बुद्धिबळपटू मृदुुल डेहनकर, उद्योग-व्यापार क्षेत्रासाठी व्हीआयएचे अध्यक्ष अतुल पांडे, यशस्वी उद्योगपती हकीमुद्दीन अली यांना सारथी पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी आ. गिरीश व्यास यांना विशेष कार्यासाठी सारथी परिवार पुरस्कार व डॉ. विलास डांगरे यांना बॅरि. शेषराव वानखेडे स्मृती पुरस्कार प्रदान करण्यात आला. याप्रसंगी सारथी संस्थेचे कार्यकारी अध्यक्ष अॅड. राजेंद्र राठी, अध्यक्ष डॉ. मधुकर आपटे, संस्थापक व सचिव डॉ. अनिरुद्ध वझलवार, सहसचिव एस.जी. देशपांडे, उपाध्यक्ष प्रशांत काळे, सारथी पुरस्कार निवड समितीचे अध्यक्ष डॉ. सुरेश चांडक उपस्थित होते. यावेळी संस्थापक अमर वझलवार यांनी सरकारने नागपूर फिल्म सिटी उभारणे, मिहानसह अन्य औद्योगिक क्षेत्रात औद्योगिक गुंतवणूक वाढविण्यासाठी आवश्यक पावले उचलावी, अशी अपेक्षा व्यक्त केली. संचालन प्रभा देऊस्कर यांनी केले. अमित हेडा यांनी आभार मानले. या वेळी प्रदीप खंडेलवाल, चंदन गोस्वामी, राजेश रोकडे, हेमंत अंबासेलकर, एस.जी. चहांदे, तेजिंदरसिंह रेणु, सुहास बुधे, महेश तिवारी, गुड्डू टक्कामोरे, श्रीकांत आगलावे यांच्यासह मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते. (प्रतिनिधी) शिकण्याची लालसा कायम : द्वादशीवार सारथी पुरस्काराने सन्मानित लोकमतच्या नागपूर आवृत्तीचे संपादक सुरेश द्वादशीवार म्हणाले की, आपले वय जरूर वाढले आहे, मात्र आपल्यातील विद्यार्थ्याचे वय झालेले नाही. शिकण्याची लालसा अजूनही कायम आहे. पत्रकारितेच्या माध्यमातून मी दररोज लाखो लोकांशी संवाद साधतो. कदाचित पंतप्रधानांनाच एवढे प्रेक्षक मिळत असतील.
पुरस्कारामुळे यश मिळविण्यासाठी उत्साह वाढतो
By admin | Updated: January 15, 2017 02:30 IST