स्मिता तळवलकर यांच्या निधनाने हळहळ : नागपूरकरांनी व्यक्त केल्या शोकसंवेदना नागपूर : सुप्रसिद्ध अभिनेत्री स्मिता तळवलकर म्हणजे जरा फटकळ, मोकळेपणाने बोलणारी पण मनापासून प्रेम करणारी, आपुलकीने इतरांचा विचार करणारी आणि संवेदनशील व्यक्ती. त्यांच्या निधनाची बातमी अचानक आली आणि त्यांच्या चाहत्यांना धक्का बसला. नागपूर म्हणजे जवळपास त्यांचे दुसरे घर होते. अनेक नाटकांसाठी आणि चित्रपटांच्या प्रसिद्धीसाठी त्या नागपुरात आल्या. पण याशिवायही काही मित्रांच्या निमंत्रणाचा मान करूनही त्या नागपुरात आल्या. नागपुरात अनेकांशी त्यांचे ऋणानुबंध होते. दिग्दर्शक संजय सूरकर यांच्यामुळे त्यांचे नाते विदर्भाशी जोडले गेले आणि ते अखेरपर्यंत कायम राहिले. त्या विदर्भ साहित्य संघाने आयोजित केलेल्या राज्यस्तरीय लेखिका संमेलनासाठी नागपुरात आल्या होत्या. तीच त्यांची नागपूरची अखेरची भेट ठरली. आपल्या लाघवी स्वभावाने सर्वांना जिंकून घेणाऱ्या स्मिता तळवलकर यांच्या जाण्याने विदर्भ आणि मुंबईचा सेतूच निखळल्याची शोकसंवेदना नाट्य, साहित्य आणि कला क्षेत्रातील मान्यवरांनी व्यक्त केली आहे. स्मिता तळवलकर यांनी विदर्भातल्या अनेक कलावंतांना मुंबईत स्थिरावण्यासाठी मदत केली. यात संजय सूरकर यांनी तर या संधीचे सोने केले होते. संजय सूरकर यांच्या निधनानंतरही स्मिता तळवलकर यांचा नागपूरशी ऋणानुबंध होता. वेगवेगळ्या कार्यक्रमांच्या निमित्ताने त्या सातत्याने नागपुरात-विदर्भात आल्या. विदर्भ साहित्य संघाच्या लेखिका संमेलनासाठी त्या आल्या होत्या; पण दोन दिवसांपूर्वीच त्यांच्यावर केमोथेरपी झाली होती. यामुळे थकवा आलेला असतानाही केवळ शब्द पाळण्यासाठी त्या आल्या आणि उत्साहाने संमेलनात सहभागी झाल्या. त्यांना कॅन्सर झाला असल्याची अनेकांना माहीतही नव्हते आणि त्यांनी तसे भासविले नाही. कायम उत्साही आणि हसतमुख असणाऱ्या स्मिता तळवलकरांच्या निधनाने कला क्षेत्राला मोठा धक्का बसला. त्यांच्या निधनाची बातमी कळताच अनेकांनी हळहळ व्यक्त केली. मानधनासाठी त्या कधीच अडून बसल्या नाही. त्यांनी मानधन मागितलेही नाही. मोठ्या कलावंत असतानाही त्यांच्या मनात किंचितही त्याचा गर्व नव्हता. काही वर्षांपूर्वी प्रमोद भुसारी आणि संजय सूरकर मुंबईला कला क्षेत्रात स्थिरावण्यासाठी गेले तेव्हा त्यांनीच या दोघांनाही मदत केली. यातून संजय सूरकर दिग्दर्शक म्हणून पुढे आले. नाट्य परिषदेत प्रमोद भुसारी उपाध्यक्ष आणि त्या नियामक मंडळाच्या सदस्य होत्या. वेगवेगळ्या पॅनलमध्ये असूनही त्यांनी भुसारी यांना सातत्याने सहकार्य केले. नागपूरच्या कलावंतांना प्रोत्साहन देण्यासाठी त्या समोर असायच्या. नागपूरच्या नाट्य परिषदेबाबत त्यांचा गैरसमज झाला होता. पण त्यांना तथ्य समजावून सांगितल्यावर त्यांनी साऱ्याच बाबी मान्य केल्या. आपल्याला झालेला रोग केव्हा तरी आपला पराभव करेल; पण त्यामुळे कुणीही वाईट वाटून घेऊ नका, असे त्या स्वत:च बोलल्या होत्या. त्यांच्या निधनाचे वैदर्भीय रंगभूमीला दु:ख आहे, असे प्रमोद भुसारी म्हणाले. लेखिका संमेलनाच्या आयोजक शुभदा फडणवीस यांनी त्यांच्या अनेक आठवणींना उजाळा दिला. अल्पावधीत स्मिता तळवलकर यांच्यासारखी मोठी कलावंत मैत्रीण व्हावी, यात त्यांचेच मोठेपण आहे. कला आणि समाज यांचे नाते जपणाऱ्या संवेदनशील कलावंत त्या होत्या. त्या सतत जगण्यातला आनंद शोधत असायच्या. त्यांना लेखिका संमेलनासाठी निमंत्रण दिले तेव्हा अतिशय साधेपणाने त्या आल्या. सहजपणे वागल्या. आपण एका मोठ्या कलावंतांसोबत हे आम्हाला जाणवूही दिले नाही. त्यांची आठवण ताजी आहे. छोटे पण सुंदर आयुष्य त्या जगल्या. त्यांच्या निधनाने आनंदाचे झाडच कोसळले, अशी शोकसंवेदना शुभदातार्इंनी व्यक्त केली. संजय सूरकर यांनी नागपुरात फिल्म सोसायटीची स्थापना केली. पण चित्रपटाचे चित्रीकरण असल्याने सोसायटीच्या उद्घाटनालाच सूरकर यांना येणे शक्य होत नव्हते. त्यावेळी स्मिता यांनी सर्व जबाबदाऱ्या स्वत:वर घेतल्या आणि संजयला येथे पाठविते. सोसायटीत संस्थापकच नसला तर इतरांचा उत्साह कमी होईल, ही त्यांची भावना होती, अशी आठवण समीर नाफडे यांनी सांगितली. आयएमएच्या पदग्रहण समारंभाला त्यावेळचे संस्थेचे अध्यक्ष डॉ. अविनाश रोडे यांनी कुठलीही ओळख नसताना स्मिता तळवलकरांना बोलाविले होते. हे निमंत्रण स्वीकारून त्या सहजपणे आल्या. त्यानंतर मात्र डॉ. अविनाश रोडे आणि स्मिता तळवलकर यांच्यात मैत्री झाली. धानोऱ्याच्या विदर्भ साहित्य संमेलनाला त्यांना निमंत्रित करण्यात आले तेव्हा त्या हॉटेलमध्ये न थांबता डॉ. रोडे यांच्या घरी थांबल्या. तेथूनच धानोऱ्याला गेल्या. सातत्याने व्यस्त असूनही कधीही टाळाटाळ न करणाऱ्या स्मिताताई माणूस म्हणूनही विलक्षण होत्या. त्यांनी कधीच मोठेपणाचा आव आणला नाही. आॅर्थोपेडिक असोसिएशनच्या पदग्रहणालाही त्या साधेपणाने आल्या होत्या. त्यानंतर आम्हा डॉक्टर मंडळींशी त्यांनी मोकळेपणाने गप्पा मारल्या. त्यांच्या निधनाचे दु:ख मोठे आहे, अशी शोकसंवेदना डॉ. रोडे यांनी व्यक्त केली. दिलीप ठाणेकर मध्यवर्तीत असताना त्यांच्या पत्नीचे निधन झाले. त्यावेळी नाट्य परिषदेच्या पदाधिकारी या नात्याने ठाणेकरांच्या नागपुरातील घरी त्या सांत्वन करायला आल्या होत्या. आपल्या सहकाऱ्यांची आपुलकीने विचारपूस करणाऱ्या स्मिता तळवलकर केवळ कलावंतच नव्हे तर एक सहृदयी व्यक्ती होत्या, असे ठाणेकर यांनी सांगितले. (प्रतिनिधी)
कला क्षेत्राचा दुवा निखळला
By admin | Updated: August 7, 2014 01:01 IST