नागपूर : तळोधी (बाळापूर) येथे होणाऱ्या ६४ व्या विदर्भ साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी जेष्ठ समीक्षक व राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या मराठी विभागाचे प्रमुख डॉ.अक्षयकुमार काळे यांची निवड करण्यात आली आहे. विदर्भ साहित्य संघ व श्री गोविंदप्रभू कला-वाणिज्य महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने १२ ते १४ डिसेंबर या कालावधीत हे साहित्य संमेलन घेण्यात येणार आहे. विदर्भ साहित्य संघाच्या नुकत्याच पार पडलेल्या कार्यकारिणीच्या सभेत डॉ. काळे यांच्या नावाची एकमताने निवड करण्यात आली. आयोजन समितीचे कार्याध्यक्ष डॉ. तु. वि. गेडाम यांनी काळे यांच्या नावाला स्वीकृती दिली. शैक्षणिक क्षेत्रासोबतच डॉ. काळे यांचे साहित्य क्षेत्रात उल्लेखनीय योगदान राहिले आहे. ते मान्यताप्राप्त काव्यसमीक्षक असून अर्वाचीन मराठी कवितेची विविधांगी समीक्षा त्यांनी आपल्या लेखनातून केली आहे. समीक्षा लेखनासाठी त्यांना विदर्भ साहित्य संघाचा कुसुमानिल पुरस्कार, महाराष्ट्र साहित्य परिषदेचा रा.श्री.जोग पुरस्कार, महाराष्ट्र शासनाचा नरहर कुरुंदकर पुरस्कार, राज्य शिक्षक पुरस्कार इत्यादी सन्मान प्राप्त झाले आहेत. १९५९ साली तळोधी (बाळापूर) येथे झालेल्या विदर्भ साहित्य संमेलनाचे अध्यक्ष ख्यातनाम कवी या. मु. पाठक हे होते. त्यानंतर यंदा होणाऱ्या संमेलनाचे अध्यक्षदेखील काव्यसमीक्षक म्हणून ओळखले जाणारे डॉ. काळे हे आहेत. हा एक अनोखा योगायोग दिसून येत आहे.(प्रतिनिधी)
विदर्भ साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी अक्षयकुमार काळे
By admin | Updated: November 5, 2014 00:52 IST