नागपूर : नागपूर रेल्वेस्थानकावर बाहेरील राज्यांतून येणाऱ्या प्रवाशांना आरटीपीसीआर टेस्ट सक्तीची करण्यात आली आहे; परंतु ही टेस्ट टाळायला लावणारे ऑटोचालक प्रवाशांना आरएमएस इमारतीतून बाहेर घेऊन जात होते. या ऑटोचालकांवर आरपीएफने कारवाई केली आहे.
नागपूर रेल्वेस्थानकावर बाहेरील राज्यांतून येणाऱ्या प्रवाशांची आरटीपीसीआर टेस्ट करण्यात येत आहे. त्यासाठी प्लॅटफार्म क्रमांक १ वरील पॅसेंजर लाऊंजमध्ये तपासणीची व्यवस्था करण्यात आली आहे. महापालिकेची चमू तेथे तैनात आहे; परंतु काही ऑटोचालक प्रवासी मिळविण्यासाठी आरएमएस (रेल्वे मॅसेज सर्व्हिस) इमारतीतून आत शिरत होते. प्लॅटफार्मवर प्रवाशांना आरटीपीसीआर टेस्ट करण्यासाठी वेळ वाया घालवू नका; तुम्हाला मी थेट बाहेर नेतो असे ते सांगत. त्यानंतर ते आरएमएस इमारतीतून या प्रवाशांना थेट रेल्वेस्थानकाच्या बाहेर घेऊन जात होते. हा प्रकार १९, २० आणि २१ तारखांना खुलेआम सुरू होता. रेल्वे सुरक्षा दलाला याबाबत माहिती मिळाल्यानंतर २१ तारखेला आरपीएफने यांतील पाच ऑटोचालकांना अटक केली. रमजान फतेह खान, इमरान सलीम खान, मोहम्मद इजाज इलियास, मोहम्मद शहनवाज अखिल आणि मार्टीन रॉर्टसन अशी ऑटोचालकांची नावे आहेत. त्यांच्याविरुद्ध रेल्वे अॅक्ट १४७ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
...............