लाेकमत न्यूज नेटवर्क
पारशिवनी : अंगणात खेळत असलेल्या नऊ वर्षीय मुलीला अनाेळखी व्यक्तीने पळवून नेल्याची घटना पारशिवनी पाेलीस ठाण्याच्या हद्दीतील काळाफाटा येथे मंगळवारी (दि. २) दुपारी घडली. अपहृत मुलीसह आराेपीचा शाेध सुरू असल्याचे पाेलिसांनी स्पष्ट केले. अल्पवयीन मुलीचे अपहरण करण्याचा प्रयत्न घुकशी गावातही झाला असून, मुलगी मात्र थाेडक्यात बचावली.
काळाफाटा (ता. पारशिवनी) येथील नऊ वर्षीय मुलगी नेहमीप्रमाणे तिच्या घरासमाेर अंगणात एकटीच खेळत हाेती. मंगळवारी दुपारी २.२० ते २.३० वाजताच्या दरम्यान २५ ते ३० वर्षे वयाेगटातील अनाेळखी तरुण तिच्या घरी आला. त्याने चेहऱ्याला दुपट्टा बांधला हाेता. त्याने तिला कशाचे तरी आमिष दाखविले आणि माेटरसायकलवर बसवून तिला पळवून नेले. अपहृत मुलीच्या वडिलांनी तिचा गावात तसेच नातेवाइकांकडे शाेध घेतला.
ती कुठेही आढळून न आल्याने शेवटी पाेलिसात तक्रार दाखल केली. तिची उंची चार फूट असून, चेहरा लांबट असल्याची माहिती पाेलिसांनी दिली. पाेलिसांनी काळाफाटा नजीकच्या १० किमी परिसरातील गावे पिंजून काढली. मात्र, तिचा कुठेही थांगपत्ता लागला नाही. याप्रकरणी पारशिवनी पाेलिसांनी भादंवि ३६३ अन्वये गुन्हा नाेंदविला असून, या घटनेचा तपास पाेलीस उपनिरीक्षक उबाडे करीत आहेत.
...
दुसरा प्रयत्न फसला
असाच अल्पवयीन मुलीला पळवून देण्याचा दुसरा प्रयत्न घुकशी गावात गुरुवारी (दि. ४) दुपारी करण्यात आला. यात १६ वर्षीय मुलगी घरी एकटी असताना घरी आलेल्या अनाेळखी तरुणाने तिला शाळेच्या कामानिमित्त साेबत चालण्याची सूचना केली. शंका आल्याने तिने त्याला भावाला बाेलावून घेते, असे सांगत फाेन केला. त्याच वेळी त्या तरुणाने तिथून लगेच पळ काढला. अल्पवयीन मुलींना पळवून नेण्याचे प्रकार वाढत असल्याने ग्रामीण भागात भीतीचे वातावरण निर्माण हाेत आहे. दुसरीकडे, मुली अथवा तरुणींनी काेणत्याही अनाेळखी व्यक्तीच्या वाहनावर अथवा वाहनात बसू नये. गावात अनाेळखी व्यक्ती दिसल्यास त्याची सखाेल चाैकशी करावी. शिवाय, पाेलिसांना तातडीने माहिती द्यावी, असे आवाहन पारशिवनीचे ठाणेदार संताेष वैरागडे यांनी केले आहे.