नागपूर : काेराेनामुळे दरराेज हाेणाऱ्या मृत्यूच्या आकड्यांनी भीतीदायक चित्र निर्माण केले आहे; मात्र काही रुग्ण हिंमतीने संक्रमणाचा सामना करीत आहेत. ९९ वर्षीय वसंत दलाल या रुग्णाचे असेच एक सकारात्मक उदाहरण दिसून आले. बेशुद्ध अवस्थेत रुग्णालयात गेल्यानंतरही ११ दिवस उपचार घेऊन ते सुखरूप घरी परतले.
वसंत दलाल यांना ९ मे राेजी रात्री ताप आला. ताप वाढत गेला, स्थिती आणखी बिघडली व ते बेशुद्ध पडले. अशाच अवस्थेत त्यांना रामदासपेठ येथील एका खासगी रुग्णालयात भरती करण्यात आले. डाॅक्टरांच्या म्हणण्यानुसार त्यांचा ऑक्सिजन स्तर अतिशय खालावला हाेता व श्वास वेगाने सुरू हाेता. तपासणीमध्ये ते काेराेना पाॅझिटिव्ह असल्याचे निदर्शनास आले. सीटी स्कॅन स्काेअर ८/२५ हाेता. स्थितीनुसार औषधे आणि ऑक्सिजन लावण्यात आले. रक्तदाब, हार्ट रेट, ऑक्सिजन स्तर नियंत्रित करण्याचा प्रयत्न करीत तीन दिवस निरीक्षणात ठेवण्यात आले. या तातडीच्या उपचारामुळे हळूहळू ते शुद्धीवर आले आणि श्वसनाची गतीही सुधारायला लागली. ११ दिवसांच्या उपचारानंतर स्थिती पूर्णपणे सुधारलेली पाहून गुरुवारी त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली. उपचार करणाऱ्या डॉ. आनंद डोंगरे, डॉ. ओवेस हसन, डॉ. पवन मिश्रा आणि डॉ. उस्मान शेख यांच्यासह संपूर्ण टीमचे प्रयत्न यशस्वी ठरले व ९९ वर्षांचे वसंत दलाल सुखरूप घरी परतले.