लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : शहरातील सिवरेजमुळे मृत अवस्थेतील नाग नदीचे पुनरुज्जीवन व्हावे, अशी शहरातील नागरिकांची अपेक्षा आहे. मात्र, पुनरुज्जीवन महापालिका सभागृहात किती वेळा आला, या प्रश्नाचे उत्तर नगरसेवकही आता निश्चितपणे देऊ शकणार नाही. आठ वर्षांपूर्वी १२५२.३३ कोटींचा प्रकल्प आज २११७.७१ कोटीवर गेला आहे. जवळपास ९६५ कोटींनी या प्रकल्पाची किंमत वाढली आहे. प्रकल्पाच्या वाढीव खर्चासोबतच महापालिकेवरील आर्थिक बोजाही वाढला आहे.
२०१२ मध्ये या प्रकल्पाची किंमत १२५२.३३ कोटी होती. केंद्र सरकारने या खर्चाला मान्यता दिली होती. प्रकल्पाला सुरुवात झाली नाही. सुधारित प्रस्तावानुसार २०१४ मध्ये प्रकल्पाची किंमत १४७६.९६ कोटींवर गेली. परंतु कामाला सुरुवात झाली नाही. २०१९ मध्ये १,८६४ कोटींवर हा प्रकल्प पोहोचला, आता तो २११७.७१ कोटींवर गेला आहे. केंद्रीय वित्त विभागाच्या मंजुरीनंतर या प्रकल्पाच्या कामाला गती येईल, अशी आशा आहे.
राष्ट्र नदी विकास प्राधिकरण या प्रकल्पासाठी सल्लागार कंपनी नियुक्त करणार आहे. सल्लागार कंपनीने तयार केलेला प्रस्ताव जपानची वित्तीय संस्था जिकाकडे तपासणीसाठी देण्यात येईल. जिकाच्या मंजुरीनंतर हा प्रस्ताव सभागृहात मंजुरीसाठी येणार आहे. यापूर्वी नाग नदीचा प्रस्ताव अनेकदा सभागृहात मंजुरीसाठी आला होता. प्रत्येक वेळेला मंजुरीही देण्यात आली, परंतु कामाला प्रत्यक्ष सुरुवात झाली नाही.
....
वाढीव खर्चाचा मनपावर बोजा
जपानची वित्तीय संस्था जिका या प्रकल्पासाठी १ हजार ८६४ कोटी रुपयांचे अर्थसाहाय्य देणार आहे. २११७.७१ कोटींच्या या प्रकल्पामध्ये केंद्र शासन, राज्य शासन व नागपूर महापालिका यांचा अनुक्रमे ६०:२५:१५ या प्रमाणात हिस्सा आहे. त्यानुसार, २९७.८२ कोटी खर्च केला जाणार आहे. मात्र, प्रकल्पाची किंमत वाढल्यास महापालिकेला खर्च वहन करावा लागेल, असे जिकाने स्पष्ट केले आहे. प्रकल्पाच्या कामाला वर्ष-दोन वर्षे सुरुवात न झाल्यास प्रकल्पाचा खर्च वाढणार आहे. मनपाची आर्थिक स्थिती विचारात घेता, हा वाढीव खर्च करणे शक्य होणार नाही.
......
प्रक्रिया न करता १८० एमएलडी सांडपाणी नदीत
शहराला दररोज ६५० एमएलडी पाणीपुरवठा करण्यात येतो. यापैकी सुमारे ५३० एमएलडी पाणी सिवेजमध्ये परिवर्तित होऊन नदीत सोडले जाते. यातील ३५० एमएलडी पाण्यावर प्रक्रिया केली जाते, तर १८० सांडपाणी प्रक्रिया न करताच नदीपात्रात सोडले जाते. यामुळे नदीला गटाराचे स्वरूप आले आहे. पुनरुज्जीवन झाल्यास नाग नदीला गतवैभव प्राप्त होईल. शहराच्या सौंदर्यात भर पडले. शहरातील नागरिकांनाही मोठा दिलासा मिळेल.