नागपूर : सप्टेंबर महिन्यात शहरातील कोविड रुग्णांची संख्या कमालीची वाढली होती. रुग्णांना खासगी हॉस्पिटलमध्ये खाट मिळणे कठीण झाले होते. परंतु आता कोविड हॉस्पिटलमधील ७० टक्के खाटा रिकाम्या आहेत. सध्या रुग्णांची संख्या कमी असलीतरी कोरोना संपलेला नाही. यामुळे सुरक्षेचा नियमांचे पालन करण्याचे आवाहन तज्ज्ञानी केले आहे.
प्रशासनाने कोरोनाचा दुसऱ्या लाटेची शक्यता वर्तवली आहे. यामुळेच खासगी कोविड हॉस्पिटलमधील कोविडच्या खाटा कायम ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. सध्या खासगी व शासकीय कोविड रुग्णालयात ४७२६ खाटा आरक्षित आहेत. यातील ३१२५ खाटा सध्याच्या स्थितीत रिकाम्या आहेत. अतिदक्षता विभागाच्या १२०१ खाटा आहेत. यातील ६७८ खाटा रिकाम्या आहेत. ६६ छोट्या व मोठ्या खासगी इस्पितळांना कोविड रुग्णांना भरती करण्याची परवानगी देण्यात आली आहे. शासकीय इस्पितळांमध्येही अर्ध्यापेक्षा जास्त खाटा रिकाम्या आहेत. मेडिकलमध्ये ५०६ मधून २८७, मेयोमध्ये ५६४ मधून २७५, एम्समध्ये ६० मधून २२, पोलीस हॉस्पिटल काटोल रोड येथे १६ मधून ७ खाटा रिकाम्या आहेत. मेडिकलमध्ये अतिदक्षता विभागाचा १०५ तर मेयोमध्ये ४१ खाटा रिकाम्या आहेत. सध्या १४७६ रुग्ण विविध रुग्णालयात उपचार घेत आहेत. सोमवारी सक्रिय रुग्णांची संख्या ५६६६वर गेली होती.