नागपूर : मनपाच्या मनपा के अतिक्रमणविरोधी पथकाने गुरुवारी शहरातील सर्वच दहाही झोनमध्ये अतिक्रमण हटविण्याची कारवाई केली. यात ४०० अतिक्रमणांवर कारवाई करून या मोहिमेतून ६ ट्रक साहित्य जप्त करण्यात आले.
या मोहिमेत लक्ष्मीनगर झोन अंतर्गत रहाटे कॉलनी चौक ते लक्ष्मीनगर चौक, सोमलवाडा चौक ते परत रहाटे कॉलनी चौकापर्यंत ५२ अतिक्रमणे हटविण्यात आली. यात एक ट्रक साहित्य जप्त करण्यात आले. धरमपेठ झोन अंतर्गत सिव्हिल लाइन्सच्या मिठा दर्गालगतच्या फुटपाथवरील अतिक्रमणकाऱ्यांचे टिनाचे शेड हटविण्यात आले. यानंतर आकाशवाणी चौक ते जिल्हाधिकारी कार्यालय व व्हीसीए मैदानापर्यंत ही कारवाई करण्यात आली. या मोहिमेत अतिक्रमणकाऱ्यांकडून ५ हजार रुपयांचा दंडही वसूल करण्यात आला. याच प्रकारे मनपा मुख्यालयाच्या समोरील फुटपाथवर असलेली चहाची दुकाने आणि ठेले हटविण्यात आले. या व्यावसायिकांकडून ७ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.
हनुमाननगर झोन अंतर्गत तिरंगा चौक ते सक्करदरा चौकापर्यंत झालेल्या मोहिमेत एक ट्रक साहित्य जप्त करण्यात आले. यानंतर तुकडोजी महाराज पुतळा चौक ते मानेवाडा चौकापर्यंतच्या फुटपाथवरील ५६ अतिक्रमणे हटवून एक ट्रक साहित्य जप्त करण्यात आले. धंतोली झोनच्या त्रिशरण चौक ते नरेंद्रनगर चौक, मनीषनगर चौक ते तुकडोजी महाराज पुतळा चौक, वंजारीनगर चौक, कॉटन मार्केट ते सुभाषनगर, मेडिकल कॉलेज चौक ते टीबी वाॅर्ड चौकात ७२ अतिक्रमणे हटविण्यात आली. या मोहिमेत एक ट्रक साहित्य जप्त करण्यात आले. तर वसंतनगरातील कारवाईत भिंत पाडण्यात आली.