आरोपींनी उगवला सूड : चौघांना अटकनागपूर : ५०० रुपयांच्या वसुलीतून निर्माण झालेल्या वादामुळे सक्करदऱ्यातील तिहेरी हत्याकांड घडल्याची माहिती पुढे आली आहे. दरम्यान, मारेकऱ्यांनी उगले बंधूंपैकी एकाच्या हत्येचा कट रचला होता. परंतु, भावाला वाचविण्यासाठी संजय आणि केशव मारेकऱ्यांसमोर उभे झाल्याने मारेकऱ्यांनी या तिघांनाही निर्दयपणे ठार मारले.एकनाथ काशिनाथराव उगले (वय ३२), संजय काशिनाथराव उगले (वय ३०) आणि केशव काशिनाथराव उगले (वय २७, रा. सर्व शामबाग, सक्करदरा) या तिघांची १० ते १२ जणांनी गुरुवारी रात्री ९ च्या सुमारास भीषण हत्या केली. उपराजधानीला हादरवून सोडणारे हे हत्याकांड केवळ ५०० रुपयांच्या वादातून झाल्याचे पुढे आले आहे. मृत एकनाथ हा पान सेंटरच्या मागे जुगार क्लब चालवत होता. संजय कोंबड्यांची झुंज लावायचा तर, केशव हा हिंगण्यातील एका दारूच्या भट्टीवर बसायचा.आरोपी शुभम सातपैसे, निहाल नागोसे, रामा नागोसे भाजी विकायचे. जुगारातील ५०० रुपयांवरून एकनाथने रामाला दोन दिवसांपूर्वी चौकात मारहाण केली होती. त्याला सोडवण्यासाठी आलेल्या बहिणीलाही एकनाथने धक्काबुक्की केली. मोहल्ल्यातील नागरिकांसमोर झालेल्या या अपमानामुळे रामा, निहाल आणि त्याचे साथीदार सूडाने पेटले होते. या घटनेनंतर गुरुवारी शक्ती पांडेच्या मुलाच्या जावळाचा कार्यक्रम असल्यामुळे उपरोक्त आरोपी, एकनाथ, संजय आणि केशव तसेच परिसरातील काही नागरिक आणि गुंडही भंडारा मार्गावर गेले होते. तेथे खाणेपिणे सुरू असतानाच जुगारही भरला. या जुगारात शुभम आणि निहालसोबत पुन्हा एकनाथचा वाद झाला. यावेळी संजयने आरोपींना मारहाण केली. वेळोवेळी होणारी मारहाण आणि अपमानामुळे क्षुब्ध झालेले आरोपी तेथून नागपुरात परतले आणि त्यांनी रस्त्यातच एकनाथच्या हत्येचा कट रचला. तो परत येण्याची आरोपी वाट बघू लागले. रात्री ९ च्या सुमारास एकनाथ, संजय आणि केशव पान सेंटरजवळ आले. शस्त्रानिशी तयारीत असलेल्या आरोपींनी एकनाथवर धाव घेतली. मात्र, केशव पुढे झाला. त्यामुळे आरोपींनी प्रथम त्याच्यावर आणि त्याच्या मदतीला धावलेल्या एकनाथ आणि संजयवरही शस्त्राचे सपासप घाव घालून ठार मारले. आरोपी मोठ्या संख्येत असल्यामुळे उगले बंधूंना बचावाची संधीच मिळाली नाही. ते तिघे रक्ताच्या थारोळ्यात कोसळल्यानंतर आरोपी पळून गेले. या हत्याकांडामुळे अवघ्या उपराजधानीला हादरा बसला. हा टोळीयुद्धाचा प्रकार असल्याचीही चर्चा सुरू झाली. पोलिसांनी मात्र त्याचा इन्कार केला.दरम्यान, सक्करदरा पोलिसांनी मृताची आई मनोरमाबाई काशीनाथराव उगले (वय ६०) यांच्या तक्रारीवरून नेहाल धनराज नागोसे, रामेश्वर ऊर्फ रामा बाबूराव नागोसे, भूषण बहाट ऊर्फ बाल्या मांजरे, राजू बाबूराव नागोसे, शुभम सातपैसे, मनोज सोनटक्के आणि शुभम सोनटक्के यांच्याविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल केला. यातील नेहाल, रामा, बाल्या आणि राजू नागोसे या चौघांना अटक करण्यात आली. इतरांचा शोध घेतला जात आहे. (प्रतिनिधी)
५०० रुपयांच्या वादातून घडले हत्याकांड
By admin | Updated: April 11, 2015 02:17 IST