नागपूर, दि. 5 - एरवी नागपूर शहरात आगीच्या घटना नवीन नाहीत. मात्र गेल्या काही वर्षांपासून आगीच्या घटनांचे प्रमाण वाढीस लागले असल्याचे चित्र आहे. गेल्या सव्वापाच वर्षांत नागपूर शहरात साडेचार हजारहून अधिक ठिकाणी आग लागली आणि या घटनांमध्ये थोडेथोडके नव्हे तर ४३१ नागरिकांचा होरपळून किंवा जीव गुदमरुन मृत्यू झाला. माहितीच्या अधिकारातून आगीसंदर्भातील हे दाहक वास्तव समोर आले आहे. उपराजधानीतील माहिती अधिकार कार्यकर्ते अभय कोलारकर यांनी नागपूर महानगरपालिकेच्या अग्निशमन विभागाकडे माहितीच्या अधिकाराअंतर्गत विचारणा केली होती. शहरात २००७ पासून किती आगी लागल्या, त्यांचे स्वरुप व त्यापासून झालेले नुकसान, प्राणहानी इत्यादींबाबत त्यांनी प्रश्न उपस्थित केले होते. प्राप्त झालेल्या अधिकृत माहितीनुसार १ एप्रिल २०१२ ते ३० जून २०१७ या कालावधीत उपराजधानीमध्ये ४ हजार ८३२ आगी लागल्या. यात मोठ्या स्वरुपाच्या ७२६ तर मध्यम स्वरुपाच्या १ हजार १६६ आगींची प्रकरणे होते. २ हार ९४० ठिकाणी किरकोळ स्वरुपाची आग लागली होती. जखमींपेक्षा मृतांची संख्या अधिक या सव्वापाच वर्षांमध्ये लागलेल्या आगींच्या घटनांमध्ये ४३१ नागरिकांचा मृत्यू झाला. यात १०२ महिला तर ३२९ पुरुषांचा समावेश होता. जखमींपेक्षा मृतांची संख्या अधिक असल्याचे आकडेवारीवरुन स्पष्ट होत आहे. ५९ पुरुष तर ३५ महिला असे ९४ जण जखमी झाले.
सव्वापाच वर्षांत नागपूरमध्ये आगीच्या घटनांमध्ये 431 नागरिकांचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 5, 2017 18:21 IST