नागपूर : अन्न व औषधी प्रशासन विभागाने (एफडीए) बुधवारी भेसळयुक्त आणि अनुचित पद्धतीने पॅकिंग केलले ३.७२ लाख रुपयाचे खाद्यतेल जप्त केले.
खाद्यतेलाची भेसळ करणारे आणि ब्रॅण्डेड खाद्यतेलाची नक्कल करून अनुचित पद्धतीने रिपॅकिंग व विक्री करणारे गुरुदेव ट्रेडिंग कंपनी, इतवारी, लक्ष्मी ऑईल, इतवारी, साहिल कुमार टी कंपनी, इतवारी, जगदीश ट्रेडिंग कंपनी, इतवारी आणि साईनाथ ट्रेडर्स, इतवारी या अन्न व्यावसायिकांविरुद्ध धडक कारवाई करून आठ खाद्यतेलाचे नमुने विश्लेषणासाठी घेऊन ३ लाख ७२ हजार २६० रुपये किमतीचे भेसळयुक्त आणि अनुचित पद्धतीने पॅकिंग केलेले खाद्यतेल जप्त करण्यात आले.
ही कारवाई अन्न व औषध प्रशासन विभागाचे सहआयुक्त (अन्न) चंद्रकांत पवार यांच्या मार्गदर्शनाखाली अन्न सुरक्षा अधिकारी मनोज तिवारी, प्रफुल्ल टोपले, महेश चहांदे, अनंत चौधरी, यदुराज दहातोंडे, अखिलेश राऊत, विनोद धवड यांनी केली. एफडीएने अशाप्रकारची कारवाई यापूर्वीही विविध खाद्यतेल उत्पादक, रिपॅकर्स व विक्रेत्यांविरुद्ध केली आहे. त्यांच्याविरुद्ध प्रशासकीय व दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. खाद्यतेलात भेसळ करणाऱ्यांविरुद्ध अशाप्रकारची कारवाई निरंतर सुरू राहील, असे पवार यांनी म्हटले आहे.