समीर जोशीसह ११ जणांचा समावेश : गुंतवणूकदारांना कोट्यवधीने फसवल्याचे प्रकरणनागपूर : श्रीसूर्या समूहाने मुदत ठेवींवर त्रैमासिक १२.५ टक्के व्याजाचे आमिष दाखवून शेकडो गुंतवणूकदारांची कोट्यवधीने फसवणूक केल्या प्रकरणी गुरुवारी आर्थिक गुन्हे पथकाने एमपीआयडी कायद्याच्या विशेष न्यायालयाचे न्यायाधीश व्ही. टी. सूर्यवंशी यांच्या न्यायालयात आणखी ३५ हजार पानी आरोपपत्र दाखल केले.श्रीसूर्या समूहाचे प्रबंध संचालक समीर सुधीर जोशी, त्याची पत्नी पल्लवी समीर जोशी, श्रीसूर्या समूहांतर्गत कार्यरत श्रीसूर्या इन्टेकचा संचालक मनोज सुधीर तत्त्वादी, श्रीसूर्या बिझनेस असोसिएट्सचा निशिकांत नारायण मायी, श्रीकांत गोपाल प्रभुणे, दिलीप दामोदर डांगे, नितीन नारायण केसकर, मोहन मुकुंद पितळे, मुकुंद अंबादास पितळे, शंतनू ऊर्फ विवेक वासुदेव कुऱ्हेकर आणि आनंद जहागीरदार, अशा ११ आरोपीविरुद्ध हे आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. यापूर्वी १३ डिसेंबर २०१३ रोजी समीर जोशी आणि पल्लवी जोशी यांच्याविरुद्ध ४ हजार ७०० पानी आरोपपत्र दाखल करण्यात आले होते. या सर्व आरोपींनी आतापर्यंतच्या तपासात १ हजार २०० गुंतवणूकदारांची ९९ कोटी रुपयांनी फसवणूक केलेली आहे. पहिली तक्रार हॉटेल व्यावसायिकाचीफसवणूक झाल्याचे समजूनही आपला पैसा आपल्याला मिळेल, या आशेवर गुंतवणूकदार पोलिसात तक्रार करण्याची हिंमत करीत नव्हते. सोमलवाडा येथील रहिवासी हॉटेल व्यवसायी अमित मोरे यांनी हिंमत करून राणाप्रतापनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. श्रीसूर्या समूहाने त्यांची ५ लाख रुपयांनी फसवणूक केली . मोरे यांच्या तक्रारीवरून समीर जोशी, पल्लवी जोशी आणि इतरांविरुद्ध १४ नोव्हेंबर २०१३ रोजी भादंविच्या कलम ४०६, ४२०, ३४, महाराष्ट्र गुंतवणूकदार संरक्षण कायदा (एमपीआयडी) १९९९ च्या कलम ३ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे सोपविण्यात आला होता. आणखी८१ आरोपींची अटक बाकीश्रीसूर्या समूहाने पाच हजाराहून अधिक गुंतवणूकदारांची १०० कोटी रुपयांनी फसवणूक केल्याचा अंदाज होता. अनेक गुंतवणूकदारांनी तक्रारीच न केल्याने केवळ ९९ कोटींची फसवणूक आतापर्यंत निष्पन्न झाली आहे. सर्व गुंतवणूकदारांनी तक्रार केल्यास फसवणुकीचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. या प्रकरणात एकूण ९२ आरोपी आहेत. त्यापैकी ११ जणांनाच अटक झालेली आहे. आणखी ८१ आरोपींना अटक होणे बाकी आहेत. त्यात बऱ्याच बड्या व्यक्ती, दलाल आणि सीएचा समावेश आहे. पितळे कंपनीची दलाली ११ कोटीश्रीसूर्या समूहाने अकोला येथील मोहन पितळे आणि अमरावती येथील मुकुंद पितळे यांना ११ कोटींची दलाली वाटली आहे. मनोज तत्त्वादी याला २ कोटी २७ लाखांची दलाली मिळाली आहे. श्रीसूर्या समूहाने दलाल अर्थात बिझनेस असोसिएटस्ना मोठ्या प्रमाणावर दलाली वाटली आहे. ८१ जणांमध्ये बहुतांश दलाल आहेत. त्यांना अटक झाल्यास जप्ती मालमत्तेत वाढ होऊ शकते. श्रीसूर्याच्या एकूण ७३ मालमत्ता जप्त करण्यात आल्या असून त्यापैकी २१ मालमत्ता नागपूरबाहेरील आहेत. या मालमत्ता विकून प्रत्येक गुंतवणूकदारांना त्यांच्या ठेवींची अर्धी रक्कम प्राप्त होऊ शकते, असे बोलले जात आहे.
श्रीसूर्यावर ३५ हजार पानाचे आरोपपत्र
By admin | Updated: July 25, 2015 02:59 IST