मांढळ : सन २०२० ते २०२५ या काळात कुही तालुक्यातील ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांच्या दृष्टीने मंगळवारी (दि. ८) कुही तहसील कार्यालयाच्या सभागृहात सरपंचपदाची आरक्षण साेडत काढण्यात आली. यात तालुक्यातील एकूण ५९ ग्रामपंचायतींपैकी ३० ग्रामपंचायतींचे सरपंचपद विविध प्रवर्गातील महिलांच्या वाट्याला गेले असून, २९ गावांमधील सरपंचपद पुरुषांच्या वाट्याला आले आहे. तालुक्यातील १६ ग्रामपंचायतींचे सरपंचपद नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी राखीव करण्यात आले असून, २९ ग्रामपंचायती सर्वसाधारण प्रवर्ग, १२ अनुसूचित जाती व दाेन अनुसूचित जमाती प्रवर्गाच्या वाट्याला गेल्या आहेत.
तालुक्यातील डाेडमा, बानाेर, फेगड, साेनेगाव, रुयाड, चितापूर, अंबाडी व चिकना या आठ ग्रामपंचायतींचे सरपंचपद नागरिकांचा मागास प्रवर्गा(ओबीसी)तील पुरुषांच्या वाट्याला आले असून, हरदाेली (नाईक), ताराेली, चापेगडी, वडेगाव-मांढळ, राजाेली, कुचाडी, सातारा व वीरखंडी या आठ ग्रामपंचायतींचे सरपंचपद नागरिकांचा मागास प्रवर्ग महिलांकडे गेले आहे.
तारणा, वेळगाव, हरदाेली (राजा), डाेंगरमाैदा, भटरा, वग, देवळी (कला), वेलतूर, शिकापूर, तुडका, गाेठणगाव, ठाणा, कऱ्हांडला व आंभाेरा (खुर्द) या १४ ग्रामपंचायतींचे सरपंचपद खुल्या प्रवर्गासाठी राखीव करण्यात आले असून, मांढळ, किन्ही, मांजरी, खाेबना, अडम, तितूर, वडेगाव (काळे), सिल्ली, राजाेला, बाेरी (नाईक), गाेन्हा , सिर्सी, जीवनापूर, नवेगाव-उमरी व हरदाेली (पुनर्वसन) या १५ ग्रामपंचायतींचे सरपंचपद सर्वसाधारण प्रवर्गातील महिलांसाठी आरक्षित केले आहे.
अनुसूचित जातीतील खुल्या प्रवर्गासाठी परसाेडी, पचखेडी, साळवा, ससेगाव, कुजबा व माळणी या सहा ग्रामपंचायती तर याच प्रवर्गातील महिलांसाठी देवळी (खुर्द), पारडी, इसापूर, म्हसली, मुसळगाव व अकाेली या सहा ग्रामपंचायतींचे सरपंचपद राखीव केले आहे. तालुक्यातील खाेकर्ला ग्रामपंचायतचे सरपंचपद अनुसूचित जमाती खुला प्रवर्ग तर चन्ना ग्रामपंचायतचे सरपंचपद याच प्रवर्गातील महिलांच्या वाट्याला गेले आहे.