नागपूर : मेडिकल सोडून गेलेल्या अस्थायी डॉक्टरांचे पैसे एका लिपीकाने आपल्या खात्यात वळते केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. सुमारे १७ लाखांची अफरातफर झाल्याचे बोलले जात आहे. संबंधित बॅकेच्या ही बाब लक्षात आल्यावर त्यांनी मेडिकल प्रशासनाला याची माहिती दिली. प्रकरणाची गंभीरता लक्षात घेत अधिष्ठात्यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत.
प्राप्त माहितीनुसार, एका कंत्राटी डॉक्टराचा कार्यकाळ २०१५ मध्ये संपल्याने ते मेडिकल सोडून गेले. परंतु संबंधित लिपीकाने याबाबतची माहिती प्रशासनाला न कळविताच त्याचे वेतन आपल्या खात्यात वळविले. ही बाब, मेडिकलचे प्रशासकीय अधिकारी, डॉक्टर, परिचारिका व इतर मनुष्यबळांचे खाते दुसऱ्या एका बँकेत स्थानांतरित करताना लक्षात आली. बँकेने याची माहिती मेडिकल प्रशासनाला दिली. अधिष्ठाता डॉ. सजल मित्रा यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली. त्यांनी चौकशी समिती स्थापन करून तातडीने अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले. सोबतच संबंधित लिपीकाला विभागातून काढून दुसऱ्या विभागात टाकले.
-हडपलेले पैसे जमाही केले
चौकशी समितीने विचारपूस सुरू करताच हडपलेले पैसे लिपीकाने मेडिकलच्या खात्यात जमा केले. परंतु एवढा मोठा निधी एकाच डॉक्टरांचा होता की इतरही डॉक्टरांचा होता, यापूर्वीही असे प्रकार झाले असावे का, हडपलेला निधी तातडीने जमा केल्याने या मागे मोठे अधिकारी तर नाही, २०१५ पासून हा घोटाळा होत असताना मेडिकल प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या ही बाब लक्षात का आली नाही, असे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. चौकशीत या बाबी स्पष्ट होण्याची शक्यता आहे.
-कारवाई नक्की होणार
या प्रकरणात चौकशीचे आदेश देण्यात आले आहे. चौकशीचा अहवाल येताच नियमानुसार कारवाई केली जाईल. सोबतच संचालकांकडे कठोर कारवाईची शिफारस करण्यात येईल. हे संस्थेंतर्गत प्रकरण असल्याने पोलिसांकडे सोपविता येत नाही.
-डॉ. सजल मित्रा
अधिष्ठाता, मेडिकल