- शांतियोग
- बी. के. एस. अय्यंगार, कु. गीता अय्यंगार
आजचा हा लेख शेवटचा असल्यामुळे निरूपणापेक्षा निरोप घेताना हृद्गत मांडणे आवश्यक आहे.
योग हा विषय गहनही आहे, तसाच सामान्यजन स्वीकारू शकतील, आचारू शकतील असाही आहे. योग हे तत्त्वज्ञानशास्त्र आहे. कोणतेही शास्त्र सहजरीत्या कोणीच समजून घेऊ शकत नाही. त्यातूनही तत्त्वज्ञान तर नक्कीच नाही. हे संशोधनात्मक शास्त्र अनुभवानेच जाणावे लागते. तरीदेखील, सर्वसामान्यांनी अनुसरण्यासारखा हा योग आहे, हे निश्चितच.
प्रथमत: हे लक्षात घेणे आवश्यक आहे, की प्रत्येकाने सुरुवात योगासनांनीच करावी. वर-वर दिसण्यास शारीरिक व्यायाम दिसला, तरी त्यातून शरीर आणि मनावर होत असलेला परिणाम निश्चितच जाणवतो. त्यासाठी आवर्जून दिवसात तासभर का होईना वेळ काढणे आवश्यक होय. प्रथमत: शरीर व मनाचे आरोग्य सांभाळणे अत्यंत गरजेचे आहे. आयुष्याच्या प्रारंभी शरीरारोग्य, तर उतारवयात मनारोग्य. कोणत्याही वयात अनुसरण्याजोगा हा योग आचरणे महत्त्वाचे होय. योग स्त्री-पुरुष हा भेद मानीत नाही.
आसनात प्रगती होत असताना प्राणायामाकडे वळणे योग्य होय. आसनात गती नसेल, तर प्राणायामात अपयश हे नक्कीच. योगाभ्यासात अनेक अडचणी येतात. प्रकृतीला स्वत:च्या अधीन ठेवणे तितकेसे सोपे नाही. प्रकृती ही भगवंताची शक्ती आहे. मातृस्वरूपी प्रकृतीचा आशीर्वाद लाभणे तितकेसे सुलभ नाही. तमोगुणी शरीर व्याधिग्रस्त होते किंवा आळशी होऊन सुस्तावते. मन तर आपला अंतर्शत्रू जो सहजासहजी वाकत नाही. त्याला वाकवावे लागते. संशयांचा कल्लोळ इतका, की ‘‘योगासने केली, तर आपले नुकसान तर नाही ना होणार? त्यापेक्षा न केलेले बरे!’’ वगैरे शंका. स्वत:मध्ये दोष आहे काय किंवा आपले काही चुकले आहे काय, हे बघण्याची कोणालाही हिंमत नसते. झालेली चूक सुधारण्याऐवजी योगाला सोडचिठ्ठी देणारे अनेक . आजची ही मानसिकताच आहे. या मोहमयी दुनियेत अनेक विषय सतत मनाला खुणावत असतात. स्वैर जीवन जगण्याची ओढ लागली असताना त्या क्षणिक आनंदाचा शेवट दु:खदायी आहे, याची जाणीव कोणालाच नाही. काही जण मात्र कल्पनेच्या भरार्या इतक्या घेतात, की त्यांचे पाय जमिनीवर राहत नाहीत. यामागील कारण म्हणजे इंद्रियांना स्वैर सोडणे. थोडेसे अध्यात्म जाणले, की काहींना आपण समाधीच गाठली, असे वाटते आणि योग किंवा अध्यात्म याविषयी केवळ बडबड चालते. ही एक भ्रांतीच होय.
बुद्धीची झेप जरूर असावी; पण मानवणेही आवश्यक असते. अन्नश्रीमंती भरपूर असेल; परंतु अन्न पचविण्याचीही शक्ती हवी. तसेच बुद्धीचे आहे. बुद्धीची सांगड कर्तृत्वाशी बसणे आवश्यक असते. कर्तृत्वशक्तीदेखील दांडगी असावी लागते. नाही तर अपयश संभवते. तेव्हा पुन:पुन्हा स्वत:ची कुवत लक्षात घेणे आवश्यक होय. अपयशाला सामोरे जाणे म्हणजेच सत्य पडताळणे होय. अशा वेळी पुन्हा एकदा स्वत:ची साधना पडताळणे योग्य ठरते.
समाजात दुष्टप्रवृत्ती ठाण मांडून बसली असताना मुकाबला तिच्याशी आहे. समाजात अनैतिकतेचे विष इतके फैलावलेले आहे, की ते थोपविणे अवघडच आहे; परंतु त्याबद्दल विचार करण्याची सवड कोणालाच नाही. प्रतिपक्षभावनेत याबद्दल द्विविध विचार केला आहे. द्विविध म्हणजे दोन प्रकारांनी. एक तर, स्वत:ला वाईट वागणूक मिळाली, तर परिस्थिती काय होईल आणि दुसरे म्हणजे सद्वर्तणूक. हेच ते योगसंस्कार होत. नैतिकतेपासून दुरावलेला समाज सुधारेल तो योग संस्कारांनीच.
योगाभ्यास हा जीवनातील अविभाज्य घटक आहे. सर्वांनीच ‘योगी’ व्हावे, ही इच्छा बाळगणे म्हणजे टोकाची भूमिका होईल. ही अपेक्षा येथे मुळीच केलेली नाही. योग म्हणजे काय, हे समजून घेणे निश्चितच आवश्यक आहे. त्यातही ही विद्या आत्मसात करायची म्हणजे योग्य तर्हेने, क्रमबद्धतेने ती शिकणे आवश्यक आहे. साधनेलाही नेमून दिलेला एक क्रम आहे; म्हणूनच आसन-प्राणायामाद्वारे यम-नियमांवर अवलंबून असलेला सदाचार, वागणूक, स्वभावाला वळण लावणे इत्यादी गोष्टी लक्षात घेणे आवश्यक आहे. प्रत्येक व्यक्तीला स्वत:च्या अंत:करणात डोकावून बघण्याची मुभा आहे, स्वातंत्र्य आहे; परंतु धैर्य असायला हवे. ते साध्य होते आसन-प्राणायामाभ्यासाने.
अभ्यास आणि वैराग्य असे म्हटले, तर छातीत धडकी भरणे स्वाभाविक आहे; परंतु योग आचरत असताना, सराव करताना नको असलेल्या विषय-वस्तूंवर लोभ, मोह, वाईट सवयी, दुष्ट-प्रवृत्ती, उनाड वृत्ती, स्वैरता या सर्वांना फाटा देत, जीवनाला योग्य वळण देत पुढे जाता येते. हाच तो वैराग्याचा पाया होय. वैराग्य ही एक प्रकारे विचारशुद्धी होय. प्रलोभनांना बळी न पडणे, चुकीच्या मार्गाने द्रव्य-संपत्ती मिळविण्याची हाव न धरणे हेच ते वैराग्य होय. आपण स्वत:ला सुधारायला हवे, ही इच्छा प्रबळ होते ती वैराग्य-बीजानेच. योगसाधनेत एक महत्त्वाची गोष्ट आहे, ती म्हणजे अभ्यासाचे वजन हे वैराग्यापेक्षा जास्त असायला हवे. अभ्यास कमी पडला, की वैराग्य टिकत नाही. तसेच वैराग्यप्राप्ती होतही नाही. अभ्यास प्रथम, सराव आसन-प्राणायामांचा. येथे ध्यानाचाही उल्लेख करीत नाही, कारण ते योगांग इतर अंगांनंतरच येते. चित्ताला बळे-बळे ध्यानात नेता येत नाही.
या लेखमालेचे शीर्षक मुद्दामच ‘शांतियोग’ असे ठेवले आहे. अशांततेचे मूळ वासनेत आहे. धर्म, अर्थ, काम, मोक्ष आणि भक्ती या पाच पुरुषार्थांमध्ये आजच्या जीवनाचे ध्येय केवळ अर्थ आणि काम हेच आहे. ‘अर्थ आणि काम’ यांचा समावेश पुरुषार्थांमध्ये करताना या दोहोंना धर्म आणि मोक्ष या दोन पुरुषार्थांमध्ये संपुटीत केले आहे. याचाच अर्थ असा, की धर्म आणि मोक्ष या ध्येयरूपी कर्तव्यांच्या र्मयादा सोडून अर्थ आणि काम यांत गुंतायचे नाही; अन्यथा भक्तीची वाट बंद होते. मग राहते ती केवळ वासना! तेव्हा योगासने, प्राणायामादी करताना शुद्धाचरण-प्रवर्तक अशी ही दोन्ही अंगे मानव्य जपतात आणि अर्थ व काम यांना र्मयादेपलीकडे ताणत नाहीत, हे लक्षात घेणे आवश्यक आहे. ‘शांती’ प्राप्त करून घेणे ही आजची गरज आहे.
याच कारणास्तव, योगाचार्य सुरुवातीपासूनच योगशिक्षणाचा शालेय शिक्षणात समावेश करावा, असा आग्रह धरतात. प्रत्येक शालेय विषयांसाठी शैक्षणिक विशेष वर्ग उपलब्ध असताना योगाभ्यास का नाही? निरीक्षणातून असे लक्षात आले आहे, की लहान मुलांनादेखील अपचन, अजीर्ण, ताणतणाव, रक्तदाब, मधुमेह, दमा, सर्दी, ताप, खोकला वगैरे सर्व संभवते ते केवळ चुकीच्या जीवनपद्धतीमुळे. आज ऑफिसात रात्रीअपरात्री, वातानुकूलित खोलीत, संगणकावर काम करताना संभवणार्या आजारांना र्मयादा नाहीत. योगाचार्यांनी अनेक वर्षे सैनिकी शिक्षणात योगाभ्यासाचा समावेश व्हावा म्हणून प्रयत्न केले; परंतु समाजाची ओढच मुळी पाश्चात्त्य व्यायामाकडे. त्यामुळे आसनेदेखील एक प्रकारचा व्यायाम, असे गृहीत धरले जाते. अष्टांग योग हा व्यायाम म्हणून करायचाच नाही. अष्टांग योग ही शरीरापासून आत्म्यापर्यंत व्यक्तीमधील आंतरिक धागे शांती-समाधानाने जुळवून आणणारी महान कला आहे; शास्त्रशुद्ध कला आहे, जीवनकला आहे.
जेवण जसे षड्रसयुक्त असावे लागते, स्वादिष्ट व सात्त्विक असावे लागते; त्याचप्रमाणे योगाभ्यासतही सुख, शांती, समाधान, आनंद, एकाग्रता व भक्तिमय हृदय देणारे अंतर्विश्वासाठी अन्नब्रह्म आहे; ब्रह्मरस आहे. अंतराकाशात मुक्त संचार करू देणारे दिव्य-तेजस् आहे. तेव्हा ही योगाग्नीची मशाल पेटती ठेवणे भारतीयांचे काम आहे, कर्तव्य आहे, ‘धर्म’ आहे. एवढे सांगून मैत्र-भावनेने निरोप घेते.
(लेखक आंतरराष्ट्रीय कीर्तीचे योगाचार्य, लेखिका योगसाधनेचे तत्त्वज्ञान मांडणार्या विचारवंत आहेत.)