- डॉ. विजय साठे
नुकतेच दक्षिण अमेरिकेतील अर्जेंटिना या देशातील राजधानी ब्युनोस आयर्सच्या ८00 किलोमीटर दक्षिणेस चुबुस प्रांतामध्ये साडेनऊ कोटी वर्षांहून पूर्वीच्या अतिविशाल डायनोसॉरचे अवशेष मिळाल्याची बातमी प्रसिद्ध झाली आहे. पॅटागोनिया प्रदेशामध्ये ट्रिल्युच्या २५0 कि.मी. पश्चिमेस ला फ्लेंकाजवळच्या वाळवंटात प्रथम तिथल्या एका शेतकर्याला काही अवशेष आढळले. लवकरच शास्त्रज्ञांच्या पथकाने ‘घटनास्थळी’ जाऊन विधिवत उत्खनन केले. पथकाचे प्रमुख म्हणजे डॉ. जोस लुईस करबाल्लिडो आणि त्यांचे सहकारी डॉ. फेरुग्लो आणि डॉ. पोल. सारे शास्त्रज्ञ पुराजीवशास्त्र संग्रहालयात कार्यरत आहेत. सॉरोपोड कुळातील टिटॅनोसॉर गटातील नवीन प्रजातींचा हा शाकाहारी डायनोसॉर वजन आणि आकारमानाने जगातील सर्वांत मोठा मानला जात आहे. त्याच्या मांडीच्या हाडाच्या मोजमापावरून हा प्राणी ४0 मी. (१३0 फूट) लांबीचा आणि २0 मी. (६५ फूट) उंच असल्याचे सांगण्यात येत आहे. त्याचे वजन ७७ टनांएवढे होते आणि अशा अजस्र प्राण्यांची संख्या याच स्थळी एकूण ७ असल्याचे शास्त्रज्ञांनी सांगितले. अशा सात डायनोसॉरची एकूण १५0 हाडे अतिशय चांगल्या अवस्थेत जतन केलेली आढळून आली. १९८७मध्ये पॅटागोनियामध्येच सापडलेल्या याच कुळातील अजून एका डायनोसॉर प्रजातीचा शोध लागल्यावर त्याला ‘अर्जेंटिनोसॉरस’ हे नाव देण्यात आले होते आणि आजमितीपर्यंत आकारमानासाठी जगातील सर्वांत मोठा म्हणून त्याचेच अधिराज्य होते. अर्जेंटिनोसॉरस १00 फूट लांबीचा आणि ६0 टन वजनाचा असून, त्याच्या स्पर्धेला कोणी इतर डायनोसॉर उभा राहू शकत नव्हता. मात्र, या ‘नवीन डायनोसॉरने’ नक्कीच बाजी मारली, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. साडेसहा कोटी वर्षांहून पूर्वी नामशेष झालेल्या या प्राण्यांच्या अवशेषांचा शोध पहिल्यांदा १६७५मध्ये इंग्लंडमध्ये लागला. कॉर्नवेल येथे चुनखडीच्या खाणीचे खोदकाम चालू असताना कामगारांना मोठी हाडे मिळाली. त्यांचा अभ्यास करणारे प्रा. रॉबर्ट प्लॉट हे ऑक्सफोर्ड विद्यापीठात रसायनशास्त्र विषयाचे प्राध्यापक आणि एश्मोलियन संग्रहालयाचे अभिरक्षक होते. त्यांनी ही हाडे कुठल्या तरी ‘जायांट्स’ची किंवा मोठय़ा प्राण्याची असावीत, एवढेच सांगितले. जवळजवळ २२ वर्षांनी ऑक्सफोर्डशायर येथे सापडलेल्या (सॉरोपोड) दाताच्या अवशेषालाही १६९९मध्ये डॉ. एडवर्ड ल्यूड यांनी ‘जायांटचे हाड’ म्हणून मान्य केले. अजून तरी जायांट्सना एखादे नाव दिले गेलेले नव्हते. पुढे जवळजवळ ४0 वर्षांनी १८४२मध्ये लंडनचे प्रख्यात पुराजीवशास्त्रज्ञ सर रिचर्ड ओव्हन यांनी अशा विशालकाय प्राण्यांचे नामकरण संस्कार केले ते म्हणजे ‘डायनोसॉर’ लॅटिन भाषेत ‘डायनो’ म्हणजे भयानक आणि सॉर म्हणजे सरपटणारे, असा अर्थ होतो. हे खरोखरचे प्राणी होते का काल्पनिक, याविषयी प्राचीन काळापासूनच्या अनेक आख्यायिका आढळून येतात. अशा भल्या प्रशस्त प्राण्यांची हाडे सापडणे म्हणजे खरंच असे प्राणी अस्तित्वात होते का, अशी शंकासुद्धा त्यांना आली नसावी, असे दिसून येते. ‘डायनोसॉर’ याचा विचार केवळ काल्पनिक दानवांशी जोडला गेला आणि कलांतराने ‘ग्रिफिन’ नावाचा एक अत्यंत चपळ, वेगवान मांसाहारी चतुष्पाद उदयास आला.
डायनोसॉर जरी काळाच्या पडद्याआड गेलेले
प्राणी असले, तरी त्यांच्याविषयीच्या आख्यायिका, मिथकं ऐतिहासिक काळातील सामाजिक आणि
धार्मिक संकल्पनेविषयीच्या संशोधनाचा अत्यंत रोचक विषय ठरतो.
डायनोसॉर जगातील जवळजवळ सर्वच देशांच्या भूशास्त्रीयदृष्ट्या अतिप्राचीन मातीच्या खडकाच्या थरांमध्ये आढळून आले आहेत आणि त्याचाच अर्थ असा, की ते सर्वव्यापी आहेत! मात्र, जगाचा नकाशा पहिला तर भूखंडाच्या मध्ये-मध्ये व्यापलेला समुद्र बघता, या प्राण्यांना स्थलांतर पाण्यातूनच करावे लागले का? जगाचा भौगोलिक चेहरामोहरा कोट्यवधी वर्षांंहून पूर्वी आजपेक्षा काही वेगळा होता का? डायनोसॉरचा काळ नक्की कोणता? त्यांचे साम्राज्य केव्हा संपुष्टात आले आणि कशामुळे? त्यांचे आहार, वसतिस्थान आणि पक्ष्यांशी असलेले नाते, अशा विविध प्रश्नांची उत्तरे शोधण्यास मागोवा घ्यावा लागतो तो त्यांच्या ठोस पुराव्यांचा आधारावरून आणि ते म्हणजे डायनोसॉरची हाडे, सांगाडे, अंडी, घरटी, पुराविष्ठा आणि एवढेच नव्हे, तर त्यांच्या पायाचे ठसे जे आजही भारत आणि भारताबाहेर विविध देशांच्या समकालीन मातीच्या थरामधून आढळून येतात. त्यांचा जागतिक पातळीवरील विस्तार बघता त्यांच्यासाठी ‘विश्व हेचि माझे घर’ हे विधान युक्त वाटते! भारतात आढळणार्या डायनोसॉरच्या प्रजातीचे युरोप, अमेरिका आणि इजिप्त व मादागास्करमध्ये आढळून येणार्या प्रजातींशी साधम्र्य आढळून येते व प्राण्यांचा भौगोलिक विस्तार व्यापक असल्याचे दिसून येते.
आज डायनोसॉसरचे जगभरातून जवळ जवळ ७00 पोटगट आणि ३00 प्रकार (प्रजाती) ज्ञात आहेत. त्यातच ही नवीन भर आणि तीही अशा प्रजातीची जिला जगातील सर्वांत विशाल, महाकाय असल्याचा बहुमान मिळत आहे. डायनोसॉरची ज्ञात संख्या बघता संख्येत मोजके असूनही भारताचाही फार मोलाचा वाटा म्हणावा लागेल. आज भारतात आढळलेल्या प्रजातींची संख्या २५हून अधिक आहे. भारतातील डायनोसॉरचा सर्वांंत पहिला शोध लावला तो बंगाल सैन्यदलाचे ब्रिटिश अधिकारी कॅप्टन स्लीमन यांनी १८२८मध्ये जबलपूर येथे. कॅप्टन स्लीमन यांचे नाव मोठय़ा आदराने घेतले जाते. पहिला शोध लावणारे खरं तर पुराजीवशास्त्रज्ञ नसून ब्रिटिश सैन्यदेलाचे अधिकारी, वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञ मंडळी आणि काही भूशास्त्रज्ञ होते ज्यांनी जिज्ञासेपोटी छंद म्हणून अनेक वर्षे डायनोसॉरचे अवशेष जबलपूर आणि नागपूर तसेच चंद्रपूर (तेव्हाचा चांदा जिल्हा) जिल्ह्यातून शोधून काढले. मात्र, नंतरचा काळ म्हणजे १९१७ ते १९३३ हा जवळजवळ अडीच दशकांचा काळ भारतातील डायनोसॉरच्या संशोधनाचा सुवर्णकाळ मानला जातो. याच सुमारास आनंदवनापासून १५ कि.मी. दूरस्थित पिस्दुरा गावाच्या परिसरातून जवळजवळ ६00 हून अधिक डायनोसॉरच्या विष्ठेचे अश्मीभूत अवशेष शोधून काढले. डायनोसॉरचे अवशेष विविध स्वरूपांत आजही आढळत आहेत (ते म्हणजे सांगाडा-हाडे, अंडी-घरटी, पुराविष्ठा आणि पायांचे ठसे) भारतातील डायनोसॉरसमृद्ध प्रमुख स्थळे अरियालूर-तिरुचिरापल्ली जिल्हा (तमिळनाडू), आसिफाबाद- आदिलाबाद जिल्हा (आंध्र प्रदेश/तेलंगण राज्य) , चंद्रपूर-नागपूर जिल्हा (महाराष्ट्र राज्य), जबलपूर, धार, बडवानी, झाबुआ, निमाड जिल्हे (म. प्रदेश), खेडा आणि भुज जिल्हे (गुजरात) आणि जैसलमेर (राजस्थान) अशा अनेक भागांत विखुरलेली असून जगप्रसिद्ध ठेवा म्हणून ज्ञात आहेत. अशा या ‘डायनोसॉर प्रांतामध्ये’ १९८१मध्ये पहिल्यांदाच पिस्दुरा येथे अंड्यांचा शोध लागला. त्यातच अगदी १ वर्षापूर्वी भर पडली आहे ती जैसलमेर जिल्ह्यात आढळलेल्या प्टेरोसॉरच्या पायाच्या ठशांची! अशा प्रकारे पूर्व ट्रायेसिक (२३.५ कोटी) ते उत्तर क्रिटेशन (६.११ कोटी वर्षे) या कालखंडातील डायनोसॉरच्या उत्क्रांती, पर्यावरण, वसतिस्थाने, आहार, व्यवहार आणि नामशेष होण्यामागची कारणे शोधण्यास महत्त्वाचे धागेदोरे हाती लागले आहेत. अंड्याच्या खालोखाल दुसरा अतिशय महत्त्वाचा शोध लागला प्राचीन सर्पाचा! साप टिटॅनोसॉरची अंडी आणि पिले खाण्यासाठी वारंवार घरट्यांभोवती चकरा मारीत. नुकतेच जैसलमेर येथे प्टरोसॉरच्या पावलाचे (पायाचे) ठसेही आढळून आले. त्यांच्यापैकी एकाचा ठसा ५ सेंटिमीटर परिघाचा असून दुसरा मांसाहारी डायनोचा ३0 सीएम आकारमानाचा आहे. ५ सेंटिमीटर असणार्याचा आकार एखादी कोंबडी एवढा असावा, असे मत संशोधकांनी व्यक्त केले आहे. डायनोसॉरच्या पायांच्या/पंजाच्या/पावलांच्या ठशांविषयी अनेक संशोधनात्मक निबंध आणि पुस्तके आज उपलब्ध आहेत आणि त्यावरून असे दिसून येते, की हा प्राणी म्हणजे डायनोसॉर बहुतांशी सामाजिक प्राणी असावा.
जवळजवळ १0 कोटी वर्षे संपूर्ण जगात आणि ‘तिन्ही लेकांत (जल, भूचर, आकाशात उडू पाहणारे सुरुवातीचे डायनोसॉर)’ अधिराज्य गाजविणारे हे विशाल प्राणी ६.५ कोटी वर्षांंच्या सुमारास जगातून नामशेष झाल्याचे सिद्ध झाले आहे. नामशेष झाले हे एक वास्तवच’ परंतु कशामुळे, या प्रश्नाचे उत्तर अजूनही हवे तेवढे समाधानकारक नाही, असा दावा आजही शास्त्रज्ञ करीत आहेत. सध्या बर्यापैकी लोकमान्य पुरावा म्हणजे उल्कापाताचा, अस्मानी संकटाचा. जे केवळ एकदाच व एकाच ठिकाणी नव्हे तर जगात अनेक ठिकाणी घडून गेल्याचे पुरावे आहेत. प्रागैतिहासिक काळापासून आलेल्या अनेक नैसर्गिक संकटांच्या भूगर्भशास्त्रीय आणि जीवाश्मांच्या शास्त्रीय नोंदी आपल्याला माहीत आहेतच. मेक्सिको येथील युकातीय द्वीपाशेजारी अस्तित्वात असलेले भलामोठे विवर हे जगप्रसिद्ध आहे. क्रीटेशस काळातील शेवटच्या टप्प्यात याच परिसरात प्रचंड मोठा उल्कापात झाला. त्याचा परिणाम म्हणजे १११ कि.मी. परिघाचे जमिनीत एक मोठे विवर तयार झाले. परिणामी, सर्वत्र लागलेली प्रचंड आग, गरम तप्त
वाफा आणि टोक गाठलेले जीवघेणे तापमान अर्थातच टी रेक्स आणि ट्रायसिरेटॉप नावाच्या डायनोसॉरच्या मृत्यूला कारणीभूत ठरले. त्या परिसरात या डायनोसॉरची ‘वसाहत’ मोठय़ा संख्येने असल्याचे दिसून आले. त्यांच्या मोठय़ा संख्येने आढळणार्या जीवाश्मावरून अमेरिका निवासी टॅक्सस विद्यापीठातील भारतीय शास्त्रज्ञ डॉ. शंकर चटर्जी यांच्या अलीकडच्या संशोधनातून दिसून आले, की भारताच्या पश्चिम भागात साडेसहा कोटी वर्षांंपूर्वी जवळजवळ ४0 कि.मी. परिघाची उल्का मुंबईजवळ समुद्रात कोसळली. लोणारच्या विवरापेक्षा किती तरी मोठे विवर तयार झाले. ‘शिवा क्रेटर’ म्हणून
ओळखले जाणारे क्रिटेशन्स अस्मानी संकट म्हणजे हेच ते उल्काजन्य विवर. संकटांची जणू संक्रांतच
येऊ घातली होती. जवळजवळ ३0 हजार वर्षे
सतत चालणारा ज्वालामुखीचा स्फोट आणि
उद्रेक आणि ज्याची महाराष्ट्राला मिळालेली देणगी म्हणजे सह्याद्रीच्या पर्वतरांगा. मात्र, सजीवांचा व त्यातूनसुद्धा डायनोसॉरचा सर्वनाश हा जणू अपरिहार्यच ठरला.
(लेखक डेक्कन कॉलेज, पदव्युत्तर आणि संशोधन संस्थेमध्ये प्राध्यापक व पुराजीवशास्त्रज्ञ आहेत.)