- भारती आचरेकर
स्मिता गेली! माझा विश्वास बसत नाहीये! खरं तर... वस्तुस्थिती मलाच काय तिलाही ठाऊक होती... जाणीव होती, स्मिताची झुंज दुर्धर आजाराशी चालू आहे, तिला बोलावणे येऊ शकते, ती निरोप घेईल; पण माझे मन हे भयंकर सत्य मानण्यास अजूनही तयार नाहीये.
स्मिताची आणि माझी किमान ४0 वर्षांची मैत्री. अवघे आयुष्यच आम्ही एकमेकींसोबत ‘शेअर’ केलंय. आमच्या जीवनात असं काही उरलंच नव्हतं, जे
एकमेकींना माहीत नाही! चार दशकं मी तिला ओळखतेय, तिने माझे जीवनच व्यापून टाकले होते. माझे स्मितहास्याचे ते झाड आज उन्मळून पडलंय!
दूरदर्शन केंद्रावर मी निर्माती होते, त्या वेळेस ती ‘न्यूज रीडर’ होती. त्या वेळेस तिचे नाव स्मिता गोविलकर होते. तिची आणि माझी दूरदर्शन केंद्रावरची ती पहिली भेट. त्या पहिल्या भेटीतही तिने मला आपलेसे केले; कारण तिची रोखठोक बोलण्याची पद्धत माझ्या तेव्हाच लक्षात आली. हळूहळू आम्ही दोघी जीवलग मैत्रिणी बनलो. आमच्या दोघींच्या आयुष्यात खूपसं साम्य होतं. कदाचित, हा एक दैवीयोग असावा!! कोण जाणे! आपापली कामं आटोपली, की आमची भेट व्हायची. मन मोकळे करत असू आम्ही. तिचा वैयक्तिक आणि प्रोफेशनल विकास डोळ्यांत मावण्याजोगा नव्हता. तिने वेळोवेळी घेतलेली झेप कुणालाही थक्क करणारीच होती. जीवन अगदी सोम्या-गोम्यादेखील जगतोच; पण वय वर्षं वीस ते वय वर्षं पन्नास या तीस वर्षांमध्ये तिने घेतलेली उडी भल्या-भल्यांना बुचकळ्यात टाकेल अशी होती. तीस वर्षांमध्ये तिने तीन जन्माचे सर्मथ आयुष्य जगून घेतले. ती नावाप्रमाणे स्मिता होती. खंबीरपणे तिने जीवनाचा लढा लढला. रुग्णालयाच्या बेडवर पडल्या-पडल्यादेखील तिच्या डोक्यात अनेक योजना घोळत असायच्या. गेले काही महिने तिने शक्यतो भेटी टाळल्या, तिला भेटी नकोशा झाल्या असं नव्हतं, तर तिला वाटत होतं, अभ्यागतांना जंतू प्रादुर्भाव होऊ नये.
माझ्यात आणि स्मितात एक व्यक्त आणि अव्यक्त मैत्री होती. कसलीही अपेक्षा न धरता आमची मैत्री फुलत गेली, बहरत गेली. आमच्यातली मैत्री निकोप होती, मीच तिच्याकडून शिकत गेले. कुणाचा हात-बोट गिरवत न शिकविता तिच्यातल्या आदर्शत्वाची कुणालाही अदृश्य भुरळ पडावी असंच तिचं जादुई व्यक्तिमत्त्व होतं, तसाच आवाका होता. स्मिताने हातात घेतलेले काम होणारच, ही खात्री असायची! स्मिताच्या आणि माझ्या वैयक्तिक जीवनात काही योगायोग असे घडलेत ज्यामुळे नियतीने आम्हाला अधिक जवळ आणले. माझे पती गेले, स्मिताचे पती इहलोक सोडून गेले, तिने आणि मी आमच्या मुलांना या आघातानंतरही वाढवलं. फायटिंग स्पिरीट काय आणि कसं असतं, याचं स्मित म्हणजे मूर्तिमंत उदारहण होती. माझे पती गेल्यानंतर मी पुढे काय करायचं? म्हणून हातपाय गाळून बसले होते. स्मिताने माझी मरगळ झटकली, धीराने जगायला शिकवलं. तिच्या खेळकर व्यक्तिमत्त्वावर पडलेली मृत्यूची छाया मला झाकोळून टाकत होती. शेवटी मी तिला म्हटले, ‘स्मिता, आता थांब थोडी ग! विश्रांती घे, बरी झालीस की मग पाहू पुन्हा.’ पहिल्यासारखी कामं होणार नाहीयेत आता. सत्याचा स्वीकार कर. पूर्ण बरी झालीस की मग सुरू कर. तुझ्यातली धडाडी तुझ्या मुलांकडे नसेल, तुझे संपर्क त्यांचे नसतील. कारण, प्रत्येक व्यक्ती वेगळी असते. मग, ती तुझी मुलं का असेनात. स्मिताला ते कदाचित पटले असेल, तिचे ते क्षीण झालेले स्मित माझा जीव कापराप्रमाणे जाळत गेली. तिला क्लेश झाले असतील माझ्या बोलण्याने; पण तिने तिच्या मनालाही शेवटपर्यंत विश्रांती दिली नाही. स्मिताची दुसरी केमोथेरपी सुरू झाली. माझा श्वास अडकू लागला. अवघ्या ७-८ महिन्यांपूर्वी स्मित जपानला जाऊन आली होती. ‘रेकी’वर तिने खूप संशोधन केलं होतं. त्यातही तिला पुढे काम करायचं होतं.. एकाच आयुष्यात अनेक आयुष्यं अतिशय यशस्वीपणे जगलेली, नाही गाजवलेली माझी स्मिता एक अजब तरीही प्रिय रसायन होतं! कुठे शोधू मी आता माझं स्मित !!
(लेखिका ज्येष्ठ अभिनेत्री आहेत.)