शहरं
Join us  
Trending Stories
1
ओबीसी आंदोलक नवनाथ वाघमारे यांची गाडी अज्ञात व्यक्तीने पेटवली; जालन्यातील घटना
2
Monsoon update: यंदाची दिवाळी पावसातच जाणार का? मान्सून भारतातून कधी परत जाणार?
3
डोनाल्ड ट्रम्प अन् इलॉन मस्कची 'दिलजमाई' झाली? चार्ली किर्कच्या शोकसभेत दिसले एकत्र! ‘तो’ एक फोटो चर्चेत
4
'या' ग्राहकांना हेल्थ इन्शुरन्सवर GST माफीचा फायदा नाही; आरोग्य विम्या कंपन्यांनी केलं स्पष्ट
5
"पैसे कमावतो, टॅक्स भरतो; चोरी करत नाही...", तगड्या कमाईवरुन अक्षय कुमारचं स्पष्टीकरण
6
FD-RD विसरुन जाल, LIC ची ही स्कीम आहे जबरदस्त, मुलीच्या लग्नासाठी मिळेल २७ लाखांची रक्कम
7
फक्त गरबाच खेळा...हुल्लडबाजी नको; दांडियामध्ये साध्या वेशात महिला पोलीस सहभागी होणार
8
H-1B व्हिसाने हैराण झालेल्यांना चीनची ऑफर; भारतीयांसाठीही मोठी संधी! काय आहे नवा ‘के- व्हिसा’?
9
Viral News: एका उंदरामुळं इंडिगोच्या विमानाला साडेतीन तास उशीर, नेमकं काय घडलं?
10
आम्ही गरिबीत, तुमची मौज का? आणखी एका देशात लोक रस्त्यावर; जनतेच्या पैशाची लूट, पसरला असंतोष
11
अमूलनं बटर, तूप, चीज, आईस्क्रीम आणि चॉकलेटच्या किमती केल्या कमी; प्रत्येक वस्तूवर किती बचत होणार? जाणून घ्या
12
बगराम तळावरून सुरु झाला नवा संघर्ष? डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीवर तालिबानचे प्रत्युत्तर
13
शेअर बाजारात मोठी घसरण, Sensex ४७५ अंकानी आपटला; Nifty मध्येही घसरण, IT शेअर्समध्ये जोरदार विक्री
14
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींवर नवदुर्गा कृपा, पद-पैसा-लाभ; अकल्पनीय यश, अनपेक्षित भरभराट!
15
"आता जे गरजेचं ते करावंच लागेल"; सरसंघचालक भागवत अमेरिकेच्या टॅरिफ आणि 'एच१ बी'बद्दल स्पष्टच बोलले 
16
Mumbai: गावी जाण्यासाठी पैसे देण्यास नकार दिल्यानं पत्नीची हत्या; कांदिवली येथील घटना!
17
देवोलिना भट्टाचार्जी पुन्हा प्रेग्नंट? फोटोशूटवरुन चर्चांना उधाण; ९ महिन्यांपूर्वीच दिला मुलाला जन्म
18
नौशादनं 'आकाश' बनून फसवलं, एका मुलाच्या आईसोबत लग्न केलं अन् ४ मित्रांसोबत मिळून...; घटना ऐकून येईल चीड!
19
आजपासून 'GST' उत्सव! मध्यम वर्गाला होणार मोठा फायदा; खरेदी वाढणार, अर्थव्यवस्थेला बूस्टर मिळणार
20
पाकिस्तानच्या नाकी नऊ आणणाऱ्या अभिषेक शर्माचा नावावर विश्वविक्रमाची नोंद, युवराजलाही टाकले मागे

भगवानगड भक्तांना काय मिळाले?

By admin | Updated: October 14, 2016 15:12 IST

भगवानगडावर पोहोचले की कोणाला ‘समर्थक’, कोणाला ‘लाल’ दिवे, कोणाला ‘भक्त’, तर कोणाला ‘मंत्रिपदे’ मिळतात, अशी अनेकांची ‘श्रद्धा’ आहे. पण भाविकांचे काय?

 - सुधीर लंके

भगवानगडावर पोहोचले की कोणाला ‘समर्थक’, कोणाला ‘लाल’ दिवे, कोणाला ‘भक्त’, तरकोणाला ‘मंत्रिपदे’ मिळतात, अशी अनेकांची ‘श्रद्धा’ आहे. पण भाविकांचे काय?यंदा तर अनेकांना महाप्रसाद, प्यायला पाणीही मिळाले नाही.समाधीपर्यंतही पोहोचता आले नाही.सीमोल्लंघनाच्या दिवशीचअनेक मर्यादांचे उल्लंघन झाले.हे असेच चालू राहिले, तर यापुढेकोणाला काय मिळेल हे सांगता येणार नाही.भगवानगडावर आले की मंत्रिपद मिळते, हे परवाच्या दसरा मेळाव्यात पंकजा मुंडे, महादेव जानकर, राम शिंदे व सदाभाऊ खोत यांनी जाहीरपणे सांगितले. मंत्रिपदासाठीचा एक नवाच निकष या सर्वांनी महाराष्ट्रासमोर आणला आहे. आपल्या धर्माचे, आध्यात्मिक स्थळांचे व परंपरांचे कसे राजकीयीकरण सुरू झाले आहे याचा हा पुरावा मानता येईल. भगवानबाबांनी हा गड भक्तीची परंपरा देण्यासाठी काढला होता, की लाल दिवे देण्यासाठी? याचे उत्तर या सर्वांना द्यावे लागेल. भगवानगडावर नेहमीप्रमाणे याही दसऱ्याला हजारो लोक जमले होते. उन्हातान्हात दूरवरून ही माणसे एका श्रद्धेपोटी आली होती. अनेक ऊसतोड कामगार समाधीसमोर डोके टेकविल्याशिवाय आपला ऊसतोडीचा हंगाम सुरू करत नाहीत. पण या भाविकांची यावर्षी हेळसांड झाली. प्रचंड पोलीस बंदोबस्तामुळे अनेकांना भगवानबाबांच्या समाधीचे दर्शन घेता आले नाही. गड आणि भाविक यांच्यामध्ये पोलिसांची एक भिंत उभी होती. भीतीपोटी आम्ही समाधीपर्यंत गेलो नाही, असे गडावर भेटलेल्या अनेकांनी सांगितले. आकाशातील हेलिकॉप्टरच्या फेऱ्या पाहून व नेत्यांची भाषणे ऐकून गर्दीला परतावे लागले. दरवर्षी गडावर महाप्रसाद मिळतो. पण यावेळी तोही मिळाला नाही. अनेकांना तर पाणीसुद्धा मिळाले नाही. भगवानगडावर भाविकांची गैरसोय झाली. पण मग नेमका फायदा कुणाचा झाला? भगवानबाबा हे वंजारी समाजातील होते. त्यांनी १९५८ साली या गडाची उभारणी केली. गड म्हणजे हे आध्यात्मिक ठिकाण आहे. भगवानबाबांनी आयुष्यभर जातपात पाळली नाही. एकमेकांचा द्वेष करू नका, शिका, असा संदेश त्यांनी या गडावरून सर्वच समाजाला दिला. अंधश्रद्धेवर प्रहार केला. आपल्यानंतर गडाच्या गादीवर त्यांनी भीमसिंह महाराजांना उत्तराधिकारी नेमले. ते रजपूत समाजाचे होते. यातूनच भगवानबाबांचा पुरोगामी दृष्टिकोन दिसतो. प्रत्येक समाज हा अस्मिता व प्रतीके शोधत असतो. वंजारी समाजाने भगवानबाबांना आपले दैवत, अस्मिता व प्रतीकमानले. इतर जातींकडे संत होते. पण वंजारी समाजाकडे स्वजातीतील संत नव्हते. भगवानबाबा हे त्यांचे पहिले संत. अर्थात संतांना जातीपातीत मर्यादित करणे योग्य नाही. म्हणूनच सगळेच जातिधर्म भगवानबाबांना मानतात व दसऱ्याला न चुकता गडावर येतात. पण ही सगळी गर्दी आपणाला मंत्रिपद मिळवून देण्यासाठी जमते, असे नेत्यांनी परवाच्या मेळाव्यातील भाषणांतून ध्वनित केले. भगवानबाबांचे भक्त हे आपले समर्थक आहेत, असे बहुधा या नेत्यांना सांगायचे होते. भगवानगडावर हा मेळावा सुरू असतानाच माजी मंत्री सुरेश धस यांनी नगर जिल्ह्यातच मायंबागडावर दसरा मेळावा घेतला. तेही धार्मिक ठिकाण आहे. असे पायंडे निर्माण होऊन यातून वारकरी परंपरेचेच राजकीयीकरण होण्याचा व ती दूषित होण्याचा मोठा धोका आहे. आळंदी, पंढरपूर येथेही यात्रांच्या दिवशी हळूहळू असे राजकीय मेळावे सुरू होतील व ही गर्दी आपणासाठीच जमली असे भासविले जाईल.आजचे महंत नामदेवशास्त्री यांनी गोपीनाथ मुंडे यांच्या मेळाव्यांना कधीही विरोध केला नाही. उलट तेही मुंडे यांच्यासोबत व्यासपीठावर असायचे. त्यामुळेच महंतांच्या आजच्या भूमिकेबाबत शंका घेतल्या गेल्या. मुंडे यांनी या गडाचा विकास केला व वंजारी समाजाला सत्तेची, प्रगतीची स्वप्ने दाखविली ही एक दुसरी बाजूही नाकारता येणार नाही. मुंडे हे लोकनेते असल्याने व संघर्षातून पुढे आले असल्याने त्यांच्या मेळाव्यांना समाजमान्यता मिळाली होती. मुंडे यांच्यानंतर गडावरील मेळाव्याची परंपरा सुरू ठेवण्यास महंतांचा विरोध आहे. त्याचे कारण गोपीनाथ मुंडे व पंकजा या दोघांत असणारा एक स्वाभाविक फरक. मुंडे यांच्याइतका संघर्ष पंकजा यांनी केलेला नाही. त्यांच्याच तोलामोलाचे अन्यही नेते समाजात आहेत. त्यामुळे पंकजा यांच्या मेळाव्याला परवानगी कशी द्यायची? हा पेच महंतांसमोर असल्याचे महंतांच्या समर्थकांचे म्हणणे आहे. पंकजा यांनी परळीत ‘गोपीनाथगड’ काढल्याने आता राजकीय संघटन भगवानगडाऐवजी त्या गडावरून करावे, असा पर्याय त्यासाठी महंतांनी दिला. पण पंकजा व त्यांचे समर्थक आता भगवानगडाचा वारसा सोडायला तयार नाहीत. भगवानगडावरील आयती गर्दी का सोडायची, हा राजकीय हिशेब यामागे असू शकतो. गोपीनाथगडावर गर्दी जमेल की नाही ही शंकाही त्यांना कदाचित असू शकते. पंकजा यांना विरोध करण्यामागे पवार कुटुंबीय, धनंजय मुंडे अथवा मुख्यमंत्री हे बोलविते धनी आहेत, असाही एक तर्क आहे. ती शक्यताही नाकारता येत नाही. पण या सगळ्या राजकीय वादात या गडाची भक्ती परंपरा संकुचित होत आहे. महंत, पंकजा यांच्या अनेक आॅडिओ ‘क्लिप’ व्हायरल केल्या गेल्या. त्यातील या दोघांचीही भाषा ही सभ्य व संसदीय नाही. या गडाला ‘ओबीसी’ समाजाचा गड असे संबोधले जात आहे. हीही एका अर्थाने मर्यादाच घातली गेली आहे. परवाच्या मेळाव्यातील सर्व भाषणे ही प्रबोधनापेक्षा राजकीय द्वेषाने भरलेली होती. जानकर व शरद पवार यांच्यातील लढाई सर्वश्रुत आहे. ती लढाई लढण्याचे भगवानगड हे ठिकाण नाही. पण मंत्री म्हणून जानकरांनी ते भान पाळले नाही. भगवानगड हा पवारांविरोधात आहे, असाच संदेश जानकरांनी देऊ केला. यातून नाहक सामाजिक संघर्षही होऊ शकतो. मंत्र्यांनी निव्वळ टीकाटिपण्णीवर भर दिला. गडाने मंत्रिपद दिले. पण ते मिळाल्यानंतर राज्यासाठी काय केले? ऊसतोड कामगार किंवा वंचितांच्या विकासासाठी काय अर्थनीती व कृतिकार्यक्रम राबविला? हे सांगता आले असते. समुदायाला दिशा देता आली असती. पण तसे न करता भडकाऊ, टाळ्याखाऊ भाषणे केली गेली. पंकजा यांनी ऊसतोड कामगारांबाबत काही मुद्द्यांना स्पर्श केला, पण तोही ओझरता. आम्ही तुमच्यासाठी आहोत, तुम्ही आमच्या मागे रहा, तरच आम्हाला मंत्रिपदे मिळतील, असा थेट संदेश या नेत्यांना द्यायचा होता. भक्तीपेक्षाही या सर्वांचा स्वार्थ सत्तेत अधिक दिसला. सत्ताधारी असूनही या सर्वांनी विरोधक असल्याप्रमाणे भाषणे केली. सीमोल्लंघनाच्या दिवशी मर्यादांचे उल्लंघन केले. अनेक समर्थक अंधश्रद्धाळू असतात. त्याचा गैरफायदा घेतला जात आहे की काय, अशी शंका या मेळाव्याने निर्माण केली. गडावर राजकीय भाषणे नकोत, या महंतांच्या म्हणण्याला या सर्वांनी आपल्या भाषणांतून एकप्रकारे पुष्टीच देण्याचे काम केले. पवार, धनंजय मुंडे व मुख्यमंत्री पडद्याआडून राजकारण करत असतील, तर मेळाव्यातील नेत्यांनी भाविकांच्या गर्दीवर स्वार होऊन पडद्यासमोर केले एवढाच फरक आहे. त्यामुळेच सर्वसामान्य माणसाला या मेळाव्यातून काय मिळाले, हा प्रश्नच आहे. महंत व पंकजा यांच्यातील वाद बाजूला ठेवून कायदा काय म्हणतो तेही या प्रकरणात बघावे लागेल. या वादाला अंतर्गतही अनेक कारणे असल्याचे बोलले जाते. हे राजकारण असेच चालत राहिल्यास गर्दीचा भ्रमनिरास व्हायला वेळ लागणार नाही. लोक भगवानबाबांचे भक्त राहतील, पण नेतेमंडळींवरची भक्ती अशीच टिकेल की नाही, हे सांगता येत नाही.भगवानगडावर आज दोन्ही बाजूंनी राजकारण सुरू आहे, असे सर्वसामान्य भाविकांना वाटते. गडावर दसऱ्याची परंपरा ही भगवानबाबांनी स्वत: सुरू केलेली आहे. भाविकांनी एकत्र येऊन गडाची दीक्षा घ्यावी, गुरुमंत्र घ्यावा असे या मेळाव्याचे स्वरूप होते. युती शासन येण्यापूर्वी गोपीनाथ मुंडे यांनी संघर्ष यात्रा काढली. त्या काळात ते गडावर आले होते. युती शासन आल्यानंतर गडावर मुंडे यांच्या उपस्थितीत एक कार्यक्रम झाला. तेव्हापासून मुंडे यांच्या भाषणाची परंपरा सुरू झाली. मुंडे असतानाही ‘हा भगवानगड आहे, की गोपीनाथगड?’ असे प्रश्न उपस्थित झाले होते. मुंडे व माजी मंत्री बबनराव ढाकणे यांचा गडावर १९९८ साली वादही झाला होता. ‘राजकीय परंपरा पाडू नका, त्यातून गड लहान होत जाईल’, असा ढाकणे यांचा आक्षेप होता.