अभिराम भडकमकर
टीव्ही ही आमच्या लहानपणी कुतूहलाची गोष्ट होती. आमच्या कोल्हापुरात तेव्हा टीव्ही आलासुद्धा नव्हता. पण सिनेमा, कादंबर्यातून टीव्हीचा परिचय होता. म्हणजे यातल्या फक्त श्रीमंत पात्रांकडे तो असायचा. ते श्रीमंती आणि स्टेटसचं सिबल होतं. मुंबईला मावशीकडे जायचं आकर्षण टीव्हीमुळेही असायचं. टीव्हीवरचा चित्रहार आणि सिनेमा याचं तर अप्रूपच होतं. त्याकाळात फक्त संध्याकाळी काही वेळच दिसणार्या त्या कृष्णधवल संचावर ‘जिव्हाळा’ आणि ‘मेरा साया’ पाहिल्याचं अजूनही आठवतं. गजरा वगैरे ही जोरात होतं.
पण एशियाडनंतर टीव्ही सार्वजनिक झाला. रंगीत झाला. ‘मंडी हाऊस’ हे व्हाईट हाऊसइतकं फेमस झालं. मी एनएसडीत प्रशिक्षण घ्यायला गेलो तेव्हा तर मंडी हाऊस आमच्या शेजारीच होतं. एका सुट्टीत पुण्यात आलो तेव्हा सहजच ‘माणूस’च्या श्री. गं. माजगावकरांची भेट झाली. एका मित्राला काही लेख वगैरे द्यायचा होता. तेव्हा ‘तमस’ मालिकेवरून रण माजलं होतं. गप्पांच्या ओघात सहज ते म्हणाले, ‘‘मंडी हाऊसवरच एक लेख द्या ना आमच्या टीव्ही विशेषांकात!’’
- आणि मी टीव्ही माध्यमाचा लेखासाठी म्हणून गंभीर विचार करू लागलो. लेख आला, वाचकांना वेगळा वाटला. पण तेव्हापासून माझ्या मनात या माध्यमासंदर्भात कळत नकळत एक चिंतन सुरू झालं ते आजपर्यंत.
दरम्यान, प्रशिक्षण संपवून मी मुंबईत दाखल झालो. तोवर टीव्ही चांगलाच रूळला होता. नाटकवाल्यांना ते एक चांगलं उपजीविकेचं माध्यम उपलब्ध झालं होतं. मीही अभिनेता लेखक म्हणून काम करू लागलो. ‘रास्ते’ ही वपुंच्या कथांवर आधारित मालिका मी लिहिली. ‘चाणक्य’, ‘सीआयडी’, ‘सैलाब’मध्ये भूमिका केल्या. एकूणच तेव्हाच्या केवळ तेरा भागांच्या मालिकांपासून ते आजचा डेली सोप्स व रिअँलिटी शोपर्यंतच्या टीव्हीच्या प्रवासात मी एक साक्षीदार आणि सहभागीही आहे. आता खरं वाटणार नाही पण तेव्हा निर्मात्याला मालिकेची कथा ऐकवली की त्याचा पहिला प्रश्न असायचा,
‘‘ही तेरा भागांपर्यंत जाईल ना? म्हणजे त्यात तितका विस्तार होण्याचं पोटेंशिअल आहे ना?’’
- या प्रश्नाचं आजच्या लेखकांना हसूच येईल. कारण जगातली कुठलीही कथा आज हजारो भागांपर्यंत (ताणली) जाऊ शकते. आणि हो, त्यावेळी कथा निर्मात्याला ऐकवायला लागायची. हे सगळं कविकल्पनेतलं वाटेल आज, पण कथा निर्माता निवडायचा. मग दिग्दर्शक लेखकांकडून भाग लिहून घ्यायचा. तोच पात्रांची निवड करायचा. तोच ठरवायचा मालिकेचा लूक कसा असेल. सर्व कलात्मक निर्णय हे दिग्दर्शकाचे असायचे. इपी म्हणजे एक्झिक्युटिव्ह प्रोड्यूसर नामक जमात तेव्हा फक्त मालिकेच्या मार्केटिंगच्या संदर्भात काम करायची. ती कलावंत, तंत्रज्ञ आणि चॅनल यांतला दुवा असायची. आज फक्त इपीजच सगळं ठरवतात. अगदी दिग्दर्शकानं कुठे क्लोज लावायचा, पडद्याचं कापड कुठल्या रंगाचं इथपासून ते कलावंत कोण इथपर्यंत. लेखकाने कथा कशी फुलवायची, त्यातले टर्न्स आणि ट्वीस्टससुद्धा! एका निर्मात्यानं परवा म्हटलंच की, ‘आजकाल निर्माते संपले, आणि उरले फक्त प्रॉडक्शन मॅनेर्जस.’ मी तसा खूपच सुखाचा आणि स्वातंत्र्याचा काळ पाहिलाय. मालिकेच्या एका भागाचं दोन दोन दिवस चित्रीकरण चालायचं. कलावंतांना आठवडाभर आधी स्क्रिप्टस जायची. दिग्दर्शक नवनव्या कल्पनांनी भारून गेलेला असायचा. मुख्य म्हणजे दुसर्या वाहिनीवर जे चाललंय त्यापेक्षा आपल्या वाहिनीवर काही वेगळं आणि जास्त चांगलं देण्यासाठी चॅनलवाले धडपडत असायचे आणि चॅनलचे हेड्स मुळात नाटक, सिनेमा, डॉक्युमेंट्रीज अशा पार्श्वभूमीतून आलेले असायचे. (प्रेमचंदांच्या कथा सबमीट केल्यावर प्रेमचंदांचा बायोडाटा द्या किंवा ग. दि. माळगूळकरांना भेटायला पाठवा असं फर्मावणारे इपीज नंतर आले.) सर्व प्रकारच्या प्रेक्षकाला काही ना काही देण्याचा प्रयत्न असायचा. साहित्याशी टीव्हीची नाळ जोडायचा प्रयत्न होता. ‘एक कहानी’, ‘रास्ते’, ‘मालगुडी डेज’ अशी कितीतरी यशस्वी उदाहरणं दिसत होती. छोटा पडदा हा अभिरुची निर्माण करायचा प्रयत्न करताना दिसत होता. भारताच्या मातीतलं काही अस्सल द्यायच्या प्रयत्नात होता. आता एका वाहिनीवर मालिकेतल्या सुनेनं ‘गाजर का हलव्यात’ मीठ घातलं की दुसर्या वाहिनीनं कथा बदलून सुनेला खिरीत मीठ घालायला लावलंच म्हणून समजा. सर्वच वाहिन्या एका अस्पष्ट अंधारात प्रवास करताहेत. नेमकं काय करायचं हे न कळल्यामुळं येणार्या एका असुरक्षिततेतून हे घडत असेल का?
डेली सोप्स येईस्तोवर खरंच चांगलं चाललं होतं. तेरा भागांच्या मालिकांनंतर सत्तर किंवा दीडशे भागांच्या मालिका पाहिल्या. पण त्या कथा संपली की थांबायच्या. आमची ‘साया’ यशस्वी असूनही आम्ही एकशेतीस भागांनंतर पाणी घालून वाढवली नाही. ‘सैलाब’, ‘टीचर’ही वेळेत संपल्या. पण डेली सोप्स आले आणि सगळंच बदललं. गुणवत्ताही आणि अर्थकारणही! याच काळात इपीला अनन्यसाधारण महत्त्व आलं. आज सर्व निर्णयांची जबाबदारी इपीची, तर अपयशाची जबाबदारी (मात्र) निर्मात्याची असते. पण या सगळ्यातला महत्त्वाचा घटक प्रेक्षक, त्याने मात्र हे सगळं बिनबोभाट स्वीकारलं होतं. जे दाखवाल ते पाहू अशी भूमिका स्वीकारली होती. रोज मालिकेला शिव्या द्यायच्या आणि ‘तेच तेच दाखवतात हो’ म्हणत टीव्हीपुढे बसायचं व्रत अंगीकारलं होतं. व्याख्यान, परिसंवाद, पुस्तकं, आप्तांच्या गाठीभेटी सगळं दुय्यम होऊन गेलं. टीव्ही दारूसारखी गरज/व्यसन होऊन बसला.
बर जे वाईट, कंटाळवाणं त्याला नावं ठेवणारे हेच प्रेक्षक ‘पिंपळपान’, ‘नक्षत्रांचे देणे’ सारख्या मालिकांच्या मागे ठामपणे उभे राहिले नाहीत. त्यामुळे जे खपतं तेच दिलं जाऊ लागलं. इकडे कलात्मक निर्णयात सहभागच नाकारला जाऊ लागल्याने कसदार लेखक, माध्यमावर हुकमत असलेले दिग्दर्शक आणि स्वाभिमानी निर्माते या खेळातून बाजूला झाले किंवा फेकले गेले म्हणा. नटांनी ‘काय करायचं, पर्यायच नसतो’ म्हणत डेलीसोप्सचा मार्ग धरला. आणि ‘नाटक करायचंय रे, त्यातच खरी मजा’ असे मुलाखतीपुरते डायलॉग्ज त्यांच्या तोंडात रुळू लागले. डेलिसोप्सना महिना महिन्याचा सलग, अखंड वेळ देणारे, रात्रंदिवस राबवून घेतलं तरी मुकाट काम करणारे कलावंत नाटकाला मात्र महिन्याला पाचच दिवस देईन अशी अट घालून नाटक स्वीकारू लागले. मग नाटकही पुण्या-मुंबईपुरतं बंदिस्त झालं. कलावंतांना बाहेरचे दौरे परवडेनात. कारण या माध्यमातला पैसा आणि नाटकांची नाइट याची तुलनाच होत नाही. मग बाहेरचा नाटकवेडा प्रेक्षक आपली भूक टीव्हीवरच भागवून घेऊ लागला.
एकूण काय तर टीव्हीचा उंट वेगवेगळ्या मार्गांनी आपल्या तंबूत शिरला. घरातल्या एका कोपर्यात पडून राहिलेल्या टीव्हीने मनाचा कोपरान्कोपरा व्यापून टाकला. मला तर वाटतं, गेल्या शतकात जी औद्योगिक क्रांती झाली ती उजळमाथ्यानं झाली. माणसाची जीवनशैली, मूल्यं आणि विचार यात प्रचंड उलथापालथ झाली. ती जगभरातल्या साहित्यिक, कलावंत, प्रतिभावंतांच्या चिंतनाचा विषय ठरली. शतक सरता सरता अशीच एक उलथापालथ झाली- माहिती तंत्रज्ञानाचा स्फोट. मात्र ही क्रांती चोरपावलानं झाली. ती लक्षात आली तोवर तिनं सगळ्याचा घास घेतला होता.
या सगळ्या प्रवासाचा साक्षीदार म्हणून मला हे समजून घ्यावंसं वाटतं. केवळ टीका करण्यापेक्षा समजून घेण्याचा प्रयत्न करतो मी. पण कधी कधी मती गुंग होऊन जाते आणि या सगळ्यांची संगती कशी लावायची हेच समजेनासं होतं. टीव्ही आता खूप मोठा झालाय. कलावंतांना स्वत:चे कपडे आणायला लागायचे कारण निर्मात्याला परवडायचं नाही इथपासून आता केवळ एकएका सीनपुरते कॉश्च्यूम्स शिवण्यापर्यंत सुबत्ता आली आहे. सुपरस्टार्सना आपला सिनेमा गाजवण्यासाठी छोट्या पडद्याला शरण जावं लागतंय.
असा मोठा मोठा होत गेलेला टीव्ही पाहताना, चाललंय त्यात कुणीच समाधानी नाही हेही जाणवतंय. ना प्रेक्षक, ना कलावंत, ना तंत्रज्ञ. कधी त्यात सामील होत, तर कधी तटस्थ होत या सगळ्या प्रवासाचं चिंतन करत असताना एकच खंत वाटते, टीव्ही आकारानं मोठा झाला, आशयानं नाही.
आणि दुर्दैव हे की, आशयाचं मोठेपण ही भूकही आता उरलेली नाही.
गैरसमज
एकदा एका निर्मात्याकडे मी तक्रार केली होती. म्हणलं, ‘‘एका एपिसोडमध्ये किती जाहिराती दिसतात हो. कथेत सगळा रसभंग होतो.’’ तो हसला. म्हणाला, ‘‘तुझ्या कथेच्या मधल्या भागात जाहिराती असतात हा गैरसमज काढून टाक. जाहिरातींच्या दोन सेगमेंटसमध्ये काही तरी हवं म्हणून तू आहेस आणि तुझी कथा आहे.’’
- मी गप्प झालो. या माध्यमक्रांतीचं हे विखारी दर्शन मला शिकवून गेलं की टीव्ही हे भांडवलशाहीचं अपत्य आहे.
डेली सोपमध्ये कथा कसली?
पहिल्यांदा मला यूटीव्हीनं ‘शांती’ लिहाल का म्हणून विचारलं. मी चकितच झालो. रोज एक एपिसोड लिहायचा? - हे कसं होणार? असं वाटून मी नकार दिला. मला डेली सोप्स ही कल्पनाच अतक्र्य वाटत होती. ‘शांती’ आलीही आणि हीटही झाली. मग सहा महिन्यांनी परत विचारलं तेव्हा मी म्हटलं की मी ती मालिका फारशी पाहिली नाहीये. मला कथानक माहीत नाही. त्यावर उत्तर आलं, ‘कसली कथा डेली सोपमध्ये? आज पेपर वाचलास का असा विषय घ्यायचा आणि खेचायची वीस मिनिटं.’ मला हा विनोद वाटला होता. पण डेलीसोप्सच्या लेखनाचा हाच पॅटर्न पुढे रूढ होणार आहे, हे मला जाणवलंही नव्हतं.