गणेश करंबेळकर, (लेखक संस्कृत साहित्याचे गाढे अभ्यासक आहेत.) -
कृपणेन समो दाता
कृपणेन समो दाता न भूतो न भविष्यति।
अस्पृशन्नेव वित्तानि य: परेभ्य: प्रयच्छति।।
(कवितामृतकूप २९)
‘‘कृपणासारखा दाता यापूर्वी झालेला नाही व होणारही नाही. जो पैशांना स्पर्शही न करता दुसर्यांना देत असतो.’’
हा श्लोक विरोधाभासाचा उत्तम नमुना आहे. कृपण हा कधीही काहीही कोणाला देत नसतो. तरीही तो उत्तम दाता कसा? त्याचे उत्तर असे आहे, की तो धनाचा लोभ धरून आयुष्यभर पैसा पैसा जमा करून मोठी संपत्ती कमावतो व ती खर्च होईल या भीतीने त्यातली एक कवडीही स्वत:साठी खर्च करत नाही. आपल्याही बायकामुलांना ती दिसू नये, म्हणून पूर्वी सोनेनाणे जमिनीत पुरून ठेवण्याची पद्धत होती. पण त्या स्थानाचा पत्ता ते कोणालाही लागू देत नसत. शेवटी ते मरून जात. म्हणून आजही खोदकाम करताना कोणाला तरी ते धन सापडते. जमल्यास तो ते घेऊन जातो किंवा ते सरकारजमा होते; म्हणजेच त्याची ती संपत्ती त्याच्या मृत्यूनंतर दुसर्या कोणाला तरी अनायासे मिळते. त्याने स्वत:साठी एक पैसाही खर्च न करता केलेले दान हे असे. कंजूषपणाच्या बाबतीत भारतात मारवाडी, इंग्लंडमध्ये स्कॉटिश लोक व जगभर ज्यू प्रसिद्ध आहेत. धन लपवण्याचा हा प्रकार आजही तसाच आहे. मात्र, ते एका वेगळ्या पद्धतीने घडत आहे. कर चुकवण्यासाठी वा काळा पैसा लपवण्यासाठी स्वित्झर्लंडमधील बँकांत गुप्तपणे मोठे श्रीमंत लोक खाती उघडतात. ते असेपर्यंत तो पैसा ते खर्च करतात; पण पुष्कळ लोक खाते उघडल्यानंतर मरून जातात. त्यानंतर ते पैसे काढायला कोणीच जात नाही. म्हणून ते पैसे सरकारला मिळतात.
या बाबतीत पै पै ला जपणार्या माणसांच्या कंजूषपणाचे कितीतरी विनोद प्रसिद्ध आहेत. त्यातला एक असा आहे. असे म्हणतात, की अमेरिकेतील ग्रँड कॅन्यन ही प्रचंड दरी एका स्कॉटिश माणसाची एक पेनी हरवली, ती शोधण्यासाठी खणल्यामुळे निर्माण झाली.