राजू नायक
विशिष्ट वेळी, नेमलेल्या ठिकाणी आणि ठराविक वेळेत थोडे सैल वर्तन करण्याला मुभा देणार्या वातावरणासाठीची संस्कृती आणि शिस्त मुळातच समाजात रुजलेली नसेल, तर (अकाली) येणारी नाइटलाइफसारखी नवी संस्कृती कशी असह्य डोकेदुखी ठरते, याचा अनुभव सध्या गोव्यातले
स्थानिक नागरिक घेत आहेत.
-------------
मुंबईच्या नाइटलाइफबद्दल चर्चा सुरू झाली, त्याच दरम्यान ‘नव्या रोजगाराची, अधिकच्या आर्थिक उलाढालीची संधी’ यासारख्या गोंडस लेबलखाली दडून येत बघता बघता आधीच जेमतेम वचक असलेल्या दुबळ्या ‘व्यवस्थे’ची मानगूट पकडणार्या या रात्रजीवनामुळे बेजार गोव्यात - विशेषत: कळंगुट-बागा-मोरजी भागात आग पेटली. सत्ताधारी आमदाराच्या नेतृत्वाखाली एकत्र आलेल्या लोकांनी दोन डान्सबार मोडून टाकले. काही श्ॉक्सना आगी लावल्या. पोलिसांनी गुन्हे नोंदविताच आमदाराने उपोषणास्त्र उपसले. त्यानंतर सुरू झाले आरोपांचे सत्र. विरोधकांनी या आमदाराचाच गैरकृत्यांमध्ये हात असल्याचा आरोप केला.
मोरजी येथील गावडेवाडा भागात दोन हॉटेलचालकांच्या वैमनस्यातून सशस्त्र गुंडांनी एकमेकांवर हल्ला केल्याच्या घटनेस जास्त काळ लोटलेला नाही. सोडा बाटल्या, काठय़ा, दगड व पिस्तुलाचाही खुला वापर झाला. तेथे चालू असलेली एक पार्टी विस्कळीत करून तेथील लोकांमध्ये भय निर्माण व्हावे हा त्या हल्ल्यामागचा हेतू होता, यात शंकाच नाही. या हिंसक चकमकीत काही पर्यटक व मुले जखमी झाली. त्यातून पर्यटकांच्या सुरक्षेचा प्रश्न समोर आला.
गोव्याच्या या पर्यटन पट्टय़ात अर्थव्यवस्थेचा मोठा हिस्सा स्वत:च्या पदरात पाडून घेण्यासाठी दीर्घकाळ चालू असलेल्या संघर्षाची ही ताजी परिणती. येथे ही कृष्णकृत्ये नवी नाहीत. गोव्याच्या खाण क्षेत्रात ज्या अतिहव्यासामुळे त्या व्यवसायाचे पेकाट मोडले, त्याच्याशी साधम्र्य सांगणारीच कृत्ये पर्यटन क्षेत्रात चालू आहेत. पर्यटन क्षेत्रातील पारंपरिक व्यावसायिक हळूहळू बाहेर फेकले जाऊन राजकीय पाठिंब्याने पुंजीपती त्यात शिरकाव करू लागले आहेत. त्यातून जीवघेणी स्पर्धा सुरू झालेली आहे. गोव्याच्या मानगुटीभोवती आवळला जाणारा हा पंजा बळकट करण्यात खुलेआम आणि बेपर्वाईने सुरू असलेल्या रात्रजीवनाचा मोठा वाटा आहे.
गेल्या २५-३0 वर्षांत या अर्थव्यवस्थेने स्थानिकांना चांगलेच आपल्या पंजात ठेवले आहे. जे गोव्याच्या खाणपट्टय़ात झाले, तेच इथेही! खाणपट्टय़ातल्या निर्यातदारांनी अक्कलहुशारीने स्थानिकांना त्यात सामील करून घेतले, ट्रक घेऊन दिले, कंत्राटदार नेमले, सुरक्षा त्यांच्याकडे सोपविली, त्यानंतर स्थानिकांना प्रत्येक ट्रिपमागे पैसे दिले, शेतकर्यांना सुरुवातीला दमदाटी करून व नंतर हताश बनवून वश केले, घराघरांमध्ये पैसे चारले, निवडणुका प्रायोजित केल्या.. आज पर्यटनपट्टय़ाला लागलेले ग्रहण याच स्वरूपाचे आहे.
विशिष्ट वेळी, ठिकाणी आणि ठरावीक वेळेत थोडे सैल वर्तन करण्याला मुभा देणार्या वातावरणासाठीची संस्कृती आणि शिस्त मुळातच समाजात रुजलेली नसेल, तर (अकाली) येणारी नाइट-लाइफसारखी नवी संस्कृती कशी असह्य डोकेदुखी ठरते, याचा अनुभव सध्या गोव्यातले स्थानिक नागरिक घेत आहेत.
रेव्ह पाटर्य़ा हा गोव्यातला नवा व्यवसाय. सुरुवातीला काही ब्रिटिश आणि त्यानंतर इस्रायली यात गुंतले होते; परंतु आता सरकारच त्या आयोजित करीत असल्याचा संशय येतोय. पंचायत सदस्य, प्रशासकीय अधिकारी, पोलीस यांच्या बरोबरीने राजकीय नेत्यांना ठरावीक हद्दी वाटून दिल्याची चर्चा आहे.
किनारपट्टीवर सहा-सात कुविख्यात देशांचे माफिया गुंतले आहेत. रशियनांचा वेश्या व्यवसाय खुलेआम चालू आहे. त्यासाठी खास विमानसेवा चालते. ही विमाने भल्या पहाटे उतरल्याबरोबर काही दुकानांसमोर त्यांच्या बसगाड्या उभ्या राहतात. भल्या पहाटे काश्मिरींच्या दुकानांसमोर हे लोक काय खरेदी करतात, असा प्रश्न पडावा. वेश्या व्यवसाय, संरक्षण, जुगार व जमिनींचे दलाल.! आता तर गोव्यात ‘प्ले बॉय’ क्लबसुद्धा येतोय.. म्हणजे हे दुष्टचक्र सहज पूर्ण होईल! आश्चर्याची गोष्ट म्हणजे, एकेकाळी या सर्व सामाजिक दुष्परिणामांविरुद्ध सातत्यपूर्ण लढा देणारी मंडळी होती. सध्या पर्यटन क्षेत्रात एनजीओच राहिले नाहीत. ‘गोवा फाउंडेशन’ ही संघटना केवळ किनारपट्टी नियमनावर काम करते. या क्षेत्रात काम करणे जिकिरीचेही आहे. ध्वनिप्रदूषणाविरुद्ध न्यायालयाने नेमलेल्या सदस्यांनाच धमक्या येतात. त्यांना उपमुख्यमंत्री विचारतात, तुम्हाला पर्यटन बंद पाडायचे आहे काय? निरीक्षक मानतात, की उत्तर गोव्यातील किनारपट्टीवर केवळ अबकारी खात्यासाठीच्याच हप्त्यांचा आकडा कोट्यवधींचा आहे. या पट्टय़ात मद्यालये रात्री १0 पर्यंतच खुली ठेवता येतात; परंतु ‘कबाना’ हा विदेशींचा क्लब पहाटे चारपर्यंत खुला असतो. रात्रभर तिथल्या धिंगाण्यामुळे या परिसरात अक्षरश: हादरे बसतात. गोव्याला ‘देशाची पार्टी राजधानी’ म्हटली की पूर्वी सुखावणारा आणि हिंदी चित्रपटांमध्ये गोव्याचा उल्लेख आला की कौतुक वाटणारा स्थनिक माणूस आता या परिस्थितीला विटला आहे. गेल्या तीन-चार वर्षांत अमली पदार्थांच्या व्यापाराचे लोण गोव्याकडे सरकू लागले आहे. गोव्याच्या अमली पदार्थविरोधी पथकानेच अधिकृतरीत्या प्रसिद्ध केलेली ही आकडेवारी पाहा : २0१२ मध्ये गोव्यात ५0 लाखांचे अमली पदार्थ पकडण्यात आले होते. २0१३ मध्ये ही आकडेवारी गेली तीन कोटी २0 लाखांवर आणि २0१४ साली केवळ ऑगस्टपर्यंतच हा आकडा तीन कोटी १६ लाख रुपये झाला होता.
..एक काळ असा होता, की पर्यटक निसर्ग, विस्तीर्ण समुद्रकिनारे, स्वच्छता आणि आदरातिथ्य यासाठी गोव्यात यायचे. आता नाइटलाइफसाठी येतात..! या पर्यटन धोरणाला स्थानिक संस्कृती व समाज यांच्याशी देणेघेणे नाही. रशियन लोकांचे थेर, त्यांचा वेगळा गाव, त्यांची हॉटेले. वाईट म्हणजे भारतीय पर्यटकांना त्याचीच ओढ आहे.
मुंबईशी गोव्याची जवळीक आणि मैत्रीही दाट! म्हणूनच म्हटले, पुढे गेलेल्या गोव्याला ठेच लागली आहे; आता मागून येऊ पाहणार्या मुंबईच्या नाइट-लाइफने तरी शहाणे व्हावे!
दिवसाचा ‘सनबर्न’, रात्रीचा ‘उकिरडा’
केवळ इथल्या ‘मौजमजे’चा अनुभव घेण्यासाठीच टोळधाडीसारखे गोव्यात येणारे हपापलेले पर्यटक राज्याचा उकिरडा करतात, त्याविरुद्धही आवाज उठू लागला आहे. किनार्यावर ४00 श्ॉक्स, हजारो खाटा, चारेक हजार छत्र्या, शिवाय गुरे, कुत्री.. त्यात भर म्हणून मसाज करणारी मंडळी, विक्रेते, फेरीवाले.. पर्यटकांकडून पैसे उकळणारे पोलीस, लुबाडणारे टॅक्सीवाले..!
‘सनबर्न’सारख्या महोत्सवाच्या काळात तर राज्यात सरकार नावाची चीज अस्तित्वात आहे का, असा प्रश्न पडावा! अक्षरश: दारूच्या बाटल्या घेऊन तरुण-तरुणी भर दिवसा रस्त्यावरून फिरत होते, त्यावरून रात्रीच्या चित्राची कल्पना करावी! गोव्यात येणार्या बहुसंख्य (देशी) पर्यटकांना इथल्या मोकळेपणाची नको ती चटक लागलेली दिसते. त्यांच्यामुळे गोव्याच्या किनार्यांवर अत्यंत किळसवाणे चित्र दिसू लागले आहे. गोर्या महिलांबरोबर फोटो काढून घेण्याची हौस भागली आणि हातात बाटल्या घेऊन फिरले की या पर्यटकांना विदेशात आल्यासारखे वाटते. हेच लोक किनार्यावरील सुरक्षारक्षकांच्या नाकीनव आणतात. उघड्यावर झोपतात, तेथेच अन्न शिजवितात, कचरा मिळेल तेथे फेकतात. प्रातर्विधीही उघड्यावर आटोपले जातात. - स्थानिकांना आता या चित्राचा उबग येऊ लागला आहे!