शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: पंतप्रधान नरेंद्र मोदी आज देशाला संबोधित करणार; भारत-पाक 'युद्धविरामा'बाबत काय बोलणार?
2
Operation Sindoor: 'पहलगाममध्ये दहशतवाद्यांच्या पापाचा घडा भरला अन् त्यानंतर...', भारताचे डीजीएमओ घई काय बोलले?
3
Operation Sindoor : "चीनचं मिसाईल अयशस्वी, तुर्कीचे ड्रोन पाडले"; एअर मार्शल एके भारती यांनी पुरावेच दाखवले
4
'आमचे इस्लामिक सैन्य, आमचे कामच जिहाद', पाकिस्तानी लष्करप्रमुखाचा व्हिडिओ व्हायरल...
5
गुंतवणूकदारांची एकाच दिवसात ४ वर्षातील सर्वात मोठी कमाई! 'या' शेअरमध्ये प्रचंड वाढ
6
व्हेज बिर्याणीच्या गाडीवर लिहिलं होतं 'जय श्री श्याम', भाजप आमदार बालमुकुंद आचार्य संतापले अन्...
7
ड्रोन बनवणाऱ्या कंपनीच्या शेअरनं 3 दिवसांत दिला 37% परतावा, 500 रुपयांवर पोहोचला शेअर
8
शाहरुख खानसोबत ३० वर्षांनी दिसणार 'हा' एव्हरग्रीन अभिनेता, 'किंग' सिनेमात झाली एन्ट्री
9
घराबाहेर पडताना आई तुम्हाला आवर्जून दही-साखर देते का? फायदे समजल्यावर रोजच मागाल
10
काय होता ५००० कोटींचा 'पॅनकार्ड' इनव्हेस्टमेंट फ्रॉड? ५१ लाख गुंतवणूकदारांना घातला गंडा
11
पाकिस्तानचा शेअर बाजार अचानक १ तास करावा लागला बंद! युद्धविरामनंतर नेमकं काय घडलं?
12
'याचना नहीं, अब रण होगा...' कवितेने सुरुवात; आर्मीने दाखवला 'ऑपरेशन सिंदूर'चा नवा व्हिडिओ
13
Operation Sindoor : "हौसले बुलंद हो, तो..." क्रिकेटचा किस्सा ऐकवत DGMO नी दिला स्पष्ट मेसेज, पाकचा 'खेळ खल्लास' कसा केला ते सांगितलं!
14
भारत-पाकिस्तान डीजीएमओंची हॉटलाईन कनेक्ट होऊ शकली नाही; थोड्या वेळाने पुन्हा प्रयत्न करणार
15
जग कधीच विसरू शकणार नाही विराट कोहलीचे हे 10 कसोटी विक्रम; कुण्याही भारतीयाला जमला नाही असा पराक्रम
16
"मी विराटचे अश्रू पाहिलेत..."; 'किंग कोहली'च्या कसोटी निवृत्तीनंतर अनुष्का शर्माची भावनिक पोस्ट
17
स्मिता पाटील यांच्या मृत्यूनंतर प्रतीकला दत्तक घेणार होती बॉलिवूडची 'ही' प्रसिद्ध जोडी! अभिनेत्याचा मोठा खुलासा 
18
'युद्ध रोमँटिक चित्रपट नाही, गंभीर मुद्दा आहे', माजी लष्करप्रमुख मनोज नरवणे यांचे सूचक विधान
19
संरक्षण दलांसोबत अधिक समन्वयाने काम करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे सुतोवाच
20
सेव्हिंग अकाऊंटमध्ये पैसे ठेवूनही मिळेल FD इतकं व्याज; फक्त करावं लागेल 'हे' महत्त्वाचं काम

सात कथा अन् सात मजली हसणं...

By admin | Updated: July 5, 2014 14:33 IST

‘फिल्म फेस्टिव्हल म्हणजे अतिशय गंभीर प्रकृतीचे आणि फक्त क्लासिक चित्रपट,’ असं अनेक जण गृहीत धरून चालतात. ‘कान’ चित्रपट महोत्सवात दाखवलेला ‘वाइल्ड टेल्स’ हा अज्रेंटिनाच्या दामीयान सिफ्रॉनचा दे धम्माल विनोदीपट या चुकीच्या समजुतीलाच प्रभावी छेद देणारा.

- अशोक राणे

 
"हाऊ कॅन दे इन्क्लुड अ कॉमेडी इन द फेस्टिव्हल प्रोग्रॅम.. दॅट टू ऑफ फेस्टिव्हल लाईक कान..?’’
आमचा एक समीक्षक मित्र वैतागला होता. निमित्त होतं- ‘वाईल्ड टेल्स’ हा अज्रेंटिनाच्या दामीयान सिफ्रॉनचा दे धम्माल विनोदीपट! मला गंमत वाटली. अजूनही फिल्म फेस्टिव्हलला नित्यनियमित हजेरी लावणारे वारकरी, ‘फिल्म फेस्टिव्हल म्हणजे अतिशय गंभीर प्रकृतीचे आणि फक्त क्लासिक चित्रपट,’ असं गृहीत धरून चालतात. आमच्या याच मित्राचे शब्द वापरून म्हणायचे झाले, तर ‘अगदी कानमध्येही’ असे वारकरी आढळतात. फिल्म फेस्टिव्हल म्हणजे सिनेमाचं एक असं जागतिक पातळीवरचं व्यासपीठ आहे, जिथं सर्व काळाचे आणि पठडी, शैलींचे सर्व प्रकारचे चित्रपट दाखविले जातात; जेणेकरून तमाम चित्रपटरसिकांना, चित्रपटसृष्टीला आणि अभ्यासकांना एकाच ठिकाणी हे माध्यम कालपरवापासून कसकसा प्रवास करीत आज कुठल्या वळणावर आलंय आणि त्याच्या पुढल्या प्रवासाची दिशा काय असणार आहे, याचं काहीएक भान येण्यास मदत होईल. तेव्हा मग हा ‘असा’ चित्रपट का दाखविला, असा आक्षेप घेणं म्हणजे फिल्म फेस्टिव्हलचा मूळ हेतूच लक्षात न घेणं! फिल्म फेस्टिव्हलमध्ये केवळ क्लासिकच पाहायला मिळतील किंवा मिळावेत, असा आग्रह धरणे हेही म्हणूनच गैर आहे आणि कुठल्याही फेस्टिव्हलमध्ये जिथं शंभरापासून पाचसहाशे जगभरचे चित्रपट दाखविले जातात, तिथं ते सारेच्या सारे क्लासिक असणं शक्य नाही, याचं तरी संख्याशास्त्र लक्षात घ्यायलाच हवं, नाही का?..  आणि विनोदीपट क्लासिकमध्ये येत नाही..? अभिजात म्हणून गणल्या गेलेल्या किती चित्रपटांची नावे सांगू? तुर्तास एकच सांगतो, एक श्रेष्ठ दर्जाचा अभिजात चित्रपट ‘टू बी ऑर नॉट टू बी’! दिग्दर्शक अर्नेस्ट लुबिश! साल १९४२! ..आणि आमच्या या मित्राचा आक्षेप होता, की विनोदीपट महोत्सवात.. आणि तोही कानमध्ये..?
एक तर ‘वाईल्ड टेल्स’ हा सामान्य प्रतीचा थिल्लरपट नव्हता. एका शब्दात त्याचं वर्णन करायचं, तर तो ‘ब्लॅक कॉमेडी’ प्रकारातला होता. हसवून-हसवून बेजार करताना तो सभोवतालचं सामाजिक-राजकीय-सांस्कृतिक पर्यावरण प्रेक्षकांच्या समोर आरसा धरून दाखवीत होता. आपणच निर्माण केलेल्या व्यवस्थेत आपणच कसे बंदिस्त झालोय, आपलं कसं माकड झालंय, याचं दे धम्माल चित्रण यात पाहायला मिळालं. प्रखर वास्तव दाखविणारे, अस्वस्थ करणारे, मेंदूला झिणझिण्या आणणारे चित्रपट फेस्टिव्हलमध्ये पाहता-पाहता थोडी करमणूक हवी, म्हणून असा एखादा चित्रपट हवा, असं मी तरी म्हणणार नाही. फेस्टिव्हल म्हणजे सर्व प्रकारचे चित्रपट, या सूत्रानुसार मी ते सारे सारख्याच कुतूहलानं पाहायला उत्सुक असतो.. आणि मध्येच थोडं हसू आलं, तर बिघडलं कुठे..? ‘क्रिटिसिझम इज अ सिरिअस बिझनेस’ असा दावा करणार्‍या आमच्या तमाम समीक्षक मित्रांनी हे विधान चुकीच्या अर्थानं ‘सिरिअसली’ घेतलंय आणि एखादीही स्मितरेषा चेहर्‍यावर न आणता उगाचच चौकोनी चेहर्‍यांनी आपल्या समीक्षेचा व्यवहार चालू ठेवलाय. ‘वाईल्ड टेल्स’ची ज्या प्रकारे सुरुवात होते, तो पाहून कणभरदेखील वाटत नाही, की पुढला दीड तास तो आपल्याला हसवून-हसवून बेजार करणार आहे.
चित्रपट सुरू होतो आणि विमानाचा आतला भाग दिसतो. प्रवासी आत येतात. आपापल्या हँडबॅग वगैरे वरच्या सामान ठेवण्याच्या जागी ठेवतात आणि आसनस्थ होतात. एक साधीसुधी रुटीन गोष्ट. प्रथम आत येणारी प्रवासी असते एक तरुण स्त्री. ती विमानाच्या उजव्या भागात बसते. तिच्या मागोमाग येणार्‍या आणि डावीकडे बसणार्‍या दुसर्‍या प्रवाशाकडे सहज जावं तसं तिचं लक्ष जातं. ती क्षणभर त्याला पाहत राहते. त्याचं तितकंच सहज तिच्याकडे लक्ष जातं. तो स्वागतशील स्मित करतो. ती तरीही पाहतेच आणि मग आपण का त्याच्याकडे पाहतो आहोत, असं वाटून तो गोंधळात पडल्याच लक्षात येऊन ती हसत म्हणते, 
‘‘सॉरी, मला क्षणभर वाटलं, की तुम्ही म्हणजे जॉर्ज. माझा एक्स बॉयफ्रेंड.’’
..आणि मग प्रत्यक्षात आपल्याला न दिसणारा हा जॉर्ज एकच धम्माल उडवून देतो. योगायोगाची एक न संपणारी मालिकाच सुरू होते. जॉर्जसारखा दिसतो, म्हणून या बाईनं ज्याच्याकडे पाहिलं तोही या जॉर्जला ओळखतो. ती दोघं, ‘अच्छा तो जॉर्ज होय,’ असं चार-दोन वाक्यांत त्या कुणा जॉर्जविषयी जेमतेम बोलतात तोच येणारे इतर प्रवासी, एअर हॉस्टेस; इतकंच नाही तर चक्क वैमानिकही त्यात सामील होतात. कारण प्रत्येक जणच जॉर्जच्या ओळखीचा निघतो. बरं सर्व जण त्याच्याविषयी छानच आणि गमतीदार बोलत राहतात. ते त्यांचं बोलणं, शेअर करणं इतकं वाढत जातं, की विमानात प्रचंड गोंधळच उडतो. जॉर्जविषयी किती बोलू अन् किती सांगू असं प्रत्येकाला होऊन जातं.. अगदी वैमानिकालासुद्धा! इतका वेळ हे सारं नाट्य एकाच लोकेशनवर, म्हणजे विमानाच्या आतील भागात सुरू असतं. नाट्य टिपेला जातं.. आणि मग दिसतं एक निसर्गसौंदर्यानं नटलेलं सुंदर खेडं. त्या खेड्यातला एक छानसा टुमदार बंगला दिसतो. बाहेर कोवळ्या उन्हात चहा घेत बसलेलं एक समाधानी, प्रसन्न वृद्ध जोडपं दिसतं. कसला तरी आवाज येतो. वाढत जातो तसं ते मागे वळून पाहतात. एक विमान त्यांच्या दिशेनं येताना दिसतं. दोघं क्षणभर अचंबित होतात. ‘विमान आणि इथं.. इथली शांतता भंग करायला..’ असा त्यांच्या चेहर्‍यावर भाव. काहीसा मिस्कीलसा! ते पुन्हा आपापला चहा घेऊ लागतात आणि वेगानं येणारं विमान थेट त्यांच्यावरच कोसळतं. सिनेमा संपतो. विसेक मिनिटांतच. म्हणजे एक गोष्ट संपते आणि मग दुसरी सुरू होते. एकामागोमाग एक अशा सात धम्माल विनोदी गोष्टी! परंतु, वर म्हटल्याप्रमाणे हा काही निव्वळ विनोदीपट नाही.
ही पहिलीच गोष्ट घ्या. आपल्या दैनंदिन जगण्यातला हा एक अनुभव! कुणी सहज म्हटलं, की त्याला अथवा तिला मी ओळखतो किंवा ओळखते, की आजूबाजूचं आणखी कुणी तरी बहुधा काही कारण नसताना, ‘तो ना किंवा ती ना, मीही ओळखतो किंवा ओळखते,’ अशी सुरुवात करतो. त्यात एक बारीकसा योगायोग असतो; परंतु मग आपण कसं त्याला किंवा तिला नीट ओळखतो, हे सांगण्याच्या उत्साहात जो-तो बोलतच सुटतो. तेच व्यंग इथं नेमकेपणानं पकडलं आहे. गंमतीचा आणि त्याहीपेक्षा कौतुकाचा भाग असा, की विमानातली ती सर्व मंडळी त्या कुणा जॉर्जविषयी बोलताना वेगवेगळं बोलतात. त्यातून त्या जॉर्जविषयी केवढी तरी रंजक माहिती बाहेर येते आणि हे सारं घडून येतं ते ‘मीही ओळखतो किंवा ओळखते’ हे दामटून सांगण्याच्या अहमहमिकेतून आणि अपूर्व अशी धम्माल उडते. या सर्वांची जॉर्जविषयीची निरीक्षणे त्या-त्या पात्राच्या तोंडून काढताना संवादलेखकानं बहार उडवून दिली आहे. मी सहसा कथेतलं पात्र हा शब्द वापरत नाही. कायम व्यक्तिरेखाच म्हणतो.. परंतु इथं ही सारी खर्‍या अर्थानं ‘पात्रं’च होती. आपल्या आसपास दिसणारी..
दुसरी गोष्ट सुरू होते. वाढदिवसाचा केक घेऊन दुकानाबाहेर आलेल्या एका माणसाला त्याची गाडी गायब झाल्याचं कळतं. ट्रॅफिकवाल्यांनी ती टो करून नेल्याचंही कळतं. तो मग ट्रॅफिकवाल्यांकडे जातो.
‘‘माझी गाडी तुम्ही नेलीच कशी?’’ तो आरडाओरडा करीतच बोलतो.
‘‘नो पार्किंगच्या जागेत तुम्ही गाडी पार्क केलीत.’’ ट्रॅफिकवाल्याला मध्येच अडवत हा आणखी जोरात ओरडतो.
‘‘पण, त्या जागेवर ‘नो पार्किंग’ची खूणच नव्हती.’’
‘‘तुम्ही ‘नो पार्किंग’मध्येच गाडी पार्क केलीत. एवढे पैसे भरा आणि गाडी घेऊन जा.’’
याची आरडाओरड आणि ट्रॅफिकवाल्याचं शांत माहिती देणं. त्याचा मुद्दा अजिबात ऐकून न घेता. याची चिडचिड वाढत जाते. या दोघांचं हे असं चाललेलं असताना त्याच्या मागे रांग वाढत जाते. हा आपला युक्तिवाद करीतच राहतो. ‘नो पार्किंग’ची खूणच नव्हती. मी नीट पाहूनच गाडी पार्क केली होती, वगैरे वगैरे. खिडकीपल्याडचा ट्रॅफिकवाला त्याला पुन:पुन्हा दंडाची रक्कम सांगत राहतो. याचं पित्त खवळत जातं.
‘‘तुमचा साहेब कुठाय?’’
‘‘मीच इथला साहेब. एवढा दंड भरा आणि गाडी..’’
याचा आरडाओरडा टिपेला जातो. हा खिडकीवर दणादण हात आपटायला लागतो. आता रांगेतले लोक ओरडू लागतात.
‘‘ओ मिस्टर भरा दंड आणि निघा.. का आमचा खोळंबा करताय?’’
‘‘अहो, पण तिथं ‘नो पार्किंग’ची पाटी नव्हतीच.’’
त्याचं म्हणणं बरोबर आहे; परंतु ते खरंखोटं करायला कुणालाच उसंत नाही. रांगेतल्यांना लवकर दंड भरून गाडी घेऊन आपापल्या कामाला निघायचंय आणि खिडकीतल्या ट्रॅफिकवाल्याला दंड वसूल करायचं आपलं नेमून दिलेलं काम करायचंय.. आणि मग एक अभूतपूर्व ‘लढा’ सुरू होतो. आपला हा कथानायक मग सरकारी व्यवस्थेला धडा शिकवायला निघतो. त्याची आणि त्याच्यासारख्या असंख्यांची बथ्थड, असंवेदनशील व्यवस्थेविषयीची चिडचिड त्याच्या रूपानं एक उग्ररूप धारण करते.. परंतु ‘ऐसे बहोत देखे हैं’ असा कायमचा पवित्रा घेतलेली व्यवस्था ढिम्म हलत नाही आणि हा मात्र वेडापिसा होत जातो. हिंस्र होत जातो आणि वर म्हटल्याप्रमाणे त्याचंच माकड होत जातं. हसं होत जातं. जगभरच्या लोकांनी प्रत्यक्षात किंवा मनातल्या मनातच दिलेल्या व्यवस्थेविषयी लढय़ाची ही सार्वत्रिक, सार्वकालिक कथा होऊन जाते.. आणि हे सारं पाहताना कमीअधिक प्रमाणात हेच सारं अनुभवलेले आपण मनमुराद हसत सुटतो..
तिसर्‍या गोष्टीत एका गर्दीच्या रेस्तराँमध्ये एक माणूस येतो. दिसायला काहीसा भणंगच. तो रेस्तराँमधल्या मध्यमवयीन वेट्रेसला बोलावून खाण्याची ऑर्डर देतो. रेस्तराँमध्येच कुणीच नसताना काहीसं अवेळीच त्याचं येणं, उगाचच इथंतिथं पाहणं; मग त्या वेट्रेसकडे रोखून पाहणं, तिला काहीशा विचित्र पद्धतीनंच बोलावणं, ऑर्डर देणं आणि त्यात त्याचं भणंगपण! या वेट्रेसला आणि त्याहीपेक्षा किचनमध्ये काम करणार्‍या वृद्ध ढोलमावशीला त्याचा संशय येऊ लागतो. त्यानं मागवलेला पदार्थ वेट्रेस आणून देते. हा खातो आणि बरोबर शिजला नसल्याची तक्रार करतो. 
ती परत घेऊन जाते. वृद्धा आतून नजर ठेवल्यासारखी त्याच्याकडे पाहते आहे. तो पदार्थ नीट केला जातो. ‘‘आजवर अशी तक्रार कुणीच केली नव्हती.. याला खायचं नाहीये.. दुसरंच काही तरी याच्या मनात आहे..’’ 
वृद्धा बोलत राहते. वेट्रेस काही बोलत नाही; परंतु सावध आहे. तो चिवडल्यासारखं खातो. कुणी फारसं बोलतंच नाही; परंतु त्याचं वागणं अगम्य वाटून दोघी सतत त्याच्याकडे संशयानं पाहत राहतात. विशेषत: वृद्धा. ती काहीबाही बोलत असल्यामुळे ती वेट्रेसही काहीशी घाबरलेली. 
 
हे संशय प्रकरण वाढत-वाढत अशा थराला जातं, की त्या दोघी मिळून त्याचा निर्घृण खून करतात. अखेरचा घाव ती वृद्धाच घालते.. परंतु ही खूनकथाही विनोदीच आहे. कारण दैनंदिन व्यवहारातील एका गोष्टीकडे ती एक व्यंग म्हणूनच पाहते. त्याचं अंतिम पर्यवसान जरी ब्रुटल र्मडर असलं तरी!
एखाद्याच्या दिसण्या-वागण्यावरून उगाचच काही तरी समज करून घेतले जातात. संशय घेतले जातात. त्याच्या गावीही नसतं, की आपल्या या ‘सहज’ दिसण्या-वागण्यामुळे पलीकडे काही तरी भलतंच घडतं आहे. तो आपला आपल्याच जगात! या कथेतील माणूस तसा निरुपद्रवीच! परंतु, त्याच्या दिसण्या-वागण्याला अवास्तव महत्त्व देऊन त्या दोघींच्या मनात संशयाचं भूत उभं राहतं आणि पाहता त्या खुनशी होऊन जातात.
पुढल्या गोष्टीत पहाटे एक तरुण घरी येतो आणि आपल्या आई-वडिलांना झोपेतून उठवतो. त्याच्या गाडीखाली कुणी तरी मेल्याचं सांगतो. त्याचे वडील बडे उद्योगपती असतात. ते लागलीच आपल्या वकिलाला बोलावतात. तो येतो. सल्ला देतो. त्यानुसार उद्योगपतीच्या बायकोनं मुलाला घेऊन लगेचच परगावी जावं. ती गाडी यांचा माळी चालवत होता, असं पोलिसांना सांगावं. त्याबदल्यात माळ्याला घसघशीत मोबदला द्यावा. माळीही तयार होतो. शिवाय, आपण तयार केलेली हीच केस खरी आहे, हे इन्स्पेक्टरला सांगावं आणि त्या बदल्यात त्याला एक रक्कम द्यावी. शिवाय, त्याची फी वेगळी. उद्योगपती तयार होतो. इन्स्पेक्टर येतो. वकिलानं तयार केलेली कथा स्वीकरतो; परंतु त्यानं देऊ केलेल्या रकमेच्या चौपट रक्कम मागतो. वकील उद्योगपतीला पटवतो. मुलाच्या आयुष्याचा प्रश्न असतो. तोही तयार होतो; पण मग वकील म्हणतो, की आपलीही आधी ठरलेली रक्कम चौपट व्हायला हवी. आपला फायदा घेऊ पाहणार्‍या त्या वकिलाला उद्योगपती फैलावर घेतो आणि अखेर रक्कम दुप्पट करायला तयार होतो. यांचं हे चाललेलं असताना सकाळपासून या बनावाचा भाग झालेला तो दीनवाणा दिसणारा माळीही आपली रक्कम चौपट करून मागतो.. उद्योगपती म्हणतो, ‘‘यापेक्षा माझा मुलगा तुरुंगात गेलेला परवडेल मला..’’
हे सारं या गोष्टीत ज्या प्रकारे दाखवलंय, ते पाहताना हसून-हसून वाट लागते. शेवटी तो फाटका दिसणारा माळी, तर कडीच करतो.
आणखी एका गोष्टीत एंगेजमेंटची फाईव्ह स्टार पार्टी चाललीय. भावी नवरा-नवरी नटूनथटून बागडतायत, नाचतायत.. मद्याचे पाट वाहतायत, संगीतानं सारा माहोल मदहोश झाला आहे.. प्रत्येक जण या आनंद सोहळ्यात तुडुंब बुडलाय.. आणि अशातच नवरामुलगा एका मुलीशी बोलताना दिसतो.. कुणाच्या काही लक्षात येणार नाही, अशा बेतानं तो तिची समजूत घालतो आहे.. ती ऐकते आहे.. मुसमुसून रडते आहे.. आणि हे इतर कुणाच्याही नजरेत आलं नाही, तरी नवर्‍यामुलीच्या नजरेत येतं.. आणि मग सार्‍या पार्टीचा नूरच पालटून जातो. ती पोरगी मग जी काही धम्माल उडवून देते, ते सारं शब्दातीत आहे. प्रत्यक्ष पाहायलाच हवं..! इथंही अर्थातच नातेसंबंध, विवाहसंस्था या सार्‍या गोष्टीतलं व्यंग वेचत काहीएक मार्मिक टिप्पणी करण्यात आली आहे.
‘वाईल्ड टेल्स’ हा असा काही वाईल्ड होता, की त्याच्या वाह्यात जंगलीपणात हसवण्याचा माल ठासून भरलेला होता आणि दुसरीकडे तो अंतर्मुखही करीत होता. इतकी भन्नाट ब्लॅक कॉमेडी अलीकडच्या काळात पाहिल्याचं आठवत नव्हतं. 
(लेखक भारतीय व जागतिक चित्रपटांचे व्यासंगी अभ्यासक, दिग्दर्शक व परीक्षक आहेत.)