- थोडं कडू थोडं गोड
- प्रा. डॉ. द. ता. भोसले
ज्ञानाइतकी पुण्यप्रद आणि पवित्र वस्तू दुसरी नाही,’ अशा अर्थाचे एक संस्कृत वचन प्रसिद्ध आहे. ‘ज्ञान’ याचा अर्थ ‘ज्ञानग्रहण’ असा न घेता ‘ज्ञानदान’ असा घेऊन तालुकापातळीवरच्या दोन पुढार्यांनी आपापल्या गावी हायस्कूल्स सुरू केली. त्यासाठी त्यांनी अनेक लटपटी केल्या. खटाटोपी केल्या. अनेकांना टोप्याही घातल्या. जनतेला ‘अर्धवट’ शहाणे करून सोडण्याबरोबरच या ‘ज्ञानदाना’मागे त्यांचे आणखी काही हेतू असावेत. निवडणुकीच्या वेळी प्रचारासाठी हुकमी मनुष्यबळ त्यातून मिळते. घरातली आणि शेतातील कामे करण्यासाठी शिपायांना हक्काने वापरता येते. आपल्याच नात्या-गोत्यातील माणसांना नोकरी देता येते आणि जनसंचय, धनसंचय व पुण्यसंचय प्राप्त करून घेत असतानाच बिनभांडवली व कमी कष्टाचा ‘धंदा’ म्हणूनही या शाळेचा वापर करता येतो. शिवाय त्यात जोखीम कसलीच नाही. विद्यार्थी चांगल्या प्रकारे पास झाले तर विद्यालयाला क्रेडिट, अन् नापास झाले तर पालकांचे दुर्लक्ष व मुलांची बेपर्वाई हे सांगून मोकळे होता येते. एवढे सारे फायदे सध्या कुठल्याच दुसर्या व्यवसायांत नसल्याने या थोर थोर समाजसेवकांनी आपापल्या गावी ही विद्यालये स्थापन केली. दोघांची गावेही तशी जवळ जवळ. दोघांची मैत्रीही अगदी जिवाभावाची. दोघांचा राजकीय पक्षही एकच आणि दोघांचे हेतूही अगदी ‘स्वच्छ’ होते. व्याजबट्टा, सावकारी, हॉटेल, शेती आणि काळाबाजार अशा अनेक धंद्यांबरोबर हा एक ‘धंदा’ त्यांनी सुरू केला होता. आणि छान चालत होता.
सर्वसामान्य गरीब जनतेच्या उद्धारासाठी सुरू केलेल्या या ज्ञानप्रवाहाला अचानक अडथळा निर्माण झाला. एके दिवशी मुख्याध्यापकांच्या हातात जिल्हा परिषद शिक्षणाधिकार्यांचे पत्र पडले. त्यात त्यांनी लिहिले होते, ‘वर्गखोल्या, पट पडताळणी, शिक्षकवर्ग आणि इतर बाबींची तपासणी करण्यासाठी सक्षम अधिकार्यांचा एक चमू पुढच्या आठवड्यात तुमच्या शाळेला भेट देण्यास येणार आहे. त्यासाठी लागणार्या कागदपत्रांसह सर्व गोष्टींची पूर्तता करावी. सर्व तयारी चोख ठेवावी.’ पत्र हाती पडताच मुख्याध्यापकांना दरदरून घाम फुटला. त्यांनी ते पत्र थोर शिक्षणसम्राट आणि थोर राजकीय नेते असलेल्या आपल्या संस्थापक अध्यक्षांना दिले. पत्र वाचताच क्षणभर तेही गांगरले. विचारात पडले. याचे कारण असे होते की, त्यांनी कमी विद्यार्थी असलेल्या वर्गात बोगस मुलांची नावे घालून तुकडीतील विद्यार्थ्यांची संख्या मोठी दाखवली होती. दोन तुकड्या अस्तित्वात असताना एक जादा तुकडी दाखवली होती. स्वाभाविकच त्यासाठी लागणारा शिक्षकवर्ग जादा दाखवला होता. तीन शिपायांच्या यादीत खोटे एक नाव दाखल केले होते. विद्यार्थ्यांची फी, शिक्षकांचा पगार आणि शिपायाचा पगार कुणाकुणाच्या खोट्या सह्या घेऊन या महाशयांनी राजरोसपणे खिशात टाकला होता. शिवाय मुलांसाठी लागणारी बाकडे पुरेशी नव्हती. प्रयोगशाळेत साहित्य नव्हते. ग्रंथालयात नियमानुसार आवश्यक असणारी ग्रंथसंस्था नव्हती. क्रीडासाहित्याची तर उणीवच उणीव होती. आता या सार्या गोष्टींची पूर्तता करणे एका परीने कसोटीच होती. त्यामुळे ते थोडे गांगरलेच होते.
त्यासाठी अध्यक्षांनी शिक्षकांसह सर्व सेवकांची एक तातडीची बैठक घेतली आणि संबंधितांना आदेश दिला की, मुलांचा गणवेश, शिक्षकांचा गणवेश, वर्गांची स्वच्छता, कीर्द-खतावण्यांची पूर्तता, हजेरीपत्रकांची परिपूर्तता या सार्यांची जय्यत तयारी ठेवावी. शिक्षणाधिकार्यांनी कुठलीही त्रुटी दाखवता कामा नये. हातातल्या पत्रावर नजर फिरवताना त्यांना शेवटचे वाक्य विशेष वाटले. ‘सर्व तयारी चोख ठेवावी’ याचाही वेगळा अर्थ समजून घेतला आणि त्याप्रमाणे गावठी कोंबड्यांचा झणझणीत व खमंग बेत करायचे ठरवले. त्याच्या जोडीने ‘देशी’ आणि विदेशी अशा उत्तम ‘तीर्थपानाची’ चोख व्यवस्था ठेवली. चार अधिकारी येणार म्हटल्यावर त्यांच्या बायकांना भारी किमतीच्या चार साड्या घेतल्या. भेटवस्तू घेतल्या. खुद्द तपासणी साहेबांना जावयाचे लाड करावेत तसे सफारी सुटासाठी उत्तम कापड घेतले. शिवाय प्रत्येकासाठी भारी किमतीचे अत्तर, सुका-मेव्याचा बॉक्स, खादीचा एकेक हातरूमाल, त्यावर पिवळ्या चाफ्याची चार-पाच फुले आणि गुलाबाचा जाडजूड हार अशी चोख तयारी केली.
तरीही काही गोष्टींचं तिरपागडं गणित त्यांना कसं सोडवावं हे नीटसं उमगत नव्हतं. त्यासाठी त्यांनी आपला परममित्र, शिक्षणसम्राट आणि स्वत:च्या गावी शाळा काढणारे संस्थापक छबुरावांना फोन केला. तपासणीसाठी केलेली तयारी सांगितली आणि येणार्या किंवा आलेल्या अडचणींचा पाढा वाचला. त्यावर छबुराव फोनवरून मोठय़ानं म्हणाले, ‘बाबूराव, खरंच गड्या, तू कच्च्या गुरूचा चेला वाटतो. एवढय़ाशा गोष्टींचा कितीसा बाऊ करतोस? तू जरासुदिक काळजी करू नकोस. हे शिक्षण खात्याचं तपासणी मंडळ तुझ्याकडं मंगळवारी येत आहे; अन् माज्या शाळेची तपासणी करायला शुक्रवारी येणार हाये. तुज्याप्रमाणे मलाबी त्येंचं पत्र आलं आहे. आपल्या शाळा खेड्यातल्या गोरगरीब जनतेच्या सोयीसाठी काढलेल्या. एका परीनं नाही तरी सरकारलाच आपण मदत करतोय. त्येंचंच काम हलकं करतुया. आज-उद्या ये माज्याकडं; दोगं बसून सार्या अडचणींवर मात करू. कायतरी मार्ग काढू. तुज्यासारख्या माज्याही शाळेत मुलखाच्या गैरसोयी हायेत. पन एक सांगतू तुला, तू अजिबात घाबरून जाऊ नकस. बाबुराव, शेळीनं लांडग्याला घाबरण्याचं दिस आता राहिलं नाहीत. उलट शेळीला बघून लांडग्यानं घाबरलं पाहिजे. या सगळ्य़ांचा बाप वरती मंत्रालयात आहेच की बसलेला. त्यानं नुसता फोन केला तरी तुझा हा शिक्षणाधिकारी आपल्याकडे पळत येईल. हात जोडून उभा राहील.’
ठरल्याप्रमाणे शिक्षणखात्याचं तपासणी पथक दोन्ही शाळांना भेट द्यायला गेलं. शासनाला कळवल्याप्रमाणे प्रत्येक वर्गात पुरेशी विद्यार्थीसंख्या व वर्गांच्या तुकड्या होत्या. प्रत्येक वर्गात पुरेसे फर्निचर होते. वरती कळवल्याप्रमाणे सर्व शिक्षक व शिक्षकेतर सेवक हजर होते. जागा कमी पडली, एवढे ग्रंथालयात ग्रंथ दिसले आणि दोन्ही शाळेचे आर्थिक व्यवहारही अतिशय चोख होते. विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे मात्र विद्यार्थ्यांना देता आली नाहीत. पण बादशाही खाना, बादशाही नजराणा याखाली ते पार झाकून गेले आणि दोन्ही शाळांना उत्तम प्रशस्तिपत्रे मिळाली.
दोन दिवसांनी कुणीतरी या दोघांना विचारले, तेव्हा छबुराव म्हणाले, ‘तीन-चार ट्रक भाड्यानं घेतले. दिवसभर वर तोंड करून बोंबलत हिंडणार्या पोरांना रोज दोनशे रुपये ठेवून वीस-पंचवीस पोरांना वर्गात बसवले. आधी माझ्या शाळेतले फर्निचर, पुस्तकं आणि पोरं यांच्या शाळेत बसवली. अन् त्यांच्या शाळेतील पोरं, फर्निचर व पुस्तकांची कपाटं तपासण्याआधी माझ्या शाळेत आणून टाकली. तपासणी पथकाला छोटीसुद्धा उणीव दाखवता आली नाही. आहे काय त्यात?’
(लेखक ज्येष्ठ साहित्यिक असून, मराठी भाषा, लोकसंस्कृती यांचे ज्येष्ठ अभ्यासक
व नवृत्त प्राचार्य आहेत.)