- अशोक राणे
'ग्रँड थिएटर ल्यूमिए’च्या एस्केलेटरवरून खाली येत होतो. माझ्यापुढे असलेल्या बाईने सहज मागे वळून पाहिले. मी नजरेस पडताच म्हणाली,
‘‘ए यू इंडियन? आय टू हाफ इंडियन..’’
खाली येताच तिने आपण ‘हाफ इंडियन’ कसे आहोत, हे उत्साहाने सांगायलाच सुरुवात केली.
‘‘माझी स्विस आई १९४८मध्ये लंडनमध्ये एका भारतीयाला भेटली. दोघं प्रेमात पडली.. आणि अँक्सिडंट झाला. मी जन्माला आले. म्हणून मी हाफ इंडियन! माझे वडील मुंबईचे होते. याशिवाय मला त्यांच्याविषयी काहीच माहिती नाही. आईनेही कधी काही सांगितलं नाही. मीही मग मुद्दामून कधी काही विचारलं नाही आणि त्यामुळे गेल्या ६५ वर्षांत माझं काहीएक अडलं नाही..’’
जितक्या मोकळेपणाने तिने हे मला सांगितले, तेवढय़ाच मोकळेपणाने ती हसली आणि ‘सी यू सून’ म्हणत घाईघाईने पुढच्या सिनेमासाठी निघूनही गेली. मला फ्रान्स्वा त्रूफोचा ‘फोर हंड्रेड ब्लोज’ (१९५७) आठवला. त्या फ्रेंच सिनेमातील एका दृश्यात शिक्षक इंग्रजी शिकविताना शुद्धलेखन घातल्यासारखे एकच वाक्य तीन-तीनदा उच्चारतात,
‘‘हू इज द फादर?’’
सिनेमाचा कथानायक असलेल्या शाळकरी मुलालाही हाच प्रश्न पडलेला असावा. त्याच्या चेहर्यावर गोंधळात पडल्याचा भाव आहे. दस्तुरखुद्द त्रूफोंनाही या प्रश्नाने आयुष्यभर पछाडले.. आणि मला भेटलेली ही बाई म्हणते, की जन्मदाता कोण ते कधीच न कळूनसुद्धा माझं काहीएक बिघडलं नाही.. मी माझं आयुष्य छान आणि निवांत जगले!
दोन अधिक दोन म्हणजे चार हे फक्त गणितात असतं.. प्रत्यक्ष जगण्यात त्याचं उत्तर काहीही असू शकतं. आयुष्याविषयीचे विशिष्ट आडाखे, ठोकताळे मनाशी ठामपणे बाळगून भवतालाचा अर्थबोध होईलच, असं नाही. सार्या समजुतीला हादरे देणार्या गोष्टींकडे, त्या हादर्यातून सावरून नीट पाहिलं, तर सहजपणे ‘अस्वाभाविक’ म्हणून ठरवून टाकलेल्या गोष्टींतूनही वेगळंच काही तरी नजरेला सापडेल. आयुष्याची अंधारी बाजूही नीटशी दिसू लागेल.. ते सारंच स्वीकारार्ह असेल असंही नाही; पण हेही एक वास्तव आहे, याचं भान येईल.
कान महोत्सवात ‘मि. टर्नर’, ‘दॅट लव्हली गर्ल’, ‘द ब्लू रूम’, ‘तितली’, ‘मॉमी’ हे सिनेमे पाहताना असंच काहीसं मनाशी येत होतं.
‘दॅट लव्हली गर्ल’ या इस्रायली चित्रपटात बापलेकीच्या संबंधांची गोष्ट आहे. तो इतका थेट आणि हिंस्रपणे अंगावर येणारा चित्रपट होता, की अगदी युरोपियन प्रेक्षकदेखील उठून गेला. महत्त्वाची बाब म्हणजे, या चित्रपटाचे दिग्दर्शन चाळिशीच्या केरेन येदाया या बाईने केले आहे. बापमुलींतला संबंध हा जरी गोष्टीचा गाभा असला आणि तो पाहणं हे कितीही क्लेशकारक असलं, तरी हा चित्रपट पाहू शकलो याचं एक मुख्य कारण हेच होतं, की एका स्त्रीनेच तो दिग्दर्शित केला आहे. पुरुषातील ‘मालकी’ वृत्तीचं इतकं नेमकं भान बाईलाच असू शकतं. पन्नाशीचा मोशे विशीतल्या तामीचा अशा पद्धतीनं फायदा घेत आलाय, की ती वासनेच्या बंदिवासातून स्वत:ची सुटकाच करून घेऊ शकत नाही. गेल्याच वर्षी आपल्याकडल्या वर्तमानपत्रात वाचलेलं एका तिशीतल्या मुलीचं आत्मकथन ‘दॅट लव्हली गर्ल’ पाहताना आठवत होतं. वयाच्या बाराव्या वर्षापासून तिला तिच्या काकानं असं काही नादी लावलं होतं, की तिला त्यात काही गैरच वाटत नव्हतं. नर-मादी संबंध एवढय़ापुरतंच तिला ते कळत होतं आणि तिला ‘या’ बंदिवासात काका असलेल्या त्या नरानंच डांबून ठेवलं होतं आणि तिलाही तो बंदिवास हवाहवासा वाटत होता. ती पार भरकटली. इथं तामीचं तेच झालं. त्यामुळे कितीही अंगावर येणारा असला, तरी ‘दॅट लव्हली गर्ल’ अवतीभवतीचं हेही एक वास्तव म्हणून पाहू शकलो. हे असं घडून कसं आणि का येतं, याच्या मुळाशीच हा चित्रपट नेतो.
‘द ब्लू रूम’ हा मॅथ्यू अँमलरीक या फ्रेंच दिग्दर्शकाचा चित्रपटदेखील एक असंच वास्तव दाखवतो. ज्या स्त्री-पुरुषांमध्ये संबंध आहे, ती दोघंही विवाहित आहेत; परंतु दोघांना एकमेकांविषयीची अनावर ओढ आहे. हे अशा प्रकारचं कथानक किती तरी कथा-कादंबर्या, नाटक-सिनेमांतून येऊन गेलंय. इथं ते थोडसं वेगळं आहे. त्यांच्या गुप्त भेटीगाठी उघड होतात. संबंधितांना कळतात आणि हे सारं प्रकरण थेट कोर्टात जातं. आता कोर्ट या सार्या प्रकाराकडे कसं पाहतं, कशी त्याची कायदेशीर भाषेत चिकित्सा, नव्हे चिरफाड करतं आणि अखेरीस हाती काय लागतं, हे या चित्रपटाचं वेगळेपण आहे. काय बरोबर, काय चूक याच्या पलीकडे जाणारा हा आगळा कोर्टरूम ड्रामा म्हणूनच पाहण्यालायक होतो.
‘तितली’ हा एकमेव भारतीय चित्रपट यंदाच्या कान महोत्सवात होता आणि तोही असंच एक अस्वस्थ करणारं, खरं तर हादरवून टाकणारं वास्तव मांडणारा होता. चित्रपट सुरू झाला आणि अवघ्या पाचच मिनिटांत मला जाणवलं.. अरे हे तर विजय तेंडुलकरांचं ‘गिधाडे’ नाटक! म्हणजे तपशील वेगळे; परंतु तसंच एक कुटुंब.. बापाला बाप न म्हणणारं.. हिंसेचं, विकृतीचं कुठलंही टोक गाठणारं! ‘तितली’ थेटपणे ‘गिधाडे’वर आधारलेला नसला, तरी त्यातल्या व्यक्तिरेखांच्या या साम्यामुळे तसं वाटणं स्वाभाविक आहे. सर्वार्थानं प्रभावहीन झालेले वडील आणि पार हाताबाहेर गेलेली त्यांची तीन मुलं आणि तनमनावर शहारे आणील अशी त्यांची हिंस्र, विकृत वागणूक! ‘गिधाडे’ त्या वेळी पाहून जे वाटलं, तेच ‘तितली’ पाहताना वाटलं. हे पार गर्तेत सापडलेलं कुटुंब. कुणीही.. अगदी कुणीही हात दिला, तरी वर येणं शक्य नाही. चांगुलपणा त्यांच्यापासून लक्षावधी प्रकाशवर्षं दूर आहे. ‘इनका कुछ नहीं हो सकता’ अशा पद्धतीचं हे कुटुंब एका अटळ शोकांतिकेकडे निघालंय. ते स्वत: किंवा इतर कुणीही ते टाळू शकत नाही. या माणसांचा राग येत नाही.. त्यांची कीव वाटते. ‘गिधाडे’ किंवा ‘तितली’मधल्या या विकृत, हिंस्र माणसांची चिल्लीपिल्ली आज टीव्ही मालिकांतून बटबटीत रूपात वावरताना दिसतात. त्यांची आणि त्यांना निर्माण करणार्यांची मात्र वेगळ्या अर्थानं कीव वाटते.
परदेशातील महोत्सवात भारतीय चित्रपट, मग मी तो आधी पाहिलेला असो, मला आवडलेला-नावडलेला असो, मी तो आवर्जून पाहतो. आपला चित्रपट ‘ते’ कसा पाहतात, याचं कुतूहल असतं. ‘तितली’ मी पाहिलेला नव्हताच आणि त्याबद्दल मला काहीच माहीत नव्हतं. त्यामुळे तो ‘त्यांच्या’बरोबर पाहणं एक वेगळा अनुभव होता. सर्वच प्रेक्षक चित्रपटात पार बुडाले होते. काही तरी वेगळंच, असं समोर दिसत होतं.. ते पाहत होते.. समजून घेत होते. चित्रपटाच्या अखेरीस म्हणजे अक्षरश: पाचेक मिनिटं राहिलेली असताना मात्र दणादण विकेट पडल्या. बरेचसे लोक भराभर उठून गेले. कारण तोवरच्या कथनाला संपूर्णपणे छेद देणारं असं काही तरी पडद्यावर दिसलं. म्हणजे त्या तीन भावांतला सर्वांत धाकटा आपल्या बायकोला म्हणतो.. ठीक आहे. झालंगेलं गंगेला मिळालं. इथून पुढे आपण नीट वागू या आणि छान संसार करू या वगैरे वगैरे.. हे म्हणजे सैतानाच्या तोंडी देवाची भाषा..! वर म्हटल्याप्रमाणे हे कुटुंब म्हणजे दुरुस्तीच्या पार पल्याड असलेलं, मग त्यातल्या एकाच्या तोंडी ही भाषा! त्यातल्या त्यात किंचितसा सौम्य म्हणता येईल असा प्रसंग आणि एका प्रसंगी यानं काय केलंय..? तो आपल्या बायकोला घेऊन एका आडजागी जातो. तिला सांगतो, की माझा थोरला भाऊ आता कुठल्याही क्षणी तुझ्या वडिलांनी तुझ्या नावावर ठेवलेल्या पाच लाखांच्या फिक्स्ड डिपोझिटवर तुझी सही घेईल आणि पैसे ढापेल. ती म्हणते, मी सही करणार नाही. तो म्हणतो, तू काही करू शकणार नाही. तो सही घेईलच. माझ्याकडे एक उपाय आहे. मी तुझा उजवा हातच तोडतो. म्हणजे प्रश्नच मिटला. ती घाबरते. त्याहीपेक्षा चिडते; पण तो भावाबद्दल बोलला होता त्याप्रमाणे ती काहीच करू शकत नाही. तो पूर्ण तयारीनिशीच आलाय. तिचा हात दगडावर ठेवून तो हातोड्याने तिचा हात ठेचतो आणि मग हॉस्पिटलमध्ये नेऊन प्लॅस्टरही करतो. कारण ते पाच लाख त्याला हवे असतात.. आणि हाच माणूस त्याच बायकोला म्हणतो.. झालंगेलं.. गवय्यानं गाणं छान टिपेला न्यावं आणि तिथंच ते कोसळावं तसला प्रकार! ‘..आणि शेवटी ती दोघं सुखानं नांदू लागली’ असा गोड शेवट करण्याच्या नादात कनू बेहेलने सगळी लयच बिघडवून टाकली आणि म्हणूनच प्रेक्षक उठून गेले. कनूचा दिग्दर्शक म्हणून हा पहिलाच चित्रपट!
माणसं आणि त्यांचं जग हे जसं कसं कलावंताला दिसेल, तसं तो आपल्या कलाकृतीतून दाखवणार. त्यात वाचक- प्रेक्षकाने ‘हे दाखवलं तर चालेल, ते दाखवू नये’ असा भेद करू नये. त्यापेक्षा हे आपल्या आसपास येतं कुठून, याचा जमल्यास विचार करावा. परवाच्या पहिल्याच पावसात मुंबईची दैना उडाली. गाड्या रडत-रखडत चालल्या होत्या. रुळांमध्ये पाणी साचलं होतं. माझ्या शेजारी बसलेला इसम म्हणाला, ‘‘पाहिलीत रेल्वेची स्वच्छता. हे कधी रुळांमधला कचरा नीट काढणार नाहीत.’’
बाकीच्यांनी त्याला दुजोरा दिला; परंतु एकाच्याही मनात हा विचार आला नाही, की हा कचरा रेल्वे करते की आपण? कचरा, घाण पाहताना त्रास होतो; पण हा येतो कुठून? ख्यातनाम ब्रिटिश दिग्दर्शक माईल ली यांचा ‘मि. टर्नर’ हा अठराव्या-एकोणिसाव्या शतकातील प्रसिद्ध ब्रिटिश चित्रकार जे. एम. डब्ल्यू. टर्नर याच्या आयुष्यावर आणि अर्थातच कलाकारकिर्दीवर आधारलेला चित्रपट! हा मनस्वी तितकाच वैचित्र्यपूर्ण व्यक्तिमत्त्व असलेला कलावंत. त्याचं सारंच अनाकलनीय. मरणपंथावर असलेल्या बापाची त्याला अनावर ओढ, तर दुसरीकडे त्याच्या बायकोपोरांना तो अजिबात नकोसा. त्याचं घर आणि त्यालाही सांभाळणारी त्याच्याच वयाची अतिशय सौम्य आणि थंड प्रकृतीची त्याची हाऊसकीपर त्याच्या सेवेत कायम तत्पर. इतकी, की त्याच्या लहरी कामभावनेला त्याच्या पद्धतीनं प्रतिसाद देणारी. केवळ त्याच्यासाठी. तिला त्यात रस नाही. वडील गेल्यानंतर अधिकच सैरभैर झालेला हा चित्रकार घरात काम करता येत नाही; म्हणून समुद्रकाठी राहणार्या एका विधवेच्या घरी मुक्काम टाकतो आणि एक दिवस तिथंच जगाचा निरोप घेतो.. आणि यादरम्यान त्याची चित्रकला दुनियेला चक्रावून टाकत असते; परंतु त्याच्या चित्रांना दाद देणार्या जगालाही तो-तो हिडीसफिडीस वागवतो. एका वेगळ्याच मस्तीत जगतो. वावरतो. त्याचं अवघं व्यक्तिमत्त्व इतकं गुंतागुंतीचं, की त्याचा ठावच लागत नाही.. आणि हा असा माणूस कॅनव्हासवर जे काही चितारतो, ज्या पद्धतीनं चितारतो ते सारंच गोंधळात टाकणारं. त्याला जेवढं समजून घेण्याचा प्रयत्न करावा, तेवढा तो हातून निसटत जातो. तो तुसडेपणानं वागत राहतो आणि त्याच्या भोवतालच्या लोकांना आणि आपल्यालाही तो कलावंत म्हणून समजून घ्यावासा वाटतो.
‘मि. टर्नर’ची भूमिका तिमोथी स्पाल या ज्येष्ठ नटानं अक्षरश: अविस्मरणीय केली आहे. तेवढीच अप्रतिम कामगिरी सिनेमाटोग्राफर डिक पोप याचीही आहे. चित्रपटाचा नायक एक अवलिया, भन्नाट आणि अभिजात चित्रकार असल्यामुळे सबंध चित्रपटच त्याने एखाद्या अभिजात चित्रासारखा पडद्यावर साकारला आहे.
कॅनेडियन दिग्दर्शक झेव्हियर दोलान याच्या ‘मॉमी’मध्ये झटकन स्वीकारला जाणार नाही, असा एक आगळा प्रयोग होता; परंतु तो त्याने अशा आत्मविश्वासाने केला, की तो नाकारणं शक्यच नव्हतं. चित्रपटात ............(कॉपी सुटली)
रॅशियो! पूर्वापार चार बाय तीन (फोर इन टू थ्री) असं त्याचं मोजमाप होतं. त्यानंतर लोकप्रिय झालेला आणि अगदी सर्वसामान्य प्रेक्षकालाही माहीत असलेला आकार म्हणजे सिनेमास्कोप! त्याचं गणिती प्रमाण सोळा बाय नऊ! त्यामुळे चित्रप्रतिमा आयताकृती आणि लांबुडकी दिसते. ‘मॉमी’मध्ये हेच प्रमाण एक बाय एक होतं! जगातला हा अशा प्रकारचा पहिलाच प्रयत्न आणि अर्थातच यशस्वी! या रॅशियोमुळे पडद्यावर जी प्रतिमा पोट्र्रेटसारखी येते, माणूस हा त्याच्या भवतालासकट असतो, असं मानलं जातं. त्यामुळे कलाकृतीतून माणूस आणि त्याच्या अस्तित्वाचा अविभाज्य भाग असलेला भोवताल दाखवला जातो. झेव्हियर दोलानने ‘मॉमी’मध्ये एक बाय एक हा रॅशियो वापरताना या पारंपरिक दृष्टिकोनालाच छेद दिलाय. त्याचं सरळ, साधं म्हणणं असं, की माझ्या व्यक्तिरेखांमध्ये त्यांचा भोवताल सामावलेलाच आहे आणि म्हणून तो मला वेगळा दाखविण्याची गरज नाही. खरं तर हे आपल्या रोजच्या व्यवहारातलंच निरीक्षण आहे. एखाद्याला पाहून आपण नाही का लगेच म्हणत, हा मुंबईचा आहे.. पुण्याचा आहे.. नागपूरचा आहे किंवा गावाकडचा आहे. दोलानच्या प्रयोगाला आणखीही एक प्रयोजन असावं, आहे. एक बाय एकमध्ये पडद्यावर उमटणारी प्रतिमा ही आज हाताहातांत असलेल्या मोबाईलच्या इमेजची आहे. प्रेक्षक बदलतोय, त्याच्या धारणा बदलताहेत आणि म्हणून मग कलेतही बदल आपसूक होणारच!
चित्रपटात एका दृश्यात पौगंडावस्थेतला कथानायक आणि त्याची आई सायकलवरून सुसाट गावाबाहेर जाताना पुढे असलेला तो मुलगा सायकलवरचे दोन्ही हात उचलीत दोन्ही हातांनी पडदा दूर सारावा तशी अँक्शन करतो आणि चित्रप्रतिमा मोठी होते. या वेळी सबंध प्रेक्षागृहाने या प्रयोगाला मन:पूत दमदार दाद दिली आणि पारंपरिक चित्रप्रतिमेलाही मानाचा मुजरा केला.
खूप काही लिहिता येण्याजोगं आहे; परंतु हे असं काही तरी वेगळं, प्रसंगी आपल्या धारणांना दणके देणारं पाहण्याची क्षमता प्रेक्षक म्हणून आपण कमावली पाहिजे. गेल्या ३५ वर्षांत विविध महोत्सवांतून हेच सारं शिकत आलो. कानमध्ये आणखी नव्यानं काही हाती आलं. ते तुमच्याशी शेअर करावसं वाटलं. केलं. अजून बरंच काही आहे, ते माझ्या इतर लेखनातून आणि गप्पागोष्टींतून येतच राहील. तुर्तास निरोप घेतो..!