- भीष्मराज बाम
एका विद्यार्थ्याने विचारलेली शंका आहे. प्राणायामाचा आणि ध्यानाचा उपयोग खेळामध्ये आणि इतर क्षेत्रांत कशा प्रकारे होतो?
आता योगाच्या तंत्रांचा उपयोग जगभरचे खेळाडू आणि इतर क्षेत्रांतले लोकही करायला लागले आहेत. या तंत्रांमुळे शरीर, इंद्रिये आणि मन या शक्तींवर उत्तम प्रकारे ताबा येऊ शकतो. नुकत्याच विम्बल्डनच्या टेनिस स्पर्धा पार पडल्या. जोकोविच आणि फेडरर या दोन खेळाडूंनी उत्कृष्ट टेनिस कसे खेळायचे असते, त्याचा वस्तुपाठच क्रीडाप्रेमींसमोर ठेवला. सतत साडेतीन-चार तास दमछाक करून टाकणारा हा खेळ खेळत राहणे आणि त्याला लागणारी अतिशय उच्च दर्जाची एकाग्रता टिकवून ठेवणे म्हणजे खेळाडूच्या कौशल्याची कसोटी पाहणारे असते. फेडरर आता थकायला लागलेला आहे, तर जोकोविच गुडघ्याच्या दुखण्याने बेजार झालेला. अशा परिस्थितीत त्या दोघांनी ज्या दर्जाचा खेळ केला, त्याला तुलना सापडणे अवघडच आहे. आणि सामना संपल्यावर घेतल्या गेलेल्या मुलाखतीत त्यांनी एकमेकांबद्दलचा आदर व्यक्त केला तेही लक्षणीय होते. प्रतिस्पध्र्याविषयी मनात आकसाची भावना येऊ न देणे हे स्वत:च्या मनावर पक्का ताबा असल्याचे लक्षण असते.
जागतिक दर्जाचे खेळाडू हे बहुतांशी तरुण असतात. तारुण्यात अनेक प्रलोभने मोहात पडायला हजर असतात. त्या प्रलोभनांत गुंतून न पडता अतिशय जलद गतीने आपल्याकडे येत असलेल्या चेंडूवर पूर्ण लक्ष एकाग्र करून, स्वत:च्या हालचालीवर नियंत्रण ठेवीत, अचूक टायमिंग साधून हव्या त्या ठिकाणी व हव्या त्या गतीने चेंडू परत टोलवायचा, आणि हे करत असताना थकवा आणि ताणतणाव यांना तोंड देत आपला उत्साह टिकवून धरायचा, यातले काहीच सोपे नाही. हे सगळे साधण्यासाठी आपल्या प्राणशक्तीवर उत्कृष्ट नियंत्रण असावे लागते. प्राणायामाने या शक्ती आणि कौशल्य आपल्या यंत्रणेमध्ये वाढीला लागतात. मुळात आलम्बनाची निवड करण्याची म्हणजे लक्ष कशावर एकत्रित करायचे ते ठरवण्याची शक्तीच प्राणायामामुळे आपल्या यंत्रणेत येते. ही शक्ती आपण नियमित प्राणायाम करून कमावलेली नसली तर प्रलोभनांची ओढ आवरता येणे शक्य होत नाही. प्रत्यक्ष प्रलोभन समोर नसले तरी त्याचे विचार मनाला व्यापून टाकतात आणि एकाग्रतेचा दर्जाच कमी होतो.
प्राणशक्ती म्हणजे काय ते नीट समजावून घ्यायला हवे. आपण श्वास घेतो तेव्हा नुसती हवा आत घेत नाही. तिच्याबरोबर विश्वातले चैतन्यसुद्धा आपल्या शरीरात प्रवेश करीत असते. जी ऊर्जा आपल्याला आपली शरीरयंत्रणा चालवण्यासाठी लागणार असते, ती श्वासाबरोबर आपण जे अन्न पाणी घेत असतो, त्याच्याबरोबर आपल्या शरीरात प्रवेश करते. विचार करणे, भय, शोक, संताप, द्वेष यांसारख्या भावनांचा सामना करणे, आवश्यक त्या हालचाली करणे या सर्व बाबींसाठी ही ऊर्जा वापरली जाते. आपला आहार, विहार आणि विचार यांवर कोणत्या प्रकारच्या ऊर्जेला आकर्षित करून तिचा साठा करायचा ते आपली यंत्रणा ठरवते. आता खेळताना किंवा कोणत्याही महत्त्वाच्या कार्यात असताना आपले लक्ष जर प्रलोभनाकडे जात राहील तर त्या प्रलोभनासाठी लागणार्या शक्तीचा आणि ऊर्जेचा साठा यंत्रणेत होत राहील. यासाठी सराव करताना किंवा मॅच खेळताना आपण काय करतो आहोत त्याकडे पूर्ण लक्ष असणे गरजेचे आहे. म्हणजे त्या खेळासाठी लागणारे कौशल्य आणि शक्ती आपल्या यंत्रणेमध्ये निर्माण व्हायला लागतात आणि त्यांचा साठासुद्धा केला जातो. म्हणजे ती सिद्धीच आपल्यामध्ये येते. तुम्ही जर विम्बल्डनच्या अंतिम फेरीचा सामना बारकाईने पाहिला असेल तर त्या दोन्ही खेळाडूंच्या खेळातली सहजता तुमच्या ध्यानात आली असेल. ही सहजताच त्यांच्या कौशल्यातल्या सिद्धीची निर्देशक असते. ती मिळवायला आणि प्रकट करायला खूप उत्कृष्ट दर्जाची एकाग्रता आवश्यक असते. ती प्राणायाम आणि ध्यान या योगातल्या दोन प्रक्रियांनी उत्तम प्रकारे साधते.
लक्ष प्रलोभनावरून आलम्बनावर आणत राहणे प्राणायामाच्या अभ्यासाने चांगले जमायला लागते. आणि ते तिथे टिकवून ठेवण्याच्या शक्तीसाठी ध्यानाचा अभ्यास खूपच उपयोगी पडतो. या दोन्ही प्रक्रियांचा चांगला अभ्यास झालेला असला तर खेळातच काय इतर कोणत्याही क्षेत्रात प्रावीण्य मिळवणे सहज साधते. कारण व्यक्ती, वस्तू आणि घटना यांच्या मूळ स्वरूपाचे आकलन अचूक आणि जलदगतीने व्हायला लागते. प्रतिसादही पटकन सुचायला लागतात आणि ते ताबडतोब अमलातही आणता येणे शक्य व्हायला लागते. जी मंडळी अशा अभ्यासाची काळजी घेत नाहीत, ती मागे पडायला लागतात आणि तुम्ही त्यांच्या पुढे निघून जाता. तुमची कामगिरी आपोआप नजरेत भरायला लागते. म्हणजे मग तुम्ही निवडलेल्या क्षेत्रात तुम्हाला यश आणि कीर्ती ही दोन्ही वाट्याला येत राहतात.
यशाचा मद आणि अपयशाचा शोक हे दोन्ही अनुभव पचनी पडावे लागतात. विम्बल्डन अंतिम फेरीतल्या दोन्ही खेळाडूंनी आपापला विजय आणि पराजय स्वत:चा तोल जाऊ न देता स्वीकारले. म्हणूनच त्या दोघांचेही सामना संपल्यानंतरचे वागणे लोभस असेच होते. मनाचा समतोल राखणे हे ध्यानातून शिकायला मिळते. त्याचाही अभ्यास व्हावा लागतो. नाहीतर जिंकलेले आणि हरलेले हे दोन्ही गुण मनाचे संतुलन बिघडवू शकतात. प्रतिस्पध्र्याचा चांगला खेळ आपल्या मनावर दडपण आणून चुकीचे प्रतिसाद प्रगट करायला लागतो.
प्रतिस्पध्र्याने चांगला खेळ करणे हे अपेक्षितच असायला हवे. त्याच्या उत्तम खेळाला प्रतिसाद म्हणून आपला खेळ आणखी बहरायला हवा. नाहीतर अजिंक्यवीर होण्याची स्वप्ने प्रत्यक्षात आणण्याची संधी पात्रता असूनही गमवावी लागेल. प्राणायाम आणि ध्यान यांचा अभ्यास शरीराची आणि मनाची शक्ती तर वाढवतोच; पण आपले कौशल्य कसोटीच्या क्षणी सहज प्रगट करायला मदत करतो. म्हणूनच तो सर्वांनी सतत आणि खंड पडू न देता करीत राहायला हवा.
(लेखक ज्येष्ठ क्रीडाप्रशिक्षक व
सामाजिक घडामोडींचे अभ्यासक आहेत.)