डॉ. अरुण बापट
पुणे जिल्ह्यात आंबेगाव तालुक्यात माळीण येथे शैलस्खलन होऊन अंदाजे १३0 पेक्षा अधिक लोक मृत्यू पावले. महाराष्ट्रात भू व शैलस्खलन, पूर, भूकंप आदी दुर्घटना घडल्यावर बरीच चर्चा होते, चौकशी समिती स्थापिली जाते आणि नंतर काहीच होत नाही. नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापनात आपत्तीनंतर काय करायचे, यावर भर देऊन सगळी आखणी केली जाते. आपत्तीच्या आधी विकास योजना आखताना आपत्ती होण्याची शक्यता विचारात घेऊन विकास आराखडा क्वचितच तयार केला जातो. याचे उदाहरण म्हणजे भारतीय मानक संस्थानचे भूकंपविषयक पुस्तक (कोड). यात इमारत, पूल, धरण आदी भूकंपप्रतिरोधक कसे बांधावे, याची विस्तृत माहिती आहे; पण विकास आराखडा तयार करताना भूकंपाचा कसा विचार करावा, याचा ऊहापोह नाही.
माळीण येथील शैलस्खलनाच्या आधी महाराष्ट्रात विशेषत: कोकण आणि पश्चिम घाटात १९८९ व २00५ला मोठय़ा प्रमाणात घटना घडल्या आहेत. या घटना अतवृष्टिमुळेच होतात. वृष्टीवर मानवाचे नियंत्रण नाही, हे वैज्ञानिक सत्य आहे. तथापि, आपत्तीस प्रशासन जबाबदार आहे, असा डांगोरा पिटला जातो. २00५ जुलै महिन्यात महाराष्ट्रात प्रचंड पाऊस पडला. २६ जुलै २00५ ला मुंबईत एका दिवसात १000 मिलिमीटर पाऊस पडला. याच वेळी कोकणात शैल-स्खलनाने धुमाकूळ घातला. महाडला ५४, जुई गावात १00, कांदिवले येथे ३४, रोह्यात ८ आणि पोलादपूरला काही अल्प प्रमाणात हानी झाली. मुंबई शहर पाण्यात बुडले. वाहतूक बंद झाली. मी त्या दिवशी सहारा विमानतळावरून पुण्यास परत यायला निघालो होतो. तेथून सांताक्रूज विमानतळावर यायला सहा तास लागले. रात्रभर कारमध्ये बसलो.
मुंबईतील अतवृष्टी व कोकणातील शैलस्खलन याच्या चौकशीसाठी एक समिती स्थापन झाली. समितीने अहवाल दिला. यातील महत्त्वाचा मुद्दा मुंबईतील पाणी साठणे व ते वाहून न जाणे अथवा सावकाश जाणे. भरतीच्या वेळी पाण्याचा निचरा न होणे. मुंबईमधील ड्रेनेज व जल विकास हे अंदाजे ७५ वर्षांपूर्वीचे स्थापित आहे. त्यानंतर वस्ती, इमारती, रस्ते, वाहतूक प्रचंड प्रमाणात वाढली आहे; पण अजूनही ७५ वर्षे जुनी मोडकळीस आलेली यंत्रणा वापरली जाते. यामुळे दर वर्षी नाना चौक, परळ, हिंदमाता चौक, सायन सर्कल आदी ठिकाणी एक ते दीड मीटर उंचीचे पाणी जमा होते. गेली अनेक दशके हे चालू आहे.
मुंबईसारखीच परिस्थिती जपानची राजधानी टोकियो येथे होत असे. पावसाळ्यात पाणीसाठे निर्माण होऊन त्रास होत असे. तेथे अभ्यास व संशोधन करून एक नवीन पद्धती विकसित केली. पाण्याचा निचरा आणि ड्रेनेज यासाठी चार ते सहा वर्ग किलोमीटर म्हणजे २ बाय २ अथवा २ बाय ३ किमी वर्ग एवढे भाग केले व या क्षेत्रापुरतीच निचर्यासाठी वरील व्यवस्था केली. पाण्याचा निचरा होणारे पाईप हे समुद्रात ३-५ मीटर खोलीवर होते, ते जमिनीखाली १00-२00 मीटर खोल अंतरावर केले व तेथे पाणी समुद्रात जाते. यामुळे भरतीच्या पाण्याचा यावर विपरीत परिणाम होत नाही. मुंबईच्या समुद्र किनार्याचा योग्य अभ्यास करून निचरा करणार्या पाईपची खोली ठरवून योग्य वैज्ञानिक पद्धतीचा अवलंब करून या संकटावर काही प्रमाणात मात करणे शक्य आहे.
याच वेळी कोकणातील शैलस्खलनाचा (रॉकस्लाईड) धोका कमी करण्यासाठी विविध उपाय सुचविले होते; पण यातील सूचनांचा प्रत्यक्षात उपयोग झालेला दिसत नाही. संवेदनशील शैलस्खलन क्षेत्रात साधारणत: ८-१0 मीटर खोलीवर काही सेन्सर/ चिप ठेवून त्यावर खडकातील सूक्ष्म हालचाली अथवा दबावाची नोंद केली जाते. ही नोंद तेथे सूर्य ऊज्रेवर चालणार्या ट्रान्समीटरद्वारे मुख्यालयात लगेच पाठविली जाते व अशाप्रकारे शैलस्खलनाची पूर्वसूचना अंदाजे २0-२५ तास अगोदर मिळते. अशी यंत्रणा केरळमधील मुन्नार येथे लावली आहे व त्याचा योग्य उपयोग होत आहे. अशा प्रकारची यंत्रणा बसविण्यासाठी महाराष्ट्र सरकारने डिसेंबर २0११ मध्ये निविदा मागविल्या होत्या; पण त्याचे पुढे काय झाले, हे फक्त दगडालाच माहीत आहे, असे म्हणावे लागते.
प्रत्येक वेळी कुठलाही उपाय करण्यासाठी सरकारकडे मागणी केली जाते. स्थानिक प्रशासन, नगरपालिका यांचे क्षेत्रात करता येण्यासारखा कमी खर्चाचा उपाय म्हणजे ‘गॅबिऑन वॉल’चा उपयोग करणे हा आहे. गॅबिऑन म्हणजे जाड नायलॉनच्या (२-३ सें.मी. जाडी) दोराने १ बाय १ बाय १ मीटर आकाराचा एक पिंजरा करायचा. या पिंर्जयामध्ये साधारण आकाराचे म्हणजे १0 ते १५ किलो वजनाचे दगड ठेवायचे व या पिंर्जयाचे झाकण बंद करून शिवून टाकायचे, असे पिंजरे एकमेकास जोडून एक लांब भिंत तयार होते. या भिंतीचा फायदा म्हणजे ही भिंत लवचिक असते व पुढे-मागे सरकू शकते. अशा गॅबिऑन भिंती समुद्रतटावर वापरल्या जातात. कोकणात संभाव्य शैलस्खलन क्षेत्रामध्ये याचा वापर केल्यास शैलस्खलन झाले, तरी वरतून येणारी दरड या भिंतीस अडून जोर कमी होईल. या गॅबिऑन भिंतीवर जरी मोठी दरड पडली, तरी ती तुटण्याऐवजी खाली सरकेल आणि हानी कमी होईल. जर दरड लहान असेल, तर हानी होणार नाही. तीव्र चढाव असलेल्या घाटामध्ये अशाप्रकारे उपाय योजना करता येणे शक्य आहे. पुणे-नाशिक रस्त्यावरील चंदनापुरी घाट, कोकणातील वरंधा घाट आदी घाटांत पाहणी करून योग्य उपाय योजना करणे आवश्यक आहे. बर्याच घाटात खडक फोडून रस्ता तयार केला जातो व फोडलेला खडक रस्त्याशी ९0 अंशांत, काटकोनात उभा असतो. जर तेथील खडक क्षतिग्रस्त (फ्रॅक्चर्ड) असेल, तर तेथे शैलस्खलन होऊ शकते. ९0 अंशांऐवजी १00-१0५ अंशांत भिंत उभी असल्यास हा धोका कमी होऊ शकतो.
घाटातील रस्त्यावर ब्रेकफेल होऊन बरेच वेळा अपघात होतात. यावर हे टाळता येत नाहीत, असे म्हटले जाते. यावर काही प्रमाणात उपाय करणे शक्य आहे. तीव्र उतार असलेल्या मार्गात रस्त्याच्या कडेला एक चढाव केल्यास यावर उपाय करता येतो. याला इर्मजन्सी रॅम्प, असे म्हणतात. रस्त्याच्या कडेला साधारणत: ३-४ मीटर रुंदीचा ३0-४0 मीटर लांब तीव्र रस्ता म्हणजे याचा स्लोप १:१८ किंवा १:२0 एवढा असतो. ब्रेक फेल झालेली कार या रॅम्पवर जाऊन (कधी-कधी २ वेळा खाली-वर होऊन) थांबते. भारतात अशा प्रकारचे रोड इर्मजन्सी रॅम्प कुठेच केलेले आढळत नाहीत. महाराष्ट्राने यात पुढाकार घ्यावा आणि एक चांगले उदाहरण करून दाखवावे.
आपत्तीपासून आपण काही शिकत नाही, याचे एक उदाहरण अहमदाबाद येथील भूकंपकाळात झालेल्या हानीचे आहे. अहमदाबाद येथे एका बहुमजली इमारतीच्या गच्चीवर पोहोण्याचा तलाव परवानगी नसताना अनधिकृतरीत्या बांधला होता. भूकंप काळात यातील ७५,000 लिटर पाण्याचे वजन, दाब व शक्ती यांचा परिणाम झाला. ही इमारत एखादा खिळा हतोड्याने ठोकल्याप्रमाणे, जमिनीत खाली ठोकली गेली.
खालचे २ मजले पूर्णपणे जमिनीत गेले व त्यातील सर्व माणसे जिवंत गाडली गेली आणि तिसर्या मजल्यावरील लोक घरातून जमिनीवर चालत बाहेर आले आणि ही इमारत पडली नाही. त्यानंतर अहमदाबाद महानगरपालिकेने योग्य प्रशासनिक कारवाई आणि कायदे केले. हे २00१ साली घडले. त्यानंतर मुंबईमध्ये इमारतीत वरच्या मजल्यावर पोहोण्याचे तलाव बांधले जात आहेत. मुंबईस उंच इमारतीस भूकंपाचा धोका ६.५ शक्तीच्या भूकंपामुळे आहे. अशा प्रकारचे संभाव्य भूकंपीय क्षेत्र कोयना (महाराष्ट्र) खंडवा (मध्य-प्रदेश) आणि सुरत (गुजरात) येथे आहेत. यावर विचार केल्यास योग्य होईल.
सध्या विकास आणि प्रगतीचा विचार चालू आहे. नैसर्गिक आपत्तीचे विज्ञान समजणे आणि निसर्गाशी मैत्रीने वागूनच योग्य विकास होऊ शकतो. या संबंधी योग्य जनजागृती केल्यास नैसर्गिक आपत्तीपासून होणारे नुकसान, योग्य शास्त्रीय पद्धतींचा उपयोग करून कमी करणे अथवा टाळणे शक्य आहे.
(लेखक ज्येष्ठ भूकंपतज्ज्ञ आहेत.)