- इब्राहिम अफगाण
हवाई छायाचित्रणाची आपली स्वतंत्र अशी शैली आणि तंत्र असते. आपला दृष्टिकोन बदलून टाकणारा हा अनुभव असतो. जे आपण नेहमीच्या रोजच्या आयुष्यात पाहू शकत नाही, ते आपल्याला हवाई छायाचित्रणातील आशय दाखवतो. तो अनुभव कालिदासाच्या ‘मेघदूत’मधल्या मेघाच्या पर्वतराजींतील प्रवासाच्या अनुभवाइतकाच अद्भुत असू शकतो.
गोपाळ बोधे यांनी आपल्या छायाचित्रणातून या अद्भुत दृष्टिकोनांनी अचंबित केले. मग ते मुंबईचे लँडमार्क असलेल्या गेटवे ऑफ इंडियाच्या छतावरचे तोपर्यंत कोणीही न पाहिलेले गोल घुमट असतील किंवा गोव्यातील शांतादुर्गा मंदिराच्या परिसराचा वन शॉट ले-आऊट असेल. त्यांनी नवीन दृष्टिकोन निर्माण केले यात शंका नाही.
गोपाळ बोधे यांची माझी ओळख झाली, ती त्यांच्या पहिल्या पुस्तकाच्या निमित्ताने. त्यांना भेटेपर्यंत मला एरियल फोटोग्राफी या विषयाबद्दल काहीही माहिती नव्हते आणि गोपाळ बोधे यांच्याबद्दलही. त्यांच्या वांद्रे खेरवाडी येथील घरी त्यांची पहिली भेट झाली आणि त्यानंतर कामासाठी आणि कामाशिवाय अनेक भेटी तेथेच झाल्या.
‘गोवा : अ व्ह्यू फ्रॉम हेवन्स’ हे त्यांचे पहिले पुस्तक. मी गोव्याचा असल्याने त्यांच्या फोटोंच्या टेक्स्ट रायटिंगसाठी माझे नाव समीर कर्वे यांनी सुचविले होते. मी गोव्यातील क्वचितच एखादा भाग असेल, जेथे गेलो नाही. सगळा गोवा मला माझ्या पद्धतीने ‘माहितीचा’ होता. गोपाळ बोधे यांच्या पहिल्या भेटीतच त्यांनी माझी माहिती चुकीची ठरविली. असा गोवा मी कधीच पाहिला नव्हता. मला वाटतं, तोपर्यंत त्यांच्याशिवाय अन्य कोणीही पाहिला नव्हता. त्यांनी त्यांच्या आकाशातील डोळ्यांनी माझी गोव्याची नवीन ओळख करून दिली होती.
गोव्यातील सगळ्या नद्या, किल्ले, कारखाने आणि अर्थातच किनारे जसे त्यांनी दाखवले, तसे कोणीही कधीही पाहिले नव्हते.
पर्यावरणाचा अभ्यास करण्यासाठी एरियल फोटोग्राफीचा चांगला उपयोग होऊ शकतो, असा त्यांचा विश्वास होता. तो किती खरा आहे, हे त्यांनी काढलेल्या मुंबईच्या मँग्रोव्हच्या पट्टय़ांच्या फोटोतून सिद्ध होते. कोणत्याही प्रदेशाची टोपोग्राफी निश्चितपणे कळण्यासाठी या तंत्राचा कसा उपयोग करता येईल. टाऊन प्लॅनिंगसाठी हे तंत्र किती परिणामकारक आहे, हे पटवण्याचा एक आग्रहीपणा त्यांनी नेहमी जोपासला. त्यातील एक चांगली गोष्ट म्हणजे, आपला अनुभव आणि तांत्रिक माहिती व मार्गदर्शन त्यांनी त्यांच्या पहिल्या पुस्तकात नमूद केले आहे.
एक गोष्ट आवर्जून सांगायला हवी ती ही, की अन्य फोटोग्राफी आणि एरियल फोटोग्राफी यांत एक महत्त्वाचा फरक असतो. बाकी अन्य कोणत्याही फोटोग्राफीत फोटोग्राफरपेक्षा कोणताही दुसरा घटक निर्णायक ठरत नाही. मात्र, हवाई छायाचित्रणात जो पायलट तुम्हाला आकाशात घेऊन जाणार आहे,
त्याच्याशी समन्वय अत्यंत महत्त्वाचा असतो आणि फोटोग्राफरला आपण काय साध्य करू इच्छितो आणि कोणत्या अँगलने कसा फोटो घेऊ इच्छितो, हे आधीच पायलटशी ठरवून घेणे आवश्यक असते. अन्यथा सगळी मेहनत बेकार जाऊ शकते, असे अनुभवाचे बोल त्यांनी सांगितले आणि चांगली बाब म्हणजे, ते त्यांनी आपल्या पहिल्या पुस्तकात लिहून ठेवले.
त्यांनी काही वर्षांनी गोव्याच्या धर्तीवर मुंबईवरचे पुस्तक केले. त्यांनी त्यातील काही निवडक छायाचित्रे मला पाठविली. तेव्हा मी गोव्याला दैनिक गोमन्तकमध्ये होतो. मी ती छायाचित्रे पाहून थक्क झालो. ती छायाचित्रे म्हणजे एक तंत्रज्ञ कलावंत बनल्याचा पुरावा होता. सातत्याने एका क्षेत्रात काम केल्यानंतर तीच कॅमेर्याची लेन्स, त्याच्या मागच्या बदललेल्या डोळ्याला कसा प्रतिसाद देते, याचा तो पुरावा होता. त्यांच्या छायाचित्रांना पेंटिंगचे स्वरूप आले होते. त्याचा उत्तम पुरावा म्हणजे त्यांनी अरबी समुद्रातून सुमारे ४५ अंशांवरून टिपलेले मुंबईचे सुरू होणारे टोक! या छायाचित्रांचे मी दैनिक गोमन्तकच्या दिवाळी अंकामध्ये फोटोफीचर प्रकाशित केले होते. पुढे त्याचे पुस्तक प्रकाशित झाले.
त्यांच्याशी एका कामाच्या निमित्ताने सुरू झालेले आमचे संबंध पुढे कामाविनाही सुरू होते. त्यांच्या स्वभावात एक मधाळपणा होता. जो पहिल्या भेटीतच जाणवला होता. तोच त्यांच्या कोणत्याही फोनवरही शेवटपर्यंत जाणवला. बहुधा सकाळच्या वेळी त्यांचे फोन असत. बर्याच काळाने त्यांचा फोन यायचा आणि त्यांनी मधल्या काळात काय काय केले आणि आता काय करणार, याबद्दल ‘ब्रेकिंग न्यूज’ पद्धतीने ते अपडेट करीत. त्यांचा जोश सतत ताजा असायचा आणि त्यात कधीही तणाव जाणवायचा नाही. त्यांच्यासोबत पुस्तकाचे काम करताना सुरुवातीचा माझा अवघडलेपणा दुसर्या भेटीपासून गायब झाला. मग त्यांच्या घरी जेवणं, गणपती, प्रेसमधल्या फेर्या, डिझायनरसोबतच्या बैठका, तेव्हाचे (आणि आताचेही) गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर र्पीकरांशी चर्चा आदी गोष्टींत मी असण्याचा माझ्या कामाशी तरी काही संबंध नव्हता. मग गोव्याला जातोय म्हटल्यावर ‘र्पीकरांसाठीच्या प्रती माझ्याऐवजी तूच घेऊन जा,’ हा प्रेमाचा आदेश हे त्यांनी स्नेह असाच सहज जोडला होता. ‘तिची काळजी घे हं,’ असे ते नेहमीच फोन संपवताना सांगत.
आता ते नाहीत; परंतु त्यांनी हजारोंच्या संख्येने अत्यंत मौलिक अशी छायाचित्रांची संपदा मागे ठेवली आहे. त्या सगळ्यांचे संग्रहाच्या रूपात जतन व्हायला हवे. त्यांनी एक नवीन दालन सुरू केले; त्याचा अभ्यासकांसाठी चांगला उपयोग व्हायला हवा. माणसाने आपल्या मृत्यूवर मात केवळ स्वत:च्या पलीकडे जाऊन केलेल्या कामातून केली आहे. थर्मल इमेजिंग, इन्फ्रारेड एरियल फोटोग्राफी हे काही विषय त्यांच्या डोक्यात होते. त्यांनी थर्मल इमेजिंगवर बरंच काम केलं होतं. प्रशासनाला यातुलनेने भारतात नवीन असलेल्या विषयाबद्दल जागरूकता आणण्यासाठी आणि त्याची उपयोजिता पटवून देण्यासाठी त्यांचे प्रयत्न सुरू होते. त्यांची ही छायाचित्रे मीही पाहिली होती. त्यावर त्यांनी माझे एक चांगले बौद्धिकही घेतले होते. त्यांनी देशभरातील लाईट हाउसेस आपल्या कॅमेर्यात पकडले होते. त्यांच्या या कार्याचा पुरेपूर उपयोग, हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल.