- संहिता अदिती जोशी
इंटरनेटवरचं मराठी लेखन सुरू झालं ते परदेशी स्थायिक असणार्यांच्या स्मरणरंजनाच्या, मराठीत संवाद साधण्याच्या ओढीतून! प्रारंभी हे लेखन गप्पा, संपर्काची ओढ, अनुभवांची (उगीचच केलेली) देवघेव, पाककृतींची देवाणघेवाण अशा गोष्टींभोवतीच प्रामुख्याने फिरत होतं. त्यात शिळोप्याच्या गप्पा आणि अर्थातच टिंगलटवाळीची मजा होती. हळूहळू या गप्पांना टोकदार मतप्रदर्शनाची धार चढू लागली. वाद-प्रतिवाद सुरू झाले. विषय निवडून चर्चा घडू लागल्या. ..आणि मराठी संकेतस्थळांना आपापले चेहरे गवसू लागले.
आंतरजाल म्हणजे (मराठीत) इंटरनेट.
आंजावरचं मराठी लेखन सुरू झालं ते परदेशी स्थायिक असणार्यांच्या स्मरणरंजनाच्या, मराठीत संवाद साधण्याच्या ओढीतून. केवळ गप्पा आणि शेरामारीतून आंजावरचं मराठी लेखन बाहेर पडायला लागल्यावर उखाळ्यापाखाळ्या आणि नंतर (अर्थातच) वाद सुरू झाले. सहजच्या गप्पाटप्पांना हे असं बाळसं चढू लागल्यावर मग मराठी संस्थळांच्या संयोजकांना संपादकपणाची कात्री हाती घेणं गरजेचं झालं असावं.
संस्थळाचे अनेक सदस्य लिहिण्यासाठी आपल्या स्वभावाला शोभेल असं किंवा काही कारणांमुळे पडलेलं टोपणनाव वापरतात. एकाच गोष्टीकडे, घटनेकडे बघण्याचे वेगवेगळे दृष्टिकोन प्रतिक्रियांतून समोर येतात. पण या स्वातंत्र्याचा गैरफायदा घेणारे किंवा लोकांना त्रास देण्यासाठीच लेखन करणारे मोजके सदस्यही मराठी आंजावर आहेत. यातून होणारा मनस्ताप कमी करण्यासाठी आंजावर संपादक आले. यांचं काम साधारण व्यवस्थापकाचं असतं, पण आंजावर संपादक हा शब्द रूढ आहे, तेव्हा तोच वापरूया.
सुरुवातीच्या काळात या संस्थळांवर नक्की कोण संपादक आहेत, आपल्या प्रतिसादांना कोणी आणि का ‘कात्री लावली’, अशासारखे प्रश्न आंजावर अनुत्तरित होते. हळूहळू त्याची उत्तरं आणि नवे मार्ग शोधण्याचे प्रयोग सुरू झाले. (वेगवेगळ्या संस्थळांनी यासंदर्भात केलेल्या प्रयोगांचे तपशील लेखासोबतच्या चौकटीत.)
‘आंजा’वर येतं कोण?
मराठी संस्थळं सुरू झाली तेव्हा भारतात इंटरनेट पसरायला सुरुवात झालेली नव्हती. अगदी सुरुवातीला फक्त प्रगत, पाश्चात्त्य देशांत राहणारे मराठी भाषिक असा वर्ग आंजावर होता.
1999 च्या सुमारास भारतात आधी डायलअप आणि काही वर्षांत केबलनेट आलं. आंतरजालावर चर्चा, वाद, दंगामस्ती करण्यासाठी अर्थातच पोटापाण्याचा प्रश्न सुटलेला असणं महत्त्वाचं होतं. त्यामुळे सुरुवातीच्या या हौशीहौशीच्या काळात मराठी आंजावर शिकलेल्या, सुस्थित वर्गाचंच अस्तित्व होतं. त्यातही दिवसभर संगणक वापरून काम करणार्या लोकांचं, आयटीत नोकरी करणार्यांचं, प्रमाण सगळ्यात जास्त होतं. आजही आयटीवाल्यांचं प्रमाण बरंच जास्त असलं तरीही गेल्या चार-पाच वर्षांमध्ये जाती आणि व्यवसाय या दोन्हींमधलं वैविध्य वाढलेलं दिसतं. याचं कारण अनेकांना परवडतील असे स्मार्टफोन्स आणि इंटरनेट प्लॅन्स हे आहे.
त्यातही फेसबुकचं स्मार्टफोन अँप सहज उपलब्ध आहे. त्यामुळे फक्त फोनवरून जालावर येणारे लोक मराठी संस्थळांपेक्षा फेसबुकवर अधिक सापडतात. फेसबुकच्या मोठय़ा प्रमाणावर असणार्या लोकप्रियतेचं हे एकमेव कारण नव्हे, पण तो या लेखाचा आवाका नाही.
आजही मराठी आंजावर लिहिणार्या लोकांचं वर्गीकरण करायचं झालं तर उच्चवर्णीय, मध्यमवर्गीय, शहरी-निमशहरी, पुरुष मोठय़ा प्रमाणावर दिसतात. मराठी संस्थळांवर स्त्रियांचं प्रमाण जागतिक पातळीवर स्त्रियांच्या आंतरजाल वापरापेक्षा बरंच कमी आहे. त्याची कारणं मात्र जालबाह्य किंवा प्रत्यक्ष आयुष्यात सापडतात. चूल आणि मूल यांपासून मराठी (भारतीय) स्त्रियांची सुटका अजूनही झालेली नाही. जालावर मुक्तपणे व्यक्त होणार्या स्त्रिया या बहुतांशी तरुण (चाळिशीच्या आतल्या), उच्चवर्णीय, शहरी, शिकलेल्या, नोकरी करणार्या अशा आहेत. (या निरीक्षणाला सणसणीत अपवाद आहेत, पण ते अपवादापुरतेच.) बहुराष्ट्रीय कंपनीतल्या, महाविद्यालयांमध्ये शिकवणार्या किंवा पत्रकारिता करणार्या स्त्रिया जालावर अधिक दिसतात. याचा थेट परिणाम जालावरच्या भाषा आणि लेखनावर पडलेला दिसतो. गरीब, दलित आणि ग्रामीण स्त्रियांचं वास्तव, रोजचं आयुष्य, त्यांची मतं जालावर दिसत नाहीत.
फेसबुक, व्हॉट्सअँपचं आव्हान
2009 च्या सुमारास भारतात फेसबुक लोकप्रिय व्हायला लागलं. तोपर्यंत मराठीत व्यक्त होणारे लोक एकतर ब्लॉग्ज किंवा मराठी संस्थळांवरच लिहित होते. या दोन्ही माध्यमांमध्ये लिहिताना किमान 400-500 शब्द लिहिण्याची अलिखित शिस्त आहे. त्यापेक्षा लहान आणि नि:सत्त्व लेखनाला एकोळी धागे म्हणून हिणवण्याची पद्धत आहे. फेसबुक आणि त्यापुढे व्हॉट्सअँप या दोन्हींचा फॉरमॅट एकोळी लेखनाला प्रोत्साहन देणारा आहे. फेसबुकची संस्थळांशी काही अंशी तुलना करता येईल. व्हॉट्सअँपवरच्या गप्पा म्हणजे चहाच्या टपरीवर होणारी चर्चा, फेसबुक म्हणजे घरात मित्रमंडळ जमवून होणार्या गप्पा आणि एखादं व्याख्यान देऊन त्यावर होणारी चर्चा म्हणजे संस्थळावरच्या चर्चा असं म्हणता येईल. अर्थात, संस्थळांवरच्या सगळ्या चर्चा व्याख्यानांशी तुलना करता येण्यासारख्या नसतात, बहुतेकशा नसतातच. पण संस्थळांवर चर्चेचा मोठा पट मांडण्याची शक्यता आहे, जी फेसबुकमध्ये नाही.
वर्तमानपत्र एक दिवसात शिळं होतं, फेसबुकवर गोष्टी काही तासांत शिळ्या होतात. संस्थळांच्या मांडणीच्या फॉरमॅटमुळे लक्षात राहण्यासारख्या लेखनाच्या आठवणी वर्षानुवर्षं टिकतात. व्हॉट्सअँप मुळातच जगजाहीर करण्यासाठीचा मजकूर लिहिण्यासाठी नाही, त्यामुळे त्याची तुलना संस्थळांशी करणं कठीण आहे.
काहीही शोधायचं असेल तर पहिले गूगलमावशीला विचारून बघूया, असा विचार करणार्या माझ्यासारख्या लोकांसाठी व्हॉट्सअँप ही फक्त भंकस करण्याची जागा ठरते. महत्त्वाचं काही व्हॉट्सअँपवरून प्रसारित होत असेल तरी मुळात त्यासाठी ते लिहिलं जात नाही.
तरीही मराठी संस्थळांचा विचार करताना व्हॉट्सअँप आणि फेसबुकचा विचार करावा लागतो, कारण काव्य-शास्त्र-विनोदासाठी उपलब्ध असणारा र्मयादित वेळ व्हॉट्सअँप आणि फेसबुकवर अधिक प्रमाणात घालवला जातो. गांभीर्याने वाचन, विचार करून मत पक्कं करायचं आणि मांडायचं, ललित लेखन करण्यासाठी पुरेसा वेळ घालवून ते मांडावं अशी सवय लागतालागताच मोडून गेलेली दिसते. चटपट 100 शब्दांत मांडलं गेलेलं सरळसाधं मत आणि त्याला लाइक करून होणारी तत्काळ इच्छापूर्ति (instant gratification) याचा मोह अनेकांना सोडवत नाही. फेसबुक येईस्तोवर मराठी संस्थळांचा असणारा वाढीचा वेग फेसबुकच्या लोकप्रियतेनंतर कमी झालेला दिसतो. आणि ही गोष्ट मायबोलीसारख्या मोठय़ा, सगळ्यात जुन्या संस्थळाच्या बाबतीतही होताना दिसते.
अभिव्यक्ती स्वातंत्र्य, संपादकीय गाळणी आणि लेखक-वाचक
तत्काळ इच्छापूर्ती करवून घेण्याच्या संस्कृतीमध्येही मराठी संवादस्थळं आणि गेल्या काही वर्षांमध्ये फेसबुक यांची लोकप्रियता वाढती आहे. बर्याच लोकांना काहीतरी सांगायचं असतं, आपली मतं सगळ्यांसमोर मांडायची असतात. आत्तापर्यंत कार्यालयात चहा पिताना किंवा कौटुंबिक समारंभांमध्ये भेटीगाठी झाल्यावरच मतं मांडण्यासाठी व्यासपीठ आणि ग्राहक मिळत होते. वर्तमानपत्रं किंवा नियतकालिकांमध्ये लेखन छापून आणण्यासाठी, लोकप्रियता मिळवण्यासाठी मतांमागे अभ्यास लागतो आणि संपादकांशी थोडीबहुत ओळख काढावी लागते, ते सगळ्यांना शक्य नाही. याशिवाय छापील माध्यमांमध्ये किती लेखन छापलं जाणार यावर र्मयादा आहेत. संगणक युगात लेखन प्रकाशित करण्यासाठी र्मयादित जागा ही कल्पनाच संपुष्टात आली.
आमच्या घरात पहिला संगणक 2000 साली आणला. त्याची हार्डडिस्क 8 जीबीची होती; आज माझ्या फोनवर त्यापेक्षा जास्त जागा आहे. दुसरा मुख्य मुद्दा आहे तो संपादकांनी चाळणी लावण्याचा. कोणीही, काहीही लिहू शकतात, मतं मांडू शकतात. यातून माध्यमांचं लोकशाहीकरण होण्यास सुरुवात झाली.
तिसरा मुद्दा आहे तो भाषेचा. एकोणीसावं शतक संपताना फक्त उच्चवर्णीयांच्या हातात वृत्तपत्रं होती. विसाव्या शतकाच्या सुरुवातीला ब्राह्मण-ब्राह्मणेतर हा वाद महाराष्ट्रात गाजत होता, त्यात वृत्तपत्र हे महत्त्वाचं साधन होतं. त्या काळात ब्राह्मणेतरांनी वृत्तपत्रं चालवली. ‘मनोगत’ या संस्थळावर झालेल्या वादाला प्रमाणभाषेचा आग्रह हा एक मोठा कोन होता. वाद घालणार्या लोकांची जात किंवा व्यवसाय तिथे महत्त्वाचे नव्हते, तर ‘तुम्ही संस्थळ चालवता म्हणून आमच्यावर भाषा आणि पर्यायाने विचार लादू शकत नाही’, हा त्यातला मुद्दा होता.
स्मार्टफोन आणि स्वस्त आंतरजाल जोडणीतून भाषेची आणि विचारांची विविधता समोर यायला लागली आहे. पाठय़पुस्तकांमधली केले, गेले, सांगितले अशीच भाषा वाचायची सवय असणारे केलं, गेलं, सांगितलं अशी बोलीभाषा आंजावर बेधडक वापरतात.
जालावर मांडली जाणारी मतं अभ्यासपूर्ण असतात का, ललित लेखन दखलपात्र असतं का हे प्रश्न बाजूला केले तर या लेखनातून वेगवेगळ्या बोलीभाषा इतरांपर्यंत पोहोचतात हा एक मोठा फायदा आहे. माझ्या वडिलांचं मूळ गाव अकोला जिल्ह्यात. त्या बाजूला ‘केल्या गेले’ अशा प्रकारची रूपं वापरतात हे मला मराठी संस्थळांमुळेच समजलं.
आंजाचा आणखी एक फायदा म्हणजे तत्काळ मतं मांडता येणं. आजच्या वृत्तपत्रामध्ये काहीतरी लिहिलं तर त्यावर आपण आज संध्याकाळी पत्र लिहिणार, ते त्यांच्या कार्यालयात आणखी चार दिवसांनी पोहोचणार आणि त्यानंतर त्यांनी ते छापलं तर छापलं. मध्ये निदान आठवडातरी जातो. सध्या कोणाही वर्तमानपत्रातल्या एखाद्या अग्रलेखावर कुणाला काही म्हणणं मांडायचं असेल तर आंजावर सकाळी दहा वाजताच चर्चा सुरू होते आणि तो विषय जुना होऊन विस्मरणात जायच्या आधीच त्यातली मतंमतांतरं मांडली जातात. विचारांची घुसळण मोठय़ा प्रमाणावर करण्याचं काम आंतरजाल या तंत्रज्ञानाशिवाय होणं सर्वथा
अशक्य.
पुढे काय?
मराठी संस्थळांच्या प्रकृती, प्रवासाचा विचार करता एक गोष्ट स्पष्ट दिसते. गप्पा मारण्यापासून सुरुवात झाली, पुढे जरा गांभीर्याने चर्चा आणि विनोदी लेखनही सुरू झालं. पूर्वी मासिकांचे दिवाळी अंक निघायचे तसे संस्थळांचे दिवाळी अंक निघू लागले. ‘मायबोली’वर संस्थळाच्या सदस्यांचंच लेखन घेतलं जातं. त्यापुढे जाऊन गांभीर्याने काही करण्याचा प्रयत्न या निमित्ताने संस्थळांवर नियमितपणे न लिहिणार्या लोकांकडूनही लेखन मागवून ‘ऐसी अक्षरे’ आणि ‘डिजिटल दिवाळी’ सारखे गांभीर्याने चालवलेले प्रयत्नही दिसत आहेत. (‘डिजिटल दिवाळी’ हे संस्थळ नाही; यांचा फक्त दिवाळी अंक निघतो.) ‘ऐसी अक्षरे’च्या दिवाळी अंकात एक संकल्पना घेऊन अँथॉलॉजी (प्रातिनिधिक संकलन) प्रकाराने हाताळणी करण्याचा प्रयत्नही दिसतो.
या प्रवासात ‘उपक्र म’ आणि इतर काही संस्थळं काही काळ चालली आणि पुढे बंद झाली. ‘मनोगत’चा दिवाळी अंक गेली दोन वर्षं निघाला नाही. वैविध्य आणि लोकप्रियता यांपैकी निदान एक टिकवून ठेवण्याचा प्रयत्न करणारी संस्थळं या स्पर्धेत टिकून आहेत. तरुण पिढीसुद्धा आज मराठी वाचक, लेखनाची ग्राहक आहे. सध्या पाश्चात्त्य देशांमध्ये छापील वृत्तपत्रं, पुस्तकं यांचा खप कमी होतोय आणि ई-प्रकाशनं वाढत आहेत. ज्या इंग्लिश पुस्तकांची ई-प्रत उपलब्ध आहे, त्यात ई-प्रत कागदी प्रतीच्या साधारण अध्र्या किमतीला मिळते. (मराठीत काही पुस्तकांच्या ई-प्रती आणि छापील प्रती उपलब्ध आहेत. पण स्वस्त तंत्रज्ञान वापरूनही काही मराठी प्रकाशनाची ई-पुस्तकं महाग आहेत!) आंतरजाल हे भविष्य आहे आणि मराठी पुस्तकं, लेखनही हळूहळू ई-प्रकाशनाकडे वळणार यात शंका नाही.
मराठी संस्थळांचं यात काय योगदान? मराठी संस्थळांवर काही प्रमाणात स्वतंत्र म्हणावीशी भाषा वापरली जाते. आंजा, एकोळी धागे, संस्थळं असे काही शब्द या लेखात मी सहज वापरले; ही अंमळ मोजकी उदाहरणं. शिवाय अभिव्यक्ती स्वातंत्र्य, व्यक्त होण्यातली लोकशाही ही मूल्यं जपणं छापील माध्यमांना, फक्त खर्चाचा विचार केला तरीही शक्य नाही. संस्थळं ही दरी भरून काढताहेत, हे नक्की!
मायबोली
‘मायबोली’ हे मराठीतलं पहिलं संवादस्थळ, संस्थळ. त्या काळात, 1996 साली, देवनागरी टंक (ाल्ल३२) उपलब्ध नव्हते. चार वर्षांनी त्यांचा दिवाळी अंकही सुरू झाला.
सगळ्यात जुनं संस्थळ असलेल्या ‘मायबोली’चं सध्याचं स्वरूप घरगुती प्रकारचं आहे; एकाच शहरामध्ये राहणार्या लोकांना किंवा ठरावीक प्रकारच्या टीव्ही मालिका बघणार्यांना एकत्र गप्पा मारता येण्याची सोय तिथे आहे. शिवाय तिथे वेगवेगळ्या लेखनस्पर्धा आयोजित केल्या जातात. निबंध, ललित, गद्य, काव्य असे निरनिराळे साहित्यप्रकार हाताळले जातात. ‘मायबोली’ बाहेरचे परीक्षक बोलावून स्पर्धांचे निकाल जाहीर होतात आणि विजेत्यांना पुस्तकरूपाने पारितोषिकं मिळतात.
उपक्रम
2007 च्या सुरुवातीला ‘उपक्र म’ हे संस्थळ सुरू झालं. मराठी ही भाषा आजतरी ज्ञानभाषा म्हणावी अशी परिस्थिती नाही. विज्ञान, तंत्रज्ञान, गणित, अर्थशास्त्र इत्यादि विषयांमध्ये लेखन करणार्यांना पारिभाषिक शब्द सुचतात तेही बर्याचदा इंग्लिश असतात. ‘उपक्रम’वर उत्क्रांती, पुंज विज्ञान (0४ंल्ल३४े ेीूँंल्ल्रू२) अशा विषयांवर उत्तम लेखन उपलब्ध आहे. इथे लेखन करताना 10 टक्क्यांपेक्षा अधिक शब्द रोमन असू नयेत असा नियम होता. (क्वचित प्रसंगी जिथे नियमाचा जाच होऊ शकतो तिथे तो वाकवण्याची तयारी उपक्रम व्यवस्थापनाने दाखवली.) या संस्थळाला राज्य सरकारचा पुरस्कारही मिळालेला आहे. ‘उपक्रम’ आता फक्त वाचनमात्र स्वरूपात उपलब्ध आहे; पण लेखन शक्य होतं तेव्हा इथे काहीसं शिस्तप्रिय वातावरण होतं.
मनोगत
‘मनोगत’ या संस्थळाचे प्रवर्तक अमेरिकेतले असले, तरीही लेखन करणार्यांमध्ये भारतात, महाराष्ट्रातले लोक होते. तोपर्यंत इंटरनेट शहरी भागांमध्ये पोहोचलेलं होतं. दिवाळी अंक काढण्याची प्रथा ‘मनोगत’ने सुरू केली. दिवाळी अंकात असणारं शब्दकोडं देण्यासाठी सॉफ्टवेअर कोड लिहिण्याचं कामही ‘मनोगत’च्या प्रवर्तकांनी केलं. या संस्थळावर लेखनात प्रमाणभाषेचा आग्रह धरला जातो; त्यासाठी ऑनलाइन शुद्धलेखन चिकित्सक (शुचि) उपलब्ध करून दिलेला आहे. शुद्धलेखन चिकित्सा आणि प्रमाण मराठीचा आग्रह यामुळे ‘मनोगत’वर पुष्कळसं उच्चवर्णीय वातावरण आहे. इथे काहीही मजकूर प्रसिद्ध होण्याआधी तो संपादकांच्या नजरेखालून गेलाच पाहिजे असा नियम होता. या नियमातून प्रमाण लेखनाचा अतिआग्रह जोपासला जातो आहे आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर बंधनं आणली जात आहेत, अशी चर्चा सुरू झाली. त्याविरोधातलं बंड म्हणून ‘मिसळपाव’ हे नवीन संस्थळ जन्माला आलं.
ऐसी अक्षरे
चार डोकी एकत्र येतात तिथे मतभेद होणं अपेक्षितच. ‘मिसळपाव’वर झालेल्या सत्तांतरानंतर 2011 सालच्या दिवाळीत ‘ऐसी अक्षरे’ हे नवीन संस्थळ सुरू झालं. अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि उदारमतवाद ही दोन मूल्यं ‘ऐसी अक्षरे’वर अग्रस्थानी आहेत. मराठी आंजावर न लिहिणार्या, परंतु महत्त्वाचं काम करणार्या लोकांकडून लेखन करवून घ्यायचं किंवा त्यांच्या मुलाखती घेऊन प्रकाशित करण्याचं काम ‘ऐसी अक्षरे’वर सुरू आहे. संपादकीय मनमानी, उपद्रवी सदस्य - ट्रोलांचा त्रास यावर उपाय म्हणून या संस्थळावर बहुतेक लिहित्या सदस्यांना श्रेणी देण्याचा अधिकार आहे. फेसबुकशी परिचित असणार्यांना लाइकचं बटण माहीत असेल. ‘ऐसी अक्षरे’वर त्यापेक्षा एक पायरी पुढे जाऊन प्रतिसाद आवडला किंवा नाही आवडला तर तसंही, ते कारण सांगून म्हणायची सोय आहे. 2012 सालापासून ऐसी अक्षरे आणि मिसळपाव या दोन्ही संस्थळांचे दिवाळी अंकही निघत आहेत.
मिसळपाव
‘मनोगत’वर असणारी प्रमाणभाषेची सक्ती आणि इतर तक्रारींमुळे 2007 सालच्या मध्यात ‘मिसळपाव’ हे संस्थळ सुरू झालं. त्याआधी मराठी संस्थळांचा कारभार पुरेसा पारदर्शक नव्हता. ‘मिसळपाव’ने मात्र संपादक कोण आहेत, हे आधीच जाहीर केलं. स्वरूप असं की ज्यांना जे लिहावंसं वाटलं त्यांनी ते लिहावं. त्यावर ताबडतोब प्रतिक्रिया देण्याची सोय दिली गेली. संगणकक्षेत्रात काम न करणार्यांनी हे संस्थळ सुरू केलं आणि उभंही केलं. आपण लेखन करताना स्वत:च्या खर्या नावाने लिहावं असा आग्रह इथे नाही. त्यामुळे कोणीही हव्या त्या टोपणनावाने लिहावं आणि आपल्याला हव्या त्या विषयावर, आपापल्या शैलीत लिहावं असा प्रघात आहे.
मिसळपावचा सध्याचा चेहरा अघळपघळ (टवाळ?) आणि दंगेखोर लोकांचा चर्चा, ललित-अललित लेखन, विनोद, धमाल करण्याचा अड्डा असा आहे.
(गेली चार वर्षे अमेरिकेत वास्तव्य असलेल्या लेखिका ‘ऐसी अक्षरे’ या मराठी संस्थळाच्या संस्थापक सदस्य, व्यवस्थापक आहेत. विज्ञान-तंत्रज्ञानासह विविध विषयांमध्ये रस आणि ‘आंजा’वर सक्रीय.)