शहरं
Join us  
Trending Stories
1
पडळकरांना सभागृहात एक दिवस न बोलण्याची शिक्षा दिल्याने त्यांच्यात सुधारणा - नीलम गोऱ्हे
2
"असले राजकीय स्टंट सहन करणार नाही, माफी मागा"; राज ठाकरेंच्या वक्तव्याने गुजरातमध्ये संताप
3
आधी 'जिथं तू तिथं मी...' आता एकमेकांना अनफॉलो करत हार्दिक-जास्मिन यांच्यातील प्रेमाचा खेळ संपला!
4
Porsche Cayenne: पोर्शे केयेन ब्लॅक एडिशन भारतात लॉन्च; किंमत सर्वसामन्यांच्या आवाक्याबाहेर!
5
'बिहारमध्ये वीजच नाही तर बिल कुठून येणार'; नितीश कुमारांच्या घोषणेची भाजप मंत्र्याने उडवली खिल्ली
6
IND vs ENG : बुमराह 'ऑन ड्यूटी'; सिराजला मिळणार सुट्टी! टीम इंडियात शिजतोय हा प्लॅन
7
'कोल्डप्ले' कॉन्सर्टमध्ये CEO आणि HRचं अफेअर झालं उघड, आता कंपनीने केली 'ही' कारवाई
8
Electric Scooter: ओला, टीव्हीएस, बजाजसाठी धोक्याची घंटा, बाजारात येतेय रेट्रो स्टाईल इलेक्ट्रीक स्कूटर!
9
सुंदरा मनामध्ये भरली... फ्रान्समध्ये दिसला सारा तेंडुलकरचा नवा लूक, चाहतेही झाले फिदा
10
विनयभंगाच्या गुन्ह्याखाली तरुंगात गेला; सुटून आल्यानंतर पीडिताच्या घरासमोरच फोडले फटाके!
11
"...मग नितेश राणे सरकारमध्ये बसून फक्त पंखा हलवणार का?"; मनसे नेत्याचा खोचक सवाल
12
Rohini Khadse : "अरे कुणाला मूर्ख बनवता? पोलीस सत्ताधाऱ्यांच्या इशाऱ्यावर नाचताहेत...”, रोहिणी खडसेंचा संताप
13
Mallikarjun Kharge : "४२ देश फिरले, पण मणिपूरला एकदाही नाही गेले", मल्लिकार्जुन खरगेंचा पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल
14
'कुणबी प्रमाणपत्र,व्हॅलिडिटीचा प्रश्न सोडवा'; धाराशिवमध्ये सरनाईकांना मराठा तरुणांचा घेराव!
15
“राज ठाकरेंसोबत जो जाईल, तो संपेल, तेच मराठीचा अनादर करतात”; आणखी एका भाजपा खासदाराची टीका
16
सुनेवर होती वाकडी नजर, सतत मुलाशी भांडण अन् एके दिवशी सासऱ्याने टोकच गाठलं...
17
“दिवस निवड, वेळ अन् जागा तुझी, कुठे येऊ ते फक्त सांग”; मनसे नेत्यांचे निशिकांत दुबेंना आव्हान
18
२ सख्ख्या भावांनी एकाच मुलीसोबत केले लग्न, कारण...; अजब लग्नाची ही गजब गोष्ट काय आहे?
19
बजाजची साथ सोडून अंबांनींसोबत आली ही दिग्गज जर्मन विमा कंपनी, लाखो कोटींच्या व्यवसायावर नजर
20
“विधानभवनातील मारामारीला CM फडणवीसच जबाबदार, हनीट्रॅपचे धागेदारे...”: हर्षवर्धन सपकाळ

मटका

By admin | Updated: May 9, 2015 18:30 IST

अचानक गलका झाला. माणसं सैरावैरा धावत सुटली. मला बोळाकडे ढकलत अज्या म्हणाला, ‘आता काय खरं नाय; स्पेशलवाल्यांची रेड पडली!’ - बोळकांडाच्या तोंडाशी आलो, तर वडीलच समोर उभे!..

- चंद्रमोहन कुलकर्णी
 
 
वडील काही दिवस फ्लाइंग स्क्वॉडमधे होते. हातभट्टीचे अड्डे, गांजा-अफूचे बेकायदेशीर धंदे, थिएटरवरचा सिनेमाच्या तिकिटांचा काळाबाजार, मटका/जुगाराचे अड्डे असल्या ठिकाणी छापा घालण्याची डय़ूटी. फ्लाइंग स्क्वॉडची धाड पडली की गुंड-मवाल्यांच्या भाषेत म्हणत ‘स्पेशलवाल्यांची रेड पडली’.
वडिलांना आम्ही मुलं ‘नाना’, तर खात्यातले लोक ‘तात्या’ नावानं हाक मारत. त्यांच्याबरोबर नेहमी त्यांचा ढगे नावाचा एक जोडीदार असायचा. 
वडील उंच आणि ढगे (पोलिसांत चालेल एवढय़ा कमीतकमी उंचीचा) बुटका इसम. अक्षरश: करारी. ढगे आणि तात्या कुलकर्णी ह्या जोडीला मवाली टरकत. दोघांचेही कपडे सेम. लांब शर्ट, आखूड पायजमा, पायात जाड कोल्हापुरी वहाणा. डोईवर मागे फिरवलेले केस, मोठय़ा मिशा. फरक फक्त उंचीत आणि वयात. ढगे थोडे वयानं लहान. 
आणखी एक महत्त्वाचा फरक होता : डोळ्यात. ढग्यांचे डोळे मोठे, तर नानांचे डोळे इतके बारीक, की दिसायचेच नाहीत.
कॉलनीतला अज्या आणि मी एकत्र असायचो. अज्याला घरच्यांनी माजलेल्या बैलाला सोडावं तसा सोडून दिलेला. ओवाळून टाकलेला म्हणतात, तसं. त्याची माझी मैत्री कोणत्या बेसिसवर झाली कुणास ठाऊक.
पोलीस लाइनीतली मुलं ब:यावाइटाच्या रेघेवर असतात. वाट चालता चालता कोण कुठल्या बाजूला पडतं ह्यावर पुढचं लाइफ ठरतं.. 
तर अज्यानं मला दुनिया दाखवली. डार्क जग पाहिलं त्याच्यासोबत. कुठेकुठे न्यायचा मला. निरनिराळ्या ठिकाणची माणसं बघायची तेव्हापासून मला फार हौस. 
एकदा म्हणाला, ‘चल तुला मटक्याचा अड्डा दाखवतो. लई भारी असतो.’
म्हटलं चल. अज्या आकडा लावण्यात पटाइत होता हे मला माहीत होतं. तोंडात भाषा तसलीच कायम! एखादा आवडता आकडा दिसला एखाद्या वाहनाच्या नंबरप्लेटवर वगैरे की म्हणायचा, ‘मायला, आज तिकडमची लेवल झाली असती याùùर.’
मग घरनं चो:या करून पैसे आणायचा. त्यासाठी आयडिया अशी : घरातला पितळेचा एखादा डबा हेरून ठेवायचा. एके दिवशी त्याचं फक्त झाकणच विकायचं, किरकोळ पैसे यायचे. ही झाली पहिली चाल. मग झाकण सापडत नाही म्हणून तो डबा वापरातनं हळूहळू मागे पडायचा. असे पुष्कळ दिवस गेले, की आईचं डब्याकडे पूर्ण दुर्लक्ष होऊन डबा अडगळीत जायचा. मग चाल क्रमांक दोन आणि फायनल. डबा विकून मटक्याच्या अड्डय़ाकडे प्रस्थान!
मी म्हणायचो, ‘अज्या, कशाला हे?’ 
तर म्हणायचा, ‘गप ना. कायनाय होत.’
आपल्याला काय आकडाबिकडा लावायचा नाही, नुसतं जायचं बघायला असा विचार करून, कायनाय होत, कायनाय होत हे त्याचं बोलणं ऐकून एक दिवस लायनीच्या मागेच शिवाजी रोडवर मटक्याचा अड्डा होता, तिथं गेलो.
रात्र.
दोन वाडय़ांच्या मधे जेमतेम एक माणूस जाईल असं लांबलचक बोळकांड. अख्खा वाडा पार करून गेल्यावर एकदमच एक मोठा चौक. आणि सगळीकडे पिवळा, अशक्त उजेड. खूप माणसं. बरेच लहान लहान ओटे आणि जत्रेत असतात तशी बांबू कामटय़ांचा आधार दिलेली ताडपत्र्यांची छपरं. माणसं एकमेकांत काहीतरी कुजबुजत उभी. बहुतेकजण पांढरी टोपी. काहीजण खाली मांडी घालून बसलेल्या माणसाला वाकून कसलेतरी आकडे सांगतायत, तर खाली मांडी घालून बसलेल्यांपैकी काहीजण पुढय़ातल्या छोटय़ा वहीत काहीतरी लिहून घेत असलेली. पण आवाज जास्त नाही. सगळा व्यवहार दबक्या आवाजात, कुजबुजत चाललेला.
बहुतेकांच्या हातात अगदी सिनेमाच्या तिकिटापेक्षाही लहान अशा कागदांचे चिठोरे. जमिनीवरसुद्धा तसलेच, पण फेकून दिल्यासारखे वाटणारे चिठोरे विखरून पडलेले. मला मस्त आवडलं होतं तिथं.
अज्या म्हणाला होता,  ‘तू थांब इथंच बघत. मी आलोच.’
 मग बल्बच्या पिवळ्या अशक्त उजेडात आणि चिठो:या-माणसांत मी बराच वेळ घालवला.
अचानकच एक हलका गलका झाला आणि सगळी माणसं सैरावैरा धावत सुटली. मागे अजून एक बोळकांड होतं तिथं गर्दी झाली. क्षणात सगळा व्यवहार ठप्प झाला. काय झालं हे कळायच्या आत अचानक अज्यानं मला आम्ही आलो होतो त्याच बोळाकडे ढकललं.
म्हणाला, ‘आता काय खरं नाय; स्पेशलवाल्यांची रेड पडली.’
मी बोळीत शिरलो तेव्हा मी पुढे होतो आणि मला चिकटून अज्या मागे. कसेबसे आम्ही पुढे सरकत होतो. रस्त्याला लागून असलेल्या बोळकांडाच्या तोंडाशी आलो तर वडीलच समोर उभे ठाकलेले पहाडासारखे!! मागे ढगे.
मला बघून मागेच सरकले. (रस्त्यावरच्या मोठय़ा दिव्यांचा चांगलाच उजेड होता; त्यामुळे दिसण्याचा वगैरे काही प्रश्नच नव्हता.) मागे सरकून माङयाकडे नीट निरखून पाहत म्हणाले, ‘तू इथं काय करतोयस?’
मी म्हटलं, ‘काही नाही, सहज आलोय बघायला; काय असतं ते! मित्रबरोबर.’
‘सहज? का मटका खेळायला?’
‘नाही ओ नाना, खरंच सहज आलो होतो. मला मटका नव्हता खेळायचा. बघायला आलो होतो.’
म्हणाले, ‘बरं बरं, जा घरी आता. थांबू नको इथं.’
अज्या पळून गेला नव्हता. बाहेर रस्त्याच्या कडेलाच थांबला होता.
घरी जाताना मला म्हणाला, ‘तुङो वडील स्पेशलला आहेत हे सांगायचं नाय का आधी?’
मी म्हटलं, ‘मला काय माहीत ते स्पेशलला आहेत ते आणि इथं रेड टाकायला येतील ते.’
मग त्या रात्री नाना नेहमीप्रमाणोच उशिरा घरी आले.
मीच दार उघडलं. मी घाबरलोच नव्हतो. ते पण काहीच बोलले नाहीत. जणू काही घडलंच नव्हतं.
**
सकाळी उठलो तेव्हा पेपर वाचत होते.
शांतपणानं हळू आवाजात मला विचारलं, ‘कोण आहे तुझा तो दोस्त?’ (ते मित्र हा शब्द कधीच वापरायचे नाही, दोस्त म्हणायचे.)
मी नावपत्ता सांगितल्यावर म्हणाले, ‘काय असतं तिथं पाहिलं का मग?’
‘हो.’
‘काही नसतं रे. समाजकंटक असतात तिथं.’ (असा एखादा अवघड जड शब्द वापरायची त्यांची एक खास पद्धत होती.)
‘जात जाऊ नको तिथं. दोस्तालाही सांग तुङया.’
मी सांगितलं त्याबद्दल यत्किंचितही अविश्वास त्यांनी दाखवला नव्हता. मला साधं रागावलेसुद्धा नव्हते..
 
(लेखक ख्यातनाम चित्रकार आहेत.)