शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

महात्मा आणि मी

By admin | Updated: October 1, 2016 16:10 IST

महात्मा गांधींच्या सेवाग्राम आश्रमात माझं बालपण गेलं. माझा जन्मच त्यांच्या मृत्यूनंतरचा. पण जवळपास रोजच मी त्यांना भेटतो.कोणताही प्रश्न समोर उभा राहिल्यावर गांधीजींनी यावेळी काय केलं असतं?’ हा प्रश्न स्वत:ला विचारतो. त्यांच्या कृतिशील विचारांत त्या प्रश्नाचं उत्तर मिळतंच.

डॉ. अभग बंग
 
महात्मा गांधी यांची आज जयंती. त्यानिमित्त...
 
तुम्ही खरंच त्यांना प्रत्यक्ष भेटलात?..
माझं बालपण महात्मा गांधींच्या सेवाग्राम आश्रमात गेलं हे कळलं की अनेक जण उत्सुकतेने हा प्रश्न विचारतात. मी काय उत्तर द्यावं? माझा जन्मच मुळी त्यांच्या मृत्यूनंतर झाला. त्यामुळे ज्यांनी गांधीजींना प्रत्यक्ष पाहिलेलं नाही अशा सहा अब्ज लोकांपैकी मीही एक. पण मी त्यांना जवळपास रोजच भेटतो. ते आपले आजोबा असावेत आणि त्यांचंच रक्त आपल्या शरीरात धावत असावं असं मला जाणवत राहतं. माझ्या प्रत्येक कृतीकडे ते आपल्या मिशाळ स्मितासह वात्सल्यानेच पण अपेक्षेने बघत असतात. मी चूक वर्तन केलं तर क्रुसावर गांधी चढत असतो. जेव्हा जेव्हा गंभीर निर्णयाचा क्षण माझ्या जीवनात येतो तेव्हा त्यांनाच भेटून विचारत असतो, बापू मी आता काय करू?
महात्म्याशी अशा झालेल्या काही भेटींच्या या आठवणी. आठवणी व्यक्तिगत आहेत आणि सार्वत्रिकही.
 
२ ऑक्टोबरला गांधी जयंती कशी साजरा करावी? आरत्या, खिरापती व मिठाई वाटून? पण ‘गरिबातल्या गरीब माणसासोबत एकरूप व्हा’ हा गांधीजींचा संदेश आणि ‘स्वकष्टाने कमावलेल्या भाकरीवरच तुला अधिकार आहे’ हे त्यांचं तत्त्व.
आश्रमातील शाळेत गांधी जयंतीला दरिद्रीनारायणाशी एकरूप व्हायचा श्रमोत्सव चालायचा. ‘‘आज दिवसभर उपाशी राहून शेतकऱ्यांसारखं शेतात परिश्रम करून किंवा चरख्यावर सूत कातून स्वत: कमावलेल्या मजुरीएवढेच अन्न संध्याकाळी आज आपल्याला मिळणार!’’ - मला कळलं. संध्याकाळपर्यंत हातांना फोड आलेले होते. घामाने चिंब अंग ठणकत होतं. पोटात भुकेचा डोंब. मजुरी थोडी निघाली. त्यात किती खायला मिळणार? जेव्हा त्या लहानशा भाकरीने माझ्या भुकेच्या ताटाचा एक कोपराही भरला नाही तेव्हा भूक म्हणजे काय, कुपोषण म्हणजे काय, मजुरांची मजुरी आणि शेतकऱ्याच्या श्रमाचं मूल्य किती असायला हवं या सर्व ब्रह्मप्रश्नांशी प्रत्यक्ष पोटाची भेट झाली. वस्तुत: माझ्या पुढील आयुष्यात समाजसेवा म्हणून ज्या प्रश्नांवर मी काम केले त्यापैकी अनेकांशी माझी पहिली भेट गांधी जयंतीला झाली.
‘या दरिद्री देशात प्रत्यक्ष परमेश्वरालाही भाकरीच्या रूपातच दर्शन द्यावं लागेल’, असं गांधीजी म्हणालेच होते.
 
हाफपॅँट घालून दोन मुुलं सायकलने वर्धा जिल्ह्यातल्या पिपरी गावाकडे जात होते. सोळा वर्षाचा माझा मोठा भाऊ अशोक व तेरा वर्षाचा मी. आम्ही दोघेही तेव्हा सेवाग्राममध्ये गांधीजींनी सुरू केलेल्या ‘नयी तालीम’ पद्धतीने शाळेत शिकत होतो. अशोकने सायकल थांबवली. आता आपण मोठे झालो आहोत. आपल्या जीवनाचं काय करायचं हे आपण ठरवायला हवं, असं तो म्हणाला. मी मान डोलावली. आताच्या भाषेत, ‘कोणतं करिअर निवडावं?’ याबद्दल आम्ही दहा मिनिटं सखोल चर्चा केली. सगळ्यात दु:खी, कष्टी, असहाय खेड्यातील लोक होते. त्यांच्या पोटात भूक व अंगावर जखमा हे रोग होते. आमच्यापैकी एकाने खेड्यातील शेती सुधारावी व दुसऱ्याने आरोग्य सुधारावे असे आमचे ठरले. अशोक म्हणाला- मी शेती सुधारतो. त्यामुळे आरोग्याची जबाबदारी माझ्यावर आली. पुढे अशोक कृषितज्ज्ञ झाला. विदर्भातील कोरडवाहू शेतकऱ्यांची शेती कशी सुधारता येईल या विषयावर तो आयुष्यभर काम करतो आहे. पदरी पडल्यानुसार मी डॉक्टर झालो. पुढे गडचिरोलीला आलो. ‘आरोग्य-स्वराज्य’ कसं निर्माण करावं हाच माझा आयुष्यभराचा शोध झाला.
आम्ही दोघांनी जेव्हा त्या दिवशी नियतीशी हा करार केला तेव्हा रस्त्याच्या त्या वळणावर बाजूला महात्मा कौतुकाने बघत उभा होता. केव्हातरी तो म्हणाला होता, ‘मी तुम्हाला जादूचा तावीज देतो. काय निर्णय घेऊ असा प्रश्न जेव्हा पडेल तेव्हा जीवनात पाहिलेल्या सर्वात दु:खी, निर्बल माणसाचा चेहरा डोळ्यासमोर आणा.’
 
अलाहाबादला गांधीजी पहिल्यांदाच नेहरूंकडे आनंद भवनमध्ये आलेले होते. तरुण जवाहर स्वत: त्यांची खातिरदारी करीत होते. जेवल्यानंतर गांधीजी हात धूत होते. तांब्याने पाणी स्वत: जवाहरलाल ओतत होते. बोलता बोलता बराच वेळ पाणी उगाचच सांडत राहिलं. गांधीजी अचानक भानावर आले व पाणी वाया घालवल्याबद्दल त्यांनी खेद व्यक्त केला. तरुण गर्भश्रीमंत जवाहर हसत म्हणाले, ‘बापू काही काळजी करू नका. हे अलाहाबाद आहे; जिथे गंगा व युमना दोन्ही वाहतात.’
‘हो जवाहरलाल, मला माहीत आहे. पण गंगा-यमुना माझ्यासाठी वाहत नाहीत.’
पर्यावरण चळवळ सुरू होण्याच्या किमान पन्नास वर्षे अगोदर गांधीजींना हे भान होतं की नैसर्गिक संपदा मानवाने अनिर्बंध उधळण्यासाठी नाही. तिला स्वत:चं पवित्र अस्तित्व आहे आणि मूल्यही आहे. आवश्यक तेवढीच वापरा. आपल्या गरजा कमी करा.
ही आठवण वाचली तेव्हा मी नुकताच नागपूरला मेडिकल कॉलेजमध्ये प्रवेश घेतला होता. मी उठलो. खोलीतला विजेवर चालणारा पंखा बंद केला. पंख्याविना मला जगता आलं पाहिजे. वैद्यकीय शिक्षणाची पुढील पाच वर्षे नागपूरच्या उन्हाळ्यातही मी पंख्याविना काढली. जणू पुढे गडचिरोलीला जाण्यासाठी पूर्वतयारी झाली.
 
गडचिरोलीतील वास्तव्याच्या दुसऱ्या वर्षी एक प्रसंग घडला. गावाबाहेरील एका घरात तेव्हा आम्ही राहत होतो. बाजूला ओसाड जागा. तिथे हिवाळ्यात काही भटक्या लोकांनी आपली पालं टाकली होती. एका रात्री प्रचंड गोंधळ, किंकाळ्या व रडारड ऐकू येत राहिली. दारूच्या नशेत नवऱ्याने बायको-मुुलांना हाणमार करून आपलं पाल व त्यातील चीजवस्तू पेटवून दिली आणि पळून गेला. सकाळी उठून पाहिलं. राखेच्या ढिगाऱ्यासमोर मार खाल्लेली, कपडे फाटलेली एक आई आणि तिची भेदरलेली सात मुलं थंडीत थरथर कापत उभी होती.
राणीने तिला पांघरूण व खायला दिलं. मला त्या रात्री झोप येईना. ही समस्या कशी सोडवावी? 
अशावेळी गांधीजींनी काय केलं असतं? शोधू लागलो.. ‘‘मला एक तासासाठी हिंदुस्थानचा हुकूमशहा बनवलं तर सर्वात प्रथम मी सर्व दारूची दुकाने व परवाने रद्द करीन.’’
- वा! या प्रश्नावर गांधी आपल्यासोबत आहेत. हिंमत वाढली. मार्ग सापडला. गडचिरोलीची आकडेवारी गोळा केली. जिल्ह्याच्या विकासाचं बजेट १४ कोटी रुपये व दारूचा एकूण खप २० कोटी रुपये आढळला. गरिबीचं एक कारण या दारूच्या अर्थशास्त्रात सापडलं. दारू दुकानदारांविरुद्ध पिकेटिंग सुरू झालं. गावागावात लोकांनी गावाची दारूमुक्ती लागू केली. राज्य सरकारला न जुमानता २ आॅक्टोबर १९९२ पासून जिल्ह्यात जनतेची दारूमुक्ती सुरू करण्यात आली. गडचिरोलीच्या जंगलात गांधी आमच्या सोबत लढत होते. अन्यायी सत्तेशी टक्कर देण्यासाठी तुम्ही हातात दगड किंवा बंदुक घेण्याची गरज नाही. एकच छोटीशी कृती करा. त्या राक्षसाकडे पाठ फिरवा व त्याची आज्ञा पाळण्यास नकार द्या. तुम्ही बघाल की तुमच्या नकारापुढे तो राक्षस हतबल आहे. तो शेवटी गुडघे टेकून तुम्हाला शरण येईल..
पाच वर्षे आंदोलनानंतर शेवटी १९९३ साली सरकारने पूर्ण जिल्ह्यात दारूबंदी लागू केली. पहिल्याच वर्षी जिल्ह्यातील ६० टक्के दारू कमी झाली. लोकांचे १२ कोटी रुपये वाचले. घराघरातल्या भेदरलेल्या उपाशी बाया व मुलांच्या पोटात अन्न पोचलं.
पण समस्या अजून संपलेली नाही. यावर्षी पूर्ण महाराष्ट्रात दारू विक्रीपासून शासनाला वीस हजार कोटी रुपये उत्पन्न अपेक्षित आहे. कोण कृती सुरू करणार?
 
मी दक्षिण आफ्रिकेत गेलो तेव्हा जिथे जिथे गांधी राहिले तिथे जाऊन आलो. गांधीजींच्या जीवनातील टर्निंग पॉइंट ठरलेल्या पीटर- मरिट्झबर्गला गेलो. जवळपास शंभर वर्षांपूर्वी नुकत्याच आफ्रि केत आलेल्या चोवीस वर्षाच्या बॅरिस्टर गांधींना याच स्टेशनवर ट्रेनमधून खाली फेकून देण्यात आलं होतं. रात्रभर अपमान, थंडी व भीती अनुभवत तरुण गांधी त्या प्लॅटफॉर्मवर बसून होते. ‘या भयानक देशात कशाला राहायचं? भारतात परत जाऊ का?..’
इथेच गांधींचा पळून न जाता लढण्याचा निश्चय झाला. इथेच त्यांनी आपला जणू पहिला सत्याग्रह केला व गोऱ्या लोकांसोबत ट्रेनने प्रवास करण्याचा आपला हक्क मिळवला. 
माझ्यासाठी ही जागा काशीहून पवित्र. कुरुक्षेत्र!
या घटनेला शंभर वर्षे पूर्ण झालीत तेव्हा या रेल्वे प्लॅटफॉर्मवर गांधीजींच्या स्मृतीत मोठा हॉल बनवण्यात आला. त्या हॉलचे उद्घाटन करताना नेल्सन मंडेला म्हणाले, ‘‘खूप वर्षांपूर्वी भारताने आमच्याकडे एक अडखळणारा शिकाऊ वकील पाठवला. वीस वर्षांनंतर आम्ही भारताला एक महात्मा परत केला.’’
प्रत्येकाच्या जीवनात एक पीटर- मॅरिट्झबर्ग घडत असतं. अडखळणाऱ्या तरुणापासून महात्म्याच्या दिशेने प्रवास सुरू होऊ शकतो.
आपण अजून प्लॅटफॉर्मवर बसून आहोत..
 
(डॉ. अभय बंग यांनी इंग्लंडमधे दिलेल्या ‘मीटिंग द महात्मा’ या भाषणावर आधारित)