अमर गुरडो, कराची
पंजाबातल्या घुमान साहित्य संमेलनासाठी सीमेपलीकडे- म्हणजे थेट पाकिस्तानात राहणार्या मराठी बांधवांना आवतण धाडण्यात आलं होतं. सीमेच्या अल्याड-पल्याडची माणसं काळजाच्या धाग्याने बांधलेली असली, तरी दुभंगलेल्या देशांमधली सीमा ओलांडण्यासाठी ‘परवानगीचा कागद’ मिळणं कुठं सोपं आहे? (हा लेख छपाईला जाईतो) पाकिस्तानातल्या ‘मराठी’ सहित्यरसिकांना सीमा ओलांडण्यासाठीचा व्हिसा काही मिळाला नव्हता. - म्हणून ‘लोकमत’च्या प्रतिनिधीने थेट कराचीत जाऊन घेतलेली ही गाठभेट.
पाकिस्तानची आर्थिक राजधानी कराची. कॉस्मोपोलिटन स्वभावाचं जिंदादिल शहर. त्या शहरात
आजही काही मराठी घरं भेटतात आणि अगत्यानं बोलली जाणारी मराठी कानावर पडतेच!
रविवारची सुस्त, आळसटलेली सकाळ,
एरव्ही अशी सकाळ कराचीतल्या छोट्याशा, घरांच्या गर्दीनं गच्च दबलेल्या अरुंद गल्लयांमधे हरवून गेलेली असते. त्यादिवशी मात्र दारावरची कुलूपं फक्त राखणीला मागे राहिली आणि या घरातली माणसं ‘सदर टाऊन’च्या दिशेनं निघाली. कराची नावाच्या अस्ताव्यस्त पसरलेल्या, गजबजलेल्या शहराचा सदर टाऊन हा मध्यवर्ती भाग. त्या भागातल्या ‘डोली खाता’ या ऐतिहासिक वस्तीकडे सगळी माणसं चालली होती. बायका अगदी नटूनथटून, पारंपरिक दागिने घालून, पोरासोरांनाही ‘ट्रॅडिशनल’ कपड्यात नटवून घरोघरची माणसं निघाली होती. काही रिक्षात दाटीवाटीनं कोंबून निघाली तर काही मोटरसायकलीवर!
त्यांना जायचं होतं ‘मरी माता मंदिरात’!
आजही डोली खाता भागाता हे मरीआईचं जुनं मंदिर उभं आहे, दरवर्षी मरीआईची जत्रा भरते. आणि कराचीत राहणारे हिंदू आपल्यातले जातीभेद, भाषाभेद विसरुन या मरीमातेच्या दर्शनाला येतात. मरीमातेच्या छोट्या मंदिरात हिंदू देवीदेवतांच्या असंख्य तसबिरी लावलेल्या दिसतील. त्यादिवशीच्या गर्दीतलं कुणी त्या तसबिरींना हात जोडत होतं, कुणी डोकं टेकवत होतं. काही बायका मरीमातेच्या मुर्तीवर अभिषेक करत होत्या, काही मुर्तीच्या पोशाखाची आणि दागदागिन्यांची तयारी करत होत्या. सगळ्यात मुख्य पुजारीण, लोक तिला दुर्गा माता म्हणतात, सगळं तिच्या देखरेखीखाली सुरू होतं.
दुसरीकडे काही पुरुष प्रसादाचे पदार्थ रांधत होते. पराठे, भात, चण्याची ऊसळ असा प्रसाद तयार होत होता. कुणी शंखनाद करत होतं, कुणी माळ जपत मंत्र म्हणत होतं, तर आरतीची वेळ जवळ आल्यानं लोक आरतीसाठी गर्दी करत होते. या भागाचं नाव डोली खाता का पडलं त्याचीही एक सुंदर कथा आहे. फाळणीपूर्वी कराचीत हिंदूही मोठय़ा संख्येनं राहत. रीत अशी की घरोघरचे देव डोलीत बसून सणावाराला या मंदिरात यायचे. लोक वाजतगाजत देव मिरवत न्यायचे. त्यावरुन या भागाचं नावच डोली खाता पडलं. फाळणीनंतर अजूनही हे मंदिर लोकांच्या श्रद्धेचा भाग आहे; कराचीच्या इतिहासाचा भाग आहे. धर्माच्या सीमारेषा दाट झाल्या तरी या भागात पाकिस्तानातल्या अल्पसंख्य हिंदूची येजा या मंदिरात कायम राहिली!
पाकिस्तानी समाज खरंतर आज नुस्ता धर्माच्याच नाही तर श्रद्धा, जातपात, वंश यासगळ्यात वाटला गेला आहे. पाकिस्तानी हिंदू असाही काही एक सरसकट समाजगट नाही, त्यांच्यातही भाषाभेद आहेच. सामाजिक स्तर वेगळे आहेत, त्यांचे त्यांचे देव आणि श्रद्धाही वेगळ्या आहेत. प्रत्येकाची वेगवेगळी मंदिरंही आहेत.
मात्र या मरीमातेच्या जत्रेनिमित्तानं हा सारा हिंदूसमाज एकत्र जमला होता. मराठी, गुजराथी, सिंधी, मद्रासी, शिख अशा विविध गटात विभागला गेलेला हा समाज. पाकिस्तानातला सर्वात मोठा अल्पसंख्याक वर्ग. त्यातही सर्वाधिक हिंदू कराचीत आणि सिंध भागात राहतात. हे मरीमाता मंदिरही कितीतरी शतक जुनं असावं. त्या मंदिराची देखभाल एका मराठी कुटूंबाकडे आहे. वर्षानुवर्षे हे मराठी कुटूंबच त्या मंदिराची देखभाल करत आलं आहे. अर्थात हे मराठी कुटूंब मुळचं महाराष्ट्रातलं नाही, ते इथलंच आहे, मुळचं कराचीचंच!
कराची शहरात तुम्हाला अनेक मराठी आडनावाची माणसं भेटतील, मराठीच कशाला, गुजराथी, राजस्थानी, केरळी, बिहारी, तमिळही बोलणारी माणसं भेटतील. कॉस्मोपोलिटन वीण पक्की असणारं हे शहर सगळ्या जातीधर्माच्या, वंशाच्या माणसांचं घर आहे. फाळणीनंतरही कराचीचा हा स्वभाव गेली अनेक वर्षे तसाच आहे.
इंग्रजांच्या काळात कराची हा बॉम्बे प्रेसिडन्सीचा भाग होता. मुंबई बंदराहून कराची बंदरापर्यंत जाणारी, नियमित व्यापारउदीम करणारी, व्यवसायासाठी जाणारी अनेक माणसं होती. काही माणसं कुटुंबकबिल्यासह आली आणि कायमची कराचीचीच झाली.
त्यातलीच ही काही माणसं. फाळणी झाल्यानंतर बहूसंख्य हिंदू, त्यातलेही मराठी मुंबईच्या दिशेनं रवाना झाले.
काही मात्र इथेच राहिले.
त्याच मराठी माणसांच्या पुढच्या पिढय़ा आता कराचीत आहेत. आज कराचीत २५0-३00 मराठी घरं आहे. त्याची एक ‘श्री महाराष्ट्र पंचायत’ही आहे. पाकिस्तान सरकारदरबारी ही एक नोंदणीकृत संस्था आहे.
जाधव आणि गायकवाड आडनावाचे बहुसंख्य मराठी कुटुंबं आहेत. काही कराचीत राहतात, त्यांचेच काही भाऊबंद सिंध प्रांतातल्या लहानमोठय़ा गावात-शहरांत विखुरलेले आहेत.
मरीमाता जत्रा, गणेशोत्सव या कार्यक्रमांना हे सारे मराठी एकत्र जमतात. आपले सण साजरे करतात.
लग्नही मराठी रीतीरीवाजांप्रमाणेच होतात. शुभमंगल-सावधान म्हणत मराठीत मंगलाष्टकं
म्हटली जातात. गुढीपाडव्याला या मराठी घरांवर गुढय़ा चढतात. घरोघर चैत्रात चैत्रगौर सजते, चैत्रगौरीचे हळदीकुंकूही उत्साहात साजरे होते. रामनवमी, गणेशजयंती हे सारे सण जोशात साजरे
होतात. मराठमोळ्या पद्धतीची होळीही या भागात साजरी होते.
मराठी घरोघर बोलली जाते, पण आता नवीन पिढी फार चांगलं मराठी बोलत नाही. सगळेच उदरु-इंग्रजी शिकतात, बोलतात. बाहेरच्या जगात याच भाषेत संवाद होतो.
मात्र सणवार-रीतीरिवाज जपत, आपलं ‘मराठीपण’ या माणसांनी अजून जपलंय.!!
मराठी बोली, मराठी सणवार!
‘‘कराचीत राहणारे मराठी लोक मुख्यत्वे खाजगी क्षेत्रात काम करतात. काहींची दुकानंही आहेत, पण व्यवसाय करणारे कमीच! बॅँकासह विविध कंपन्यांतच मराठी माणसं काम करताना दिसतात. आपसात मराठी बोलतात, मराठी सणवार मात्र उत्साहानं साजरे केले जातात.’’
- प्रमाश जाधव,
प्रतिनिधी, ‘श्री महाराष्ट्र पंचायत’, कराची
आम्ही बोलतो मराठीत,
पण मुलं? -खंत वाटतेच!
आज ७५ वर्षांच्या असलेल्या चंपाबाई गायकवाड. त्यांचा जन्म कराचीच. कराचीतच आजवरचा मुक्काम. मराठी भाषेविषयी त्यांना ओढ आहे. त्या स्वत: उत्तम मराठी बोलतात, पण आता आपल्या नातवंडांना मराठी बोलता येत नाही, याची त्यांना खंत वाटते. त्या सांगतात, ‘आम्ही वडीलधारी माणसं, मराठीतच बोलतो. पण आता तरुण मुलांना कुठे मराठी येते? ते उदरुच बोलतात, घरीही-बाहेरही!’’
(लेखक कराचीतील ख्यातनाम पर्यावरण पत्रकार आहेत.)