शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
4
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
5
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
6
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
7
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
8
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
9
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
10
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
11
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
12
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
13
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
14
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
15
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
16
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
17
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
18
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
19
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
20
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
Daily Top 2Weekly Top 5

'आयटी'तही 'ती' दुय्यम

By admin | Updated: October 18, 2014 12:42 IST

मायक्रोसॉफ्टचे सीईओ सत्य नाडेला यांनी स्त्रियांना कर्म करत राहावे व फळाची अपेक्षा करू नये, हा दिलेला अनाहूत सल्ला म्हणजे माहिती तंत्रज्ञानाच्या क्षेत्रातही शिरकाव केलेला लिंगांधळेपणाच. त्यांच्या वक्तव्यानंतर जगभरात गदारोळ झाला व टीकेची झोडही उठली. त्यांनी जाहीर माफी मागून सारवासारवही केली. मात्र, एकूणच स्त्रियांच्या अर्थार्जनाबाबत व कामासंदर्भात एक सुजाण आकलन आपल्याकडे केव्हा होणार?

 विद्युत भागवत

 
 
खुली अर्थव्यवस्था आणि जागतिकीकरण यांच्या वातावरणात स्त्रियांना विशेषत: तिसर्‍या जगातील किंवा दक्षिण आशियातील स्त्रियांना आपली कौशल्ये विकसित करण्याचा वाव मिळणार आहे अशी दवंडी पिटली गेली होती.  परंतु नुकतेच मायक्रोसॉफ्टचे सीईओ सत्य नाडेला यांनी माहिती- तंत्रज्ञान क्षेत्रात काम करणार्‍या महिलांना फळाची आशा न धरता काम करत राहा असा अतिशय लबाड सल्ला दिला आहे.  बायकांनी वेतनवाढीची आशा करू नये, मात्र काम चांगले करत राहावे, हा सल्ला खास हिंदू, ब्राह्मणी, कर्मठ आणि दक्षिणी जगातून नेहमीच येणार्‍या आघाती वादळासारखा आहे आणि आता हे कोणीही ऐकून घेणार नाही.  नाडेला यांना वयाच्या ४८व्या वर्षी एवढे मोठे पद मिळाले तर  खरे  म्हणजे  त्यांच्या घरच्या लोकांचा धांडोळा घेतला पाहिजे. त्यांना इतक्या मोठय़ा पदावर जाण्यासाठी कोणत्या प्रकारे घरच्यांनी, नातेवाइकांनी आणि समाजाने पाठिंबा दिला याचे गणित मांडले पाहिजे.  त्यांचा लिंगांधळेपणा आता उघड केला पाहिजे.
सन १९९0ला नव्या आर्थिक धोरणाची सुरुवात झाली आणि भारताच्या राजकीय अर्थव्यवस्थेमध्ये मोठे बदल होऊ लागले. २0१४ मध्ये आपण जर गेल्या २४ वर्षांतील बदलांकडे पाहिले तर, भारतातील स्त्रियांच्या दृष्टीने हा काळ आव्हानात्मक तर आहेच, परंतु त्याच बरोबर वेगवेगळ्या थरातील, वेगवेगळ्या पद्धतीचे काम करणार्‍या २५-५0 या वयोगटातील स्त्रियांच्या दृष्टीने या काळात एक मोठा अवकाश निर्माण झाला आहे.  संगणक आणि त्याच्याशी संलग्न असणारी कौशल्ये लक्षात घेता, स्त्रिया वेगवेगळ्या क्षमतांचे काम करू शकतील अशी शक्यता निर्माण झाली आहे. अगदी विद्यापीठीय शैक्षणिक आणि प्रशासकीय कामांमध्येसुद्धा स्त्रियांचे प्रमाण भरपूर दिसते.  तसेच बँका, वेगवेगळी कॉर्पोरेशन्स आणि विशेषत: माध्यमांमधून वेगवेगळ्या चॅनेल्समधून अगदी अभिनयापासून ते तंत्रज्ञ म्हणून स्त्रिया काम करताना दिसत आहेत.  वर्तमानपत्रांमध्ये सुद्धा विचार व्यक्त करण्यासाठी असणारी काही  पुरुषांची मक्तेदारी मोडली जाऊन, सातत्याने विविध क्षेत्रांतील स्त्रिया मांडणी करण्याचा प्रयत्न करताना दिसतात.  असे असताना प्रश्न पडतो, की अजूनही स्त्रियांच्या अर्थार्जनासंदर्भात, त्यांच्या घराबाहेरील कामांसंदर्भात आपल्याकडे एक सुजाण असे आकलन विकसित होताना दिसत नाही.  
जरा कुठे वैद्यकीय किंवा आय.टी. क्षेत्रामध्ये चांगल्या अर्थार्जनाच्या चौकटीत काम करणार्‍या स्त्रिया दिसल्या, की साधारणत: भुवया वर चढतात आणि स्त्रियांना पुरुषांच्या बरोबरीने वेतन दिले जाऊ नये अशी सर्वसाधारण सहमती व्यक्त होते.  खरेतर, अगदी बांधकामावर काम करणार्‍या स्त्रीपासून, घरकाम करणार्‍या मोलकरणीपासून ते वेगवेगळ्या प्रकारची भाषांतरे करणार्‍या, टंकलेखन करणार्‍या किंवा सुपर मार्केटमध्ये पैसे गोळा करणार्‍या, काउंटरवर बसणार्‍या किंवा अगदी सेल्सगर्ल्स असे ज्यांना म्हणतात, अशा मुली पाहिल्या तर, जाणवते की, एका तत्परतेने आणि निश्‍चयाने स्त्रिया सार्वजनिक जीवनात वावरतात.  अशा स्त्रिया आपापल्या कुटुंबामधील आपापल्या जबाबदार्‍या तितक्याच तत्परतेने पार पाडत असतात. साधारणत: गृहीत असे धरले जाते, की विवाहित स्त्रियांना घरी पतीच्या अर्थार्जनाचा पाठिंबा असतो आणि त्या फावल्या वेळातील काम म्हणून नोकरी करतात. परंतु असे चित्र आता बदललेले दिसते.  कुटुंबातील एका व्यक्तीच्या अर्थार्जनावर संपूर्ण घर चालवावे अशी परिस्थितीच दिसत नाही.  अजूनही आपल्याकडे मध्यमवर्गीय घरामध्ये आई-वडील, लहान मुले आणि एखाद-दोन तरी निराधार नातेवाईक व्यक्ती असतातच. त्या अर्थाने शहरातल्या किंवा निमशहरातल्या कुटुंबांमध्ये पूर्णत: विभक्त कुटुंब असे काही अस्तित्वातच दिसत नाही.  त्यामुळे घरातल्या माणसांची सेवा शुश्रूषा, आल्या-गेल्यांचे पाहुणचार, काही प्रमाणात प्रत्येक कुटुंबात असणारी सणा-समारंभांची प्रथा आणि दैनंदिन जीवनातील रांधा वाढा, उष्टे काढा हे चक्र स्त्रियाच सांभाळत असतात.  अशा तर्‍हेचे अदृश्य काम पार पाडूनच स्त्रिया सार्वजनिक जीवनात मिळणारी कामाची संधी घेऊन उभ्या राहतात.  कामाच्या ठिकाणीसुद्धा आपण बाई आहोत आणि बाई म्हणून कोठे कमी पडायला नको म्हणून पुरुषांपेक्षा जास्त सचोटीने, जास्त मेहनतीने आपले काम पुरे करावे असा एक धोसरा त्यांच्या मनात सतत असतो. गंमत अशी, की आताच्या काळात अगदी शहरांत घरकाम करणारी बाईसुद्धा हातात मोबाईल घेऊन आणि त्यातल्या त्यात चांगले रंगीबेरंगी कपडे घालून वावरताना दिसते. व्यक्ती म्हणून असण्याची एक तर्‍हेची जाणीव मोठय़ा प्रमाणात सर्व थरातील स्त्रियांमध्ये विकसित होताना दिसते. त्यामुळे उगीचच थट्टा, टिंगल सहन न करणारी, स्वत:च्या दिसण्या-असण्याबद्दल सार्थ अभिमान असणारी आणि चोख काम करून खणखणीत अर्थार्जन करू पाहणारी अशी स्त्री महाराष्ट्रात तरी प्रातिनिधिक स्वरूपात दिसते.  उलट वर उल्लेखिलेल्या सर्वच कार्यक्षेत्रांमध्ये काम करणारे पुरुष  बर्‍याच वेळा पाट्या टाकण्याचे काम करण्याच्या वृत्तीचे दिसतात. इतकेच नाही तर, त्यांच्या घरी जर घर सांभाळणारी त्यांची हक्काची बायको असेल तर ते त्यांच्याबरोबर काम करणार्‍या इतर सहकारी स्त्रियांशी काहीशा उपेक्षेने आणि कुत्सितपणे वागतात.  एकूणच बायकांनी घराबाहेर काम करणे ही गोष्ट अजूनही सर्वमान्य नाही आणि घरात गरज आहे, पैसे कमी पडतात म्हणूनच स्त्रियांनी काम करावे असा कल दिसतो.
कामाच्या ठिकाणी स्त्रियांना दुय्यम दर्जाचे काम द्यायचे, हलके काम द्यायचे, जोखमीचे किंवा प्रवासाचे काम द्यायचे नाही असा एक अलिखित नियम दिसतो.  त्यानुसारच मग स्त्रियांच्या कामाचे मूल्यमापन पुरुषांच्या कामाच्या तुलनेत कमी वेतनाचे काम म्हणून केले जाते.  स्त्रियासुद्धा बर्‍याच वेळा असे स्वीकारतात, की त्यांना करायला लागणारे अधिक कष्टाचे किंवा चिवट प्रकारचे काम कमी दर्जाचेच असते.  शेवटी एखादा तज्ज्ञ डॉक्टर किंवा सर्जन हा करतो ते काम इतके महत्त्वाचे असते, की बाकीची देखभाल करण्याचे काम परिचारिकांनी केले तरी त्याची तुलना तज्ज्ञ ज्ञानी पुरुषांच्या कामाशी करणे अशक्यच ठरते.  परंतु असेही चित्र जेथे नसते अशा माहिती-तंत्रज्ञान क्षेत्रामध्येसुद्धा आपल्याला दिसते, की एका प्रकारे संरक्षण देण्याच्या निमित्ताने किंवा कुटुंब सांभाळून जमेल तेवढे काम करावे या सर्वमान्य मूल्यव्यवस्थेमुळे स्त्रियांच्या वाट्याला त्यांच्या घरातील इतर पारंपरिक कामे करणार्‍या बायकांपेक्षा जास्त वेतन येत असले तरी, त्याची तुलना त्याच तर्‍हेचे काम करणार्‍या पुरुषाच्या वेतनाशी होऊ शकत नाही.
एक तर्‍हेची सत्तासंबंधाची उतरंड कामाच्या ठिकाणी असते.  त्या उतरंडीमध्ये अजूनही निर्णय घेणारा प्रमुख हा कुटुंबप्रमुखाप्रमाणे पुरुषच असतो.  असा पुरुष हा अपरिहार्यपणे वर्चस्ववादी जात, वर्ग, धर्म चौकटीतील असतो.  कुटुंबामध्ये अनेक स्त्रिया राबत असतात आणि कनिष्ठ जातीतील अनेक पुरुषही सेवा पुरवित असतात.  परंतु स्त्रिया अशा अगदी शिखरावर जवळ जवळ पोचतच नाहीत.  आणि पोचल्या तरी त्यांची तैनात कुटुंबामध्ये इतर यशस्वी पुरुषांप्रमाणेच सांभाळली जाते का, हा प्रश्न अनुत्तरीतच राहतो.  
म्हणूनच कोणत्याही पदावर पुरुष आहे का स्त्री आहे याचा विचार न करता जी वेतनश्रेणी ठरली असेल ती त्या व्यक्तीला दिली गेली पाहिजे. तो त्या खुर्चीचा, त्या पदाचा हक्क असतो आणि तिथे लिंगभेदाच्या आधारे विषमता पाळली जाऊ नये हे स्पष्टपणे मान्य व्हायला हवे.  एकूणच भारतातील सर्व स्त्रिया गुंतागुंतीच्या पुरुषसत्ताक व्यवस्थांच्या जाळ्यातून वाट काढत असतात.  त्या त्या जातीनुसार, धर्मानुसार, कुटुंबातील प्रथा-परंपरांनुसार बहुविध पुरुषसत्ताकांच्या जाळ्यातून त्या आपले जगणे साधत असतात, हे वास्तव लक्षात घ्यायलाच हवे.  वयाच्या वेगवेगळ्या टप्प्यावर त्यांच्या करिअरला मुरड घालत, कधी नोकरी सोडत, कधी मिळेल ती नोकरी हाती घेत, त्या एखाद्या सुरक्षित टप्प्यावर बर्‍या पगाराच्या शक्यतेपाशी पोचतात.  अशा वेळी बाजारपेठी नफेखोरीच्या धोरणांनुसार त्यांना जर पुन्हा एकदा स्वस्त श्रमिक म्हणून मानून कमी वेतनात जास्त काम करून घेण्याचे धोरण ठेवले तर तो अन्यायच आहे.  स्त्रियांची दृश्यता आताच्या काळात नाटक, सिनेमापासून चॅनेल्सवर दिसत असली, तरी त्याचा अर्थ भारतातील स्त्रीप्रश्नाला न्याय दिला गेला असा होत नाही.  खरेतर, असुरक्षितता जी स्त्रिया अनुभवतात ती फक्त बलात्काराच्या स्वरूपाची नसते तर वेळ आली तर मी पुरेसे पैसे कमवू शकीन का, मी कमावलेल्या पैशांना घरामध्ये मानाचे स्थान मिळेल का, मी बाहेर पडल्यानंतर माझे घर मला टाकून तर देणार नाही, अशा अनेक भयांच्या चक्रांमधून स्त्रिया सर्व पातळ्यांवर जगतात.  जरी आत्मविश्‍वासाने उभी राहणारी एखादी स्त्री दिसली तर तो अपवादाने सिद्ध होणारा नियम आहे.  उलट भारतामध्ये ज्या ज्या स्त्रिया आपापल्या क्षेत्रामध्ये काही प्रमाणात नोंदवण्यासारखे काम करू शकल्या, त्यांच्या जगण्यात खासगी पुरुषसत्ताक व्यवस्थेशी केलेल्या वाटाघाटी आणि देवाणघेवाणी असतात आणि सार्वजनिक जीवनातील पुरुषसत्ताकांशीसुद्धा नमते घेणे, जुळवून घेणे असेच चित्र दिसते.  उत्तम चित्रकला, निर्मितीक्षम साहित्य, बेभान होऊन केलेले नृत्य किंवा अभिनय या सार्‍यांचीच वानवा आपल्याकडे दिसते. बाईच्या रक्षणियतेचा मुद्दा उलट अधिकाधिक घट्ट केला जातो आहे आणि हे घातक आहे.   
(लेखिका स्त्रीविषयक प्रश्नांच्या 
अभ्यासक आहेत.)