ख्यातनाम गायिका आशा भोसले यांच्याशी मुक्त संवाद साधलाय लोकमतचे एडिटर इन चीफ, राजेंद्र दर्डा यांनी...
काही लोकांचा सहवास लाभणे, त्यांच्या सोबत दोन क्षण व्यतीत करायला मिळणे म्हणजे आयुष्यात सर्व काही मिळवल्यासारखे असते. अशा लोकांमध्ये मी आशाताईंचा आवर्जून उल्लेख करीन. त्यांना भेटण्याची संधी आहे म्हटल्यावर वय उलटून टाकणारी हुरहुर लागते. माझीही अवस्था वेगळी नव्हती. लहानपणापासून ज्यांच्या स्वरांनी माझ्या पिढीवर संगीतसंस्कार केले त्यातल्या एक स्वरसम्राज्ञी आशा भोसले. माझ्या पिढीतील कोणालाही जर आवडीची दहा गाणी निवडायला सांगितली, तर त्यातली आठ गाणी ही नक्कीच आशाताईंची असणार! गेल्या आठवडय़ात मैफलीच्या निमित्ताने आशाताई औरंगाबादला आल्या. वीस वर्षानंतर औरंगाबादेत त्यांचे येणे झालेले! कार्यक्रमाच्या पूर्वसंध्येला त्यांनी ‘लोकमत’ कार्यालयाला सदिच्छा भेट दिली तेव्हा त्यांच्याशी मनमोकळ्या गप्पांची मैफल जमली.
लंडनला शिकत असताना फिट्झरॉय स्क्वेअर येथे ‘वायएमसीए’च्या गांधी हॉलमध्ये पं. हृदयनाथ मंगेशकरांची मैफल मी ऐकली होती. त्यानंतर 1974 साली लतादीदींची तीनदिवसीय कॉन्सर्ट, रॉयल अल्बर्ट हॉलमध्ये झाली होती. मी शिकत होतो. अडीच पौंडांचे तिकीट खरेदी करण्यासाठी माझ्याकडे पैसे कुठून असणार? पण काहीही करून लतादीदींचे गाणे मात्र ऐकायचेच होते, म्हणून मग गेटकीपर म्हणून तिथे रुजू झालो. सर्व रसिकांची तिकिटे तपासल्यावर मग शांतपणे गाणी ऐकायची!! अशा त-हेने तीन दिवस लतादीदींचे स्वर प्रत्यक्षात ऐकण्याचे भाग्य मला लाभले.
पं. हृदयनाथांना ऐकले, लतादीदींनाही लाइव्ह ऐकले; मात्र आशाताईंना प्रत्यक्ष ऐकण्याचे भाग्य लाभले नाही याची खंत वाटायची. तो योग इतक्या वर्षानंतर आला.
आशाताईंना लाइव्ह ऐकायला मिळणार म्हटल्यावर शहरातील तमाम रसिकांचा उत्साह शिगेला पोहोचलेला होता. त्यापैकीच मी एक. आशाताई 82 वर्षाच्या आहेत. पण त्यांची ऊर्जा पाहून वयाच्या आकडय़ावर विश्वास बसणो तसे अवघडच!
मंगेशकर घराण्याचा समर्थ वारसा आणि चौकटी उधळून लावणारा धाडसी, प्रयोगशील स्वभाव.. यामुळे आशाताई कधीही कुठल्याच आकृतिबंधात अडकून पडल्या नाहीत. त्यांच्याशी गप्पांचा अनुभवही तसाच : खळखळत वाहणा-या झ-यासारखा!
सात दशकांपेक्षा अधिक कारकीर्दीमध्ये वीसपेक्षा जास्त भारतीय भाषांमधून गायलेली सुमारे तेरा हजार गाणी, त्यासाठी लाभलेला गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड बुकचा सन्मान.. आशाताईंच्या कर्तृत्वाचा आलेख फार प्रदीर्घ आणि त्याहून खोल रसिकांच्या हृदयातले त्यांचे स्थान! भाषा असो वा प्रांत, कसलीही मर्यादा या चिरतरुण सुरांना कधीही बंधन घालू शकलेली नाही.