- कीर्ती शिलेदार
तालाशिवाय सूर.. शब्दांशिवाय गाणं.. आणि तुझ्याशिवाय जगणं..! गेले वर्षभर मी आणि लता तुझ्याशिवाय जगण्याची धडपड करतो आहोत! नाना गेले तेव्हा आपण सगळेच हादरलो होतो.. एकमेकींना धीर देत पुन्हा उभ्या राहिलो. घरमालक, भाऊबंदांनी लादलेले कज्जे.. गंधर्व शताब्दीनंतर कर्जात बुडालेली ‘मराठी रंगभूमी’ या सर्वांनी खंबीरपणे तोंड देत पुन्हा स्थिरस्थावर झालो ते केवळ तुझ्या भक्कम पाठिंब्यामुळंच! तू असेपर्यंत सगळ्या संकटांना झेलत हसत-खेळत वावरलो.. तुझा प्रसन्न चेहरा म्हणजे आम्हा सर्वांची अदृश्य प्रेरणा होती.
आई, तू संगीत रंगभूमीची सम्राज्ञी होतीस. नटसम्राट बालगंधर्व म्हणजे, नाना आणि तुला परम दैवताप्रमाणे होते. त्यांच्याबरोबर प्रत्यक्ष काम करण्याची संधी मिळाली. संगीत नाटक हेच जीवनध्येय मानून तुम्ही एकत्र आलात.. संगीतनाट्य संस्था स्थापन केलीत. कालौघाचे कितीही फटके बसले, तरी तुम्ही आपल्या ध्येयापासून विचलित झाला नाही. आपल्या नाट्यवतरुळात हौशी आणि व्यावसायिक असे दोन प्रकार मानले जातात. तुम्हा दोघांचा कारभार अजबच.. पदरमोड करून हौसेनं तुम्ही व्यावसायिक संगीत नाटक केलंत! दोन पिढय़ांची कारकीर्द घडवत संगीत रंगभूमीचा नंदादीप सतत उजळत ठेवला.
नायिका म्हणून जवळजवळ ३0-४0 वर्षे तू तळपत राहिलीस. सगळ्या चांगल्या गाजलेल्या नायकांबरोबर कामं केलीस. तुझं रंगमंचावरचं वावरणं दिमाखदार असायचं. तुझ्या प्रतिभाशाली गायकीनं तुझ्या सगळ्या भूमिकांमध्ये आगळे रंग भरले. नाटक असो, नाहीतर मैफल.. तुझ्यावर रंगदेवता नेहमीच प्रसन्न राहिली. आम्हा नाठाळ मुलींना घडवणं.. तसं मुश्कील काम होतं! लताची दादागिरी.. माझा नकल्या स्वभाव.. छानपैकी धपाटे देऊन आम्हाला वठणीवर आणायचीस! आमच्या स्वतंत्र विचारांना नेहमी चालना दिलीस. तुम्ही दोघांनी आमच्यावर कोणतीही गोष्ट लादली नाही. लताची आणि माझी कारकीर्द सुरू झाल्यावर तुम्हाला खूप समाधान वाटलं होतं. प्रत्येक कार्यक्रमानंतर आणि प्रयोगानंतर त्याचं विश्लेषण करण्याची सवय तुम्ही आम्हाला लावलीत. आपल्या चौघांचं ते विश्व अपार आनंदानं डोलत असायचं!
आई, तुझं सगळ्यात मोठं कार्य कोणतं असेल, तर ते ज्ञानदानाचं! हातचं न राखता कितीतरी शिष्यांना तू नाट्यसंगीत शिकवलंस. नाट्यपद गाताना चेहर्यावर भाव यायला पाहिजेत या तुझ्या आग्रहातून तुझ्या शिष्या एकेक संगीत नाट्यप्रवेश निवडून सादर करू लागल्या. नवी पिढी सहजपणे घडत गेली. सत्याऐंशी वर्षांचं तुझं आयुष्य संगीताशी आणि संगीत नाटकाशी एकरूप झालेलं होतं.
शेवटी-शेवटी जरी थकली होतीस तरी नाटकांच्या तालमी आणि प्रयोगांना हजर राहून त्या वातावरणाचा आनंद लुटत राहिलीस. तू आलीस की सगळं वातावरण प्रसन्नतेनं भरून जाई. तू कृतार्थ होतीस. परमेश्वरावर आणि स्वामी सर्मथांवरची अपार निष्ठा यांनी कृतकृत्य जीवन लाभलं. सगळे मानसन्मान तुझ्याकडं चालत आले. खूप शांतपणे तू या जगाचा निरोप घेतलास. अत्यंत साधेपणानं, अपार कष्टानं कर्तृत्व सिद्ध करून तू स्वत:चं स्वतंत्र अस्तित्व घडवलंस. तू आज प्रत्यक्ष नाहीस पण असंख्य रसिकांच्या मनात आणि आम्हा मुलींच्या हृदयात तू निरंतर आहेस..
(लेखिका ज्येष्ठ गायिका आहेत.)