कधी न पाहिली अशी ठिकाणं, कधी न चाखल्या अशा चवी, कधी न केलेली धाडसं!! आयुष्यात एकदा.. आणि मग पुन्हापुन्हा कराव्याशा वाटणा:या या गोष्टी अनुभवण्यासाठीच हल्ली प्रवासाला निघतात माणसं!
- पसंतीच्या ‘याद्या’ बदलल्या आहेत आणि पायाखालचे रस्तेही!!
मग, कुठे जाणार या उन्हाळ्यात?
मनालीजवळच्या एका छोटय़ाशा खेडय़ातल्या जुन्या ब्रिटिश बंगल्यात मुक्कामाला? गुलमर्गला फुललेल्या टय़ुलीपच्या बागांमध्ये भटकायला? की तारकर्लीच्या किना:यावर स्कुबा डायव्हिंग आणि स्नॉर्कलिंगचा बेत आहे? लडाखमधल्या पँगाँग लेकच्या काठावर तंबूत राहून आलेल्या त्या मैत्रिणीने दिल्या होत्या ना टिप्स? -तसं काही ठरतंय का, म्हणजे सिक्कीमच्या बाजूला कुठे हिमालयात?
परदेशी जाणं आहे का बजेटमध्ये? मग सिंगापूर, थायलंडऐवजी श्रीलंका? किंवा मग ग्रीस नाहीतर इस्तंबूल?
राहणार कुठे?
त्याच त्या हॉटेलांचा कंटाळा आला म्हणून होम स्टे ट्राय करून पाहायचाय? आणि युरोपात जाऊन वरण-भात नाहीतर तंदुरी रोटीसाठी उसासे न टाकता तिथलंच काहीतरी ‘लोकल’ खाण्याची हिंमत करून पाहायचं मनात आहे?
आणि हो, इटलीमध्ये हल्ली पिङझा बनवण्याचे क्लासेस घेतात टूरिस्टसाठी! शिवाय पास्ता टूर्स असतात.. जायचंय तिकडे?
असं असेल तर मग आपल्या सांगली-कोल्हापुरात गूळ कसा बनवतात हे पाहाण्याची एखादी टूर का असू नये? खान्देशातल्या जुन्या-जाणत्या आज्जी-मावशी पीठ-पुरणाचा उंडा झुलत्या हातांवर ङोलतङोलत मांडे बनवतात ते काही जादूहून कमी नसतं, नाही का?
भल्यामोठय़ा ग्रुपबरोबर ‘टूरिस्ट’ म्हणून जायचं ठरलं, की मग डोक्याला तकतक नसते फारशी. एकदा पैसे भरले की झालं!!.. पण आपल्या स्वत:च्या गाडीत सामान भरून मन मानेल त्या दिशेने निघणं आणि वाटेत थांबत थांबत, काही च्याऊम्याऊ खातपीत, जे दिसेल ते बघत बघत स्वत:च्या मस्तीत प्रवास करण्याची गंमत काही भन्नाटच असते, हे पटलंय तुम्हाला मनातून!
- मग काय, एखादी रोडट्रिप प्लान करताय? आत्ता उन्हाळ्यात नसली, तरी दिवाळीनंतर कधीतरी?
आणि हो, हे काय? तुम्ही चक्क स्वत:च ठरवायला लागलात आता की कुठे जाता येईल? काय आवडेल आपल्याला अनुभवायला? बघायला?
आणि त्यासाठी मदत करणा:या वेबसाईट्सची यादी पाठ झालीये एव्हाना तुम्हाला? समजा, लंडनला जायचं ठरलं, तर तिकडे जाऊन आलेल्यांचे/सध्या तिथे असलेल्यांचे आणि तुमच्यासारख्याच जाऊ इच्छिणा:यांचे ग्रुप्स असतात ऑनलाइन, हेही कळलंत तुम्हाला!! म्हणजे तिथल्या ऑनलाइन गप्पांमध्ये घुसून विचारता येतं, की काहो, हे अमकं हॉटेल एअरपोर्टपासून फार लांब आहे का? सकाळचं विमान गाठण्यासाठी पहाटे बाहेर पडावं लागलं तर व्यवस्था होईल का?
- पाहा, बघताबघता किती बदललात तुम्ही!! आधी साधे ‘पर्यटक’ होतात, आता चक्क ‘टूरिस्ट’ झालात!!!
हे असले सगळे बदल टिपणारे काही खास लेख आजच्या अंकात आहेत.
‘सीमा ओलांडणं’या प्रकारापासून (सगळ्याच संदर्भात ) काहीशा बिचकून असलेल्या मराठी मध्यमवर्गासाठी बडय़ा परदेशी टूर कंपन्या वेगवेगळी आमीषं घेऊन सज्ज होताना दिसतात, याचा अर्थ काय?
- तर प्रत्येकालाच आता प्रवासाची ओढ आहे.
नवे अनुभव, नव्या चवीचं अन्न, नव्या ओळखी, नवी हवा, स्वत:बरोबरच वेळ घालवण्याची दुर्मीळ संधी असं किती काही देणारा प्रवास हळूहळू ‘जीवनावश्यक’ वाटू लागला आहे.
आधी कोल्हापूर, पंढरपूर, गणपतीपुळे,
अष्टविनायक या दिशेने जात माणसं. मग अमरनाथ, कैलास मानस, द्वारका, दक्षिण भारत, काश्मीर, केरळ, गोवा किंवा तिरुपतीला जाणं सवयीचं झालं. माथेरान, महाबळेश्वर ही काही फक्त हनीमूनची ठिकाणं नाहीत, हेही कळलंच मग!
गेल्या पंधरा वर्षात या सहलींना कंटाळून देशाच्या सीमा ओलांडण्याचं प्रमाण वाढलं. समुद्र लंघून जायचं नाही या हट्टामुळे भारतीयांनी फार सहन केलेलं आहे. घरातील एखाद्या धाडसी व नाठाळ मुलाला ‘तू काय मनात आणलंस तर जाशील समुद्र ओलांडून देशांतराला, आमच्याकडे कोण पाहणार नंतर?’ असं म्हणत. समुद्र ओलांडण्याकडे नकारात्मक दृष्टीने पाहिलं जाई. पण मध्यमवर्गाने त्यातला फोलपणा ओळखला आणि धडाक्यात देशांतर सुरू झालं.
आणि आता तर काय मलेशिया, सिंगापूर. अगदी गेलाबाजार दुबईची स्वप्नंसुध्दा मध्यमवर्गीय खिशांना परवडतात.
बहुतांशवेळा अशा परदेश पर्यटनाची सुरुवात दुबई किंवा थायलंड-पट्टायापासून होते. काहीतरी नवं करण्याचा किंवा नवं पाहण्याचा, किंवा पाहिलेली गोष्ट नव्याने पाहण्याचा नवा प्रवाहच गेल्या पाचसहा वर्षामध्ये भारतात आला आहे. देशांतर्गत पर्यटनामध्येही त्याच-त्याच ठिकाणी जाण्याऐवजी ओरिसा, ईशान्य भारत किंवा अंदमान, लक्षद्वीपला पसंती मिळू लागली. परदेशात जायचं तर सारखं शॉपिंगला न जाता काही माहिती मिळवणं, थोडं साहस अनुभवणं हवंसं वाटतं.
नेपाळ म्हणजे किंवा केवळ पशुपतिनाथाचं दर्शन आणि सर्वाना देण्यासाठी येताना मोती घेऊन येणं असं न करता हिमशिखरांचं लहान विमानांमधून दर्शन घेणं, तेथील लोकांमध्ये मिसळून संस्कृती जाणून घेणं आवडू लागलं आहे.
‘आमच्या यांना अजिबात वेळ नसतो, त्यामुळे कुठं बाहेर म्हणून पडणं होत नाही. लग्न झाल्यावर एकदा जाऊन आलो तेवढेच, त्यानंतर पिंटूच्या बाबांनी कुठ्ठे म्हणून नेलं नाही आम्हाला’- असे खास संवाद दुर्मीळ होण्याची चिन्हं दिसू लागली आहेत. नवे ग्रुप जमतात आणि माणसं बाहेर पडतात. आजी-आजोबाही कोणावर विसंबून न राहता बाहेर जाऊन येऊ लागले. नव:याच्या सुटीची वाट न पाहता मैत्रिणींच्या ग्रुपबरोबर बाहेर जाऊन येण्याचा ट्रेण्ड वाढीस लागला. एखाद्या हटके ठिकाणी जाऊन येणं, अंगावर येईल इतक्या झगमगाटी हॉटेलपेक्षा साध्या हॉटेलात किंवा तेथील लोकांच्या घरीच उतरणं, एकटय़ाने-एकटीने फिरून येणं अशा प्रकारच्या सहली या विचारातील मोकळेपणामुळे अनुभवता येऊ लागल्या आहेत.
मेडिकल टुरिझम (योगउपचार, तत्सम उपचारासांठी, शस्त्रक्रियेसाठी), लिटररी किंवा बुकफेअर फेस्टिव्हल टुरिझम म्हणजे साहित्य, वाचनासंदर्भात केलेलं पर्यटन, संगीत पर्यटन (सवाई गंधर्व महोत्सव, तंजावर), वाईन टुरिझम (नाशिक), स्पोर्ट्स टुरिझम (वर्ल्डकप किंवा इतर खेळांसाठी), अॅडव्हेंचर, स्पेस टुरिझम, अॅग्रो टुरिझम अशी ही यादी चांगलीच मोठी आहे. एखाद्या ठिकाणी युद्ध किंवा नकारात्मक गोष्ट घडली असेल तर अशा स्थळांना भेट देण्याचाही कल वाढीस लागला आहे. हिरोशिमा, नागासाकी, न्यूयॉर्कमधील ट्विनटॉवरच्या जागचे ग्राऊंड ङिारो, रवांडामधील वंशच्छेदाचं ठिकाण किंवा जर्मनीत ज्यूंना कोंडून मारण्यासाठी केलेल्या छळछावण्या अशी ठिकाणंही पाहिली जातात. चक्रीवादळ, भूकंपाने, युद्धामुळे उद्ध्वस्त झालेल्या जागाही पाहण्यास लोक उत्सुक असतात.
- हे बदल फक्त फिरण्यातलेच नव्हेत, आपल्या स्वभावातले आणि वृत्तीतलेही!!