शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
2
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
3
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
4
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
5
गुजरात पोलिसांची मोठी कावाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
6
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
7
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
8
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
9
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
10
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
11
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
12
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
13
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
14
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
15
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
16
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
17
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
18
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
19
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
20
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा

एक पक्ष, एक मतदारसंघ, एक ध्यास, असा एकनिष्ठ!... गणपतराव देशमुख

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2021 06:05 IST

गणपतराव देशमुख. शेतकरी, गरिबांच्या प्रश्नांसाठी कायम आक्रमक राहिले. गेल्या ७० वर्षांत त्यांचा वेश बदलला नाही, चपलेची जागा कधी बुटाने घेतली नाही. ना ते कधी कुणापुढे वाकले, ना कुठल्या मोहाला बळी पडले. असा नेता पुन्हा होणे नाही..

ठळक मुद्देआज गणपतराव गेल्यावर संसदीय कारकिर्दीतला त्यांचा तो शेतकरी, गरिबांच्या प्रश्नांवरचा संताप आणि आवेश डोळ्यांसमोर येतोय...

- मधुकर भावे

९५ वर्षांचे गणपतराव गेले. एकाच मतदारसंघात ११ वेळा विधानसभेत निवडून येणारा बहाद्दर नेता गेला. गेल्या ७० वर्षांच्या राजकारणात उंचपुरे गणपतराव यांचा वेश बदलला नाही, पायातली चप्पल कायमच राहिली. बुटाने जागा कधी घेतली नाही. आमदार असोत, नसोत, मंत्री असोत, नसोत, त्यांच्या वागण्या, बोलण्यात, राहण्यात ७० वर्षे फरक दिसला नाही. १९६२ ला आमदार म्हणून ते विधानसभेत आले. ६० वर्षे पत्रकारिता केली. रोजच्या पत्रकारितेतून काहीसा दूर झालो, तरी गणपतराव विधानसभेत होतेच. माझ्या माहितीप्रमाणे उध्दवराव पाटील, एन. डी. पाटील, गणपतराव देशमुख, केशवराव धोंडगे, बापू लाड, दि. बा. पाटील, दत्ता पाटील ही महाराष्ट्राच्या पुरोगामी राजकारणाची खरी प्रतीके. ही माणसे ना कोणासमोर वाकली, ना कोणी त्यांना मोडू शकले किंवा तडजोडीत मोहात पाडू शकले. जांबुवंतराव धोटेही या यादीत आहेत. केशवराव धोंडगे आज १०१ वर्षांचे कंधारमध्ये अजून गर्जत आहेत. ९६ वर्षांचे एन. डी. पाटील भीष्माचार्य आहेत, अशी माणसं पुन्हा होणार नाहीत. गणपतराव यात आणखी वेगळे. कारण उध्दवराव, एन. डी., केशवराव यांना महाराष्ट्रातल्या राजकारणाच्या जातीचा मोठा फायदा होता. गणपतराव ‘मा.ध.व’ मधील ध. यापैकी कोणालाही पैशाचा, सत्तेचा कसलाच मोह नव्हता. नाही म्हणायला एन.डी. आणि गणपतराव पु.लो.द. सरकारात मंत्री झाले. गणपतराव मंत्रालयाच्या समोरच्या छोट्या बी-४ बंगल्यात राहायचे. मंत्रालयात येताना चालत यायचे आणि चालतच घरी जायचे. एकदा त्यांना सहज विचारलं ‘गणपतराव... आता छोटा का होईना छान बंगला आहे, परिवाराला आणि लेकरांना इथे का नाही आणत?’ गणपतराव म्हणाले, ‘मंत्रिपद कायम थोडंच आहे... मुंबईचा खर्च परवडत नाही, या सवयी आम्हाला महाग वाटतात. पत्नीला घर चालवायला महिना ५०० रुपये देतो....’

मी ऐकत राहिलो. ही गोष्ट १९७८ची. ४३ वर्षे झाली. त्यावेळी ‘लोकमत’मध्ये लेख लिहिला होता. शीर्षक होते... ‘पत्नीला ५०० रुपयांत घर चालवायला सांगणारा मंत्री!’ काही महिन्यांनी गणपतरावांबरोबर सांगोल्याच्या सूतगिरणीच्या कार्यक्रमाला गेलो. कार्यक्रम आटोपल्यावर गणपतरावांच्या घरी जेवायला गेलो. ज्वारीची भाकरी, झुणका, भरीत, ठेचा. वहिनींनी छान बेत केला. गणपतरावांनी ओळख करून दिली.... ‘रतनबाई, आपल्यावर लेख लिहिणारे हेच ते पत्रकार...’ वहिनीसाहेब ताडकन म्हणाल्या...‘खोट का लिहिता हो...’ ‘मी म्हटलं, काय खोटं लिहिलं, गणपतरावांनी सांगितलं ते लिहिलं....’ गणपतरावांकडे फणकाऱ्याने बघून त्या म्हणाल्या... ‘कधी ५०० रुपये पाठवले हो.. ४०० रुपये पाठवायचे...’ असे हे गणपतराव.

आज गणपतराव गेल्यावर संसदीय कारकिर्दीतला त्यांचा तो शेतकरी, गरिबांच्या प्रश्नांवरचा संताप आणि आवेश असा डोळ्यांसमोर येतोय... ४० वर्षे झाली. इस्लामपूरच्या मामलेदार कचेरीवर शेतकऱ्यांचा प्रचंड मोर्चा निघाला. शेतमालाला भाव मिळावा यासाठी, महागाई कमी करावी यासाठी... एन.डी., गणपतराव नेतृत्व करीत होते. पोलिसांनी गोळीबार केला. एन.डीं.चा पुतण्या आणि चार तरुण जागीच ठार झाले. एन.डी. आणि गणपतरावांनी मोर्चा थांबवला नाही.

१३ मार्च १९६६. मुंबईच्या सचिवालयाला एक लाख बैलगाड्यांचा घेराव घातला गेला. आज कोणी याची कल्पना करू शकेल का? उध्दवराव, एन. डी. पाटील, गणपतराव, त्यावेळच्या शीवपासून (सायन) बैलगाडी चालवत सचिवालयाला घेराव घालण्यापर्यंत आले. गृहमंत्री होते बाळासाहेब देसाई. आता जिथे इस्लाम जिमखाना आहे तिथे बाळासाहेबांच्या गाडीसमोर एन. डी. आणि गणपतरावांनी आपल्या बैलगाड्या घातल्या. बाळासाहेबांना अडवले. आतासारखे भाडोत्री सुरक्षारक्षक तेव्हा नव्हते. मंत्र्यांना भीती वाटत नव्हती. बाळसाहेब गाडीतून खाली उतरले. एन.डी., गणपतराव आणि उध्दवराव (हे उध्दवराव म्हणजे फार मोठे नेते उध्दवराव पाटील) यांंनी नमस्कार करून बाळासाहेबांना अडवले. बाळासाहेब गाडीतून खाली उतरले. त्यांची मोठी डॉज गाडी होती.... हे नेते म्हणाले, ‘आज तुम्हाला मंत्रालयात जाऊ देणार नाही... ’ बाळासाहेबांनी नमस्काराची परतफेड केली. शांतपणे गाडीत बसून गाडी वळवली. ते मेघदूत बंगल्यावर गेले. एकही मंत्री मंत्रालयात पोहोचू शकला नव्हता; पण खंत अशी आहे की, शे. का. पक्षाचे हे नेते शेतकऱ्यांच्या ज्या प्रश्नांसाठी आयुष्यभर लढले त्यातला प्रत्येक प्रश्न आज जसाच्या तसा, जिथे होता तिथेच आहे. १ मे १९६० ला संयुक्त महाराष्ट्र झाला. त्यासाठी लढले शेतकरी आणि कामगार.. १०६ हुतात्म्यांमध्ये ७३ हुतात्मे शेतकरी आणि कामगार.. ६१ वर्षांनंतर जे लढले, तेच देशोधाडीला लागले. आत्महत्या करण्याची वेळ त्याच शेतकऱ्यांवर आली. लढले कोण, धारातीर्थी पडले कोण आणि गब्बर झाले कोण? लढणारे उध्दवराव, गणपतराव दुसऱ्या, तिसऱ्या वर्गातून रेल्वेतून फिरत राहिले. हातात बॅगा घेऊन रेल्वेचे जिने चढत राहिले...

महाराष्ट्राला अभिमान वाटावा अशा दोन महत्त्वाच्या योजना म्हणजे कापूस एकाधिकार खरेदी आणि दुसरी रोजगार हमी... या दोन्ही योजनांसाठी विधानमंडळाच्या व्यासपीठावर ज्यांनी सर्वस्व पणाला लावले, त्यात गणपतराव देशमुख, दि. बा. पाटील, केशवराव धोंडगे आघाडीवर आहेत. आज त्यांची आठवण कोणालाच नाही.

१९७१­-७२ च्या भीषण दुष्काळात वसंतराव नाईक यांच्यापाठोपाठ महाराष्ट्र घुसळून कोणी काढला असेल तर गणपतरावांनी... रोजगार हमीवर पुरुष आणि महिलांना समान मजुरीसाठी गणपतरावांनी विधानमंडळात आकाश-पाताळ एक केले होते. शेवटी वसंतराव नाईकसाहेब म्हणाले, ‘हा निर्णय राज्य सरकारला करता येणार नाही, केंद्राला निर्णय करता येईल.. पंतप्रधान इंदिरा गांधी सोलापूरला येत आहेत, तुम्ही त्यांच्यासमोर या मागणीसाठी निदर्शने करा, मी परवानगी देतो. शक्य झाल्यास त्यांची मोर्चाशी भेट घडवतो... १९७३ ही गोष्ट. गणपतराव तेव्हा आमदार नव्हते. ५ हजार महिलांना घेऊन त्यांनी निदर्शने केली. वसंतराव नाईक मोर्चातील ५ नेत्यांना घेऊन भेटीसाठी इंदिराजींकडे नेले. इंदिराजींनी मागणी ताबडतोब मान्य केली...

महाराष्ट्राच्या असंख्य पुरोगामी निर्णयात या सर्व नेत्यांचं केवढं मोठं मोल आहे, किती कष्ट आणि श्रम आहेत. यापैकी कोणाही

नेत्याच्या वाढदिवशी ना कधी अभिनंदन पोस्टर लागलं, ना कधी त्यांना कोणी ‘कार्यसम्राट’ म्हटलं..

उध्दवराव, गणपतराव असे नेते आता पुन्हा होणे शक्य नाही.....

आणि हो... सर्वच पक्षाच्या नेत्यांनी हे वाक्य वाचावं....

उध्दवराव, गणपतराव, एन. डी. पाटील, केशवराव यांनी ६० वर्षांत त्यांचा पक्ष कधीही बदलला नाही...

(ज्येष्ठ पत्रकार)