डॉ. संप्रसाद विनोद
फर्नांडिस एका सॉफ्टवेअर कंपनीत उच्च पदावर कामाला आहेत. 10-20 सहका:यांकडून त्यांना काम करून घ्यावं लागतं. भारतात आणि परदेशात वारंवार प्रवास असतोच. सकाळी 8ला घर सोडावं लागतं. परत यायची वेळ निश्चित नसते. पत्नीदेखील सॉफ्टवेअर इंजिनिअर आहे. ती प्रथम जेव्हा मला भेटायला आली तेव्हा खूपच तणावाखाली होती. ते स्वाभाविकही होतं. तिचा धडधाकट, 6 फूट उंचीचा नवरा गेले काही महिने प्रचंड चिंताग्रस्त होता. कित्येक रात्री तो नीट झोपूही शकला नव्हता. झोपेत घाबरून उठायचा. 2-3 महिन्यांपूर्वी दोघे जण सुट्टीसाठी ऑस्ट्रेलियाला गेले असताना एका रात्री फर्नांडिस इतके घाबरले, की सुट्टी अर्धवट सोडून त्यांना परत यावं लागलं. वारंवार प्रवास करणा:या आपल्या नव:याला असं का होतंय, याची मेरीला- फर्नांडिसच्या बायकोला फार काळजी वाटू लागली. कुठलीही अडचण आली तरी धीराने सामना करणा:या या माणसाला नेमकं झालंय तरी काय, असा तिला प्रश्न पडला. ज्याने तिला कायम आधार दिला, तोच एवढा हतबल झाला तर आपलं कसं होणार? एकटीने संसाराचा गाडा कसा हाकायचा? मुलांची शिक्षणं, लग्नं, घराच्या कर्जाचे मोठमोठे हप्ते या सगळ्याला कसं तोंड द्यायचं, असे असंख्य प्रश्न तिला भेडसावू लागले.
गेल्या 4-6 महिन्यांपासून फर्नांडिसचा कामावरचा ताण चांगलाच वाढला होता. कंपनीतले महत्त्वाचे तीन-चार जण नोकरी सोडून गेल्यामुळे त्यांच्या कामांची तात्पुरती आपत्कालीन जबाबदारीदेखील फर्नांडिसवर येऊन पडली होती.
याचा परिणाम म्हणून कंपनीतर्फे केल्या गेलेल्या वार्षिक आरोग्य तपासणीत त्याच्या रक्तातलं मेदाचं प्रमाण वाढलेलं दिसून आलं. पाठ दुखते म्हणून पाठीचे एक्स-रे, एमआरआय केले. पाठीच्या दोन मणक्यांमधल्या जागेतून कूर्चा थोडी बाहेर आली असल्याचं रिपोर्ट सांगत होता. रक्तातला मेद कमी करण्याची काळजी घेतली नाही तर हृदयविकार होऊ शकतो आणि पाठीच्या दुखण्याबाबत पुरेशी खबरदारी घेतली नाही तर दुखणं वाढून पायांमधली शक्ती जाऊ शकते, असं डॉक्टरांनी सांगितलं होतं. त्यामुळे, दोघंही प्रचंड घाबरून गेले. त्याचे रिपोर्ट नीट पाहिल्यानंतर मेदाचं प्रमाण वाढल्याचं आणि कूर्चा सरकल्याचं लक्षात आलं. फर्नांडिसची जीवनशैली माहीत असलेल्या डॉक्टरांनी त्याला काळजी ‘घ्यायला’ सांगितलं होतं आणि ते बरोबरही होतं. पण, ही दोघं मात्र काळजी ‘करायला’ लागली होती.
फर्नांडिसच्या जीवनशैलीविषयी माहिती घेतली तर त्याला ‘कामाचं व्यसन’ असल्याचं लक्षात आलं. जेवणाखाण्याचं प्रमाण आणि वेळा निश्चित नव्हत्या. आहार समतोल नव्हता. खाणं कसंतरी घाईघाईने उरकलं जायचं. दिवसभर चहा-कॉफीचे पाच-सहा मोठे मग रिचवले जायचे. बरंचसं काम संगणकावर असल्याने शारीरिक हालचाली, व्यायाम अगदीच कमी व्हायचा. त्यामुळे वजन वाढलं. पोटही सुटलं.
शिवाय, त्याची बसण्याची पद्धतही ठीक नव्हती. खुर्चीच्या कडेवर आणि तिरकं बसून, पाठीला आंतरबाक आणून तो तासन्तास संगणकावर काम करायचा. कीबोर्ड, स्क्रीन योग्य उंचीवर नसल्यामुळे पाठीवर प्रमाणाबाहेर ताण पडल्यामुळे ती दुखायला लागली होती. आय.टी. क्षेत्रत काम करणा:या ब:याच जणांना हे सगळं आपलंच वर्णन चाललंय असं वाटू शकतं!!
फर्नांडिसच्या समस्या नीट लक्षात घेतल्यानंतर त्यांना प्रथम घाबरण्याचं किंवा काळजी करण्याचं काही कारण नसल्याचं नीट समजावून सांगितलं. नियमित योगाभ्यासाने त्यांचे आरोग्याचे प्रश्न निश्चितपणो सुटू शकतील, असा त्यांना दिलासा दिला. मग, फर्नांडिस योगाभ्यासासाठी येऊ लागले. त्यांच्याशी वारंवार बोलणं होऊ लागलं. प्रथम त्यांना खुर्चीवर नीट कसं बसायचं याचं प्रात्यक्षिक दाखवलं. गुडघ्याखाली उशी घ्यायला आणि मनापासून ध्यान किंवा प्रार्थना करून झोपायला सांगितलं. अर्गोनॉमिकली डिझाइन्ड खुर्ची वापरायला सांगितलं. त्यांनी ताबडतोब तशा दोन खुच्र्या घेतल्या. एक ऑफिससाठी आणि एक घरच्यासाठी. चार-आठ दिवसांत त्याचं पाठीचं दुखणं खूप कमी झालं. ध्यानाच्या साह्याने शरीर आणि मन पूर्णपणो शिथिल करायलाही ते शिकले. मग, दैनंदिन ताणांचं नियोजन कसं करायचं यासंबंधी आमचं विस्ताराने बोलणं झालं.
हे सगळं ज्ञान ते जसजसं दैनंदिन व्यवहारात वापरून पाहायला लागले, तसतसं त्याचं महत्त्व आणि उपयुक्तता स्वानुभवाने त्यांच्या लक्षात येऊ लागली. काही अडलं, समजलं नाही, पटलं नाही किंवा अगदी पूर्ण विरोधी मत असलं, तरी ते मोकळेपणाने सगळं माङयाशी बोलू लागले. त्यांच्या अशा सक्रिय सहभागामुळे योगसाधनेचं गुणात्मक मूल्य वाढत गेलं. गुणवत्तापूर्ण साधनेचे परिणामही तितकेच छान मिळू लागले. आत्मविश्वास परत येऊ लागला. रक्तातलं मेदाचं प्रमाण कमी होऊ लागलं.
नुकतेच ते अमेरिकेला आणि जर्मनीला जाऊन आले. विमानात बसून जाताना आणि येताना त्यांना भीती वाटली; पण त्याचं प्रमाण पूर्वीपेक्षा खूपच कमी होतं. मुख्य म्हणजे, ‘भीती वाटत’ असताना ते ‘भीतीशी मैत्री’ करू शकले. ध्यानाच्या साह्याने भीतीतून मुक्त होऊ शकले. शरीर आणि मन शिथिल करून भीतीवर मात करू शकले.
‘अभिजात योगसाधने’च्या परिणामकारकतेची इतकी छान प्रचिती देणारा हा अनुभव त्यांना मोठं आत्मबळ देऊन गेला.
(लेखक हे महर्षी न्यायरत्न विनोद यांचा विशुद्ध अध्यात्माचा आणि अभिजात योगसाधनेचा वारसा चालविणारे आंतरराष्ट्रीय ख्यातीचे योगगुरू आणि योगोपचारतज्ज्ञ आहेत.)