देशात भविष्यात पोलाद तयार करण्याची क्षमता असेल, त्या देशाकडे सोनं असेल..’ इंग्लंडमधील ज्या सार्वजनिक सभेत एका मोठय़ा नेत्यानं हे वाक्य उच्चारलं, त्या सभेतील श्रोत्यांमध्ये एक भारतीय युवक मन लावून ते व्याख्यान ऐकत होता! सभा संपली.. पण त्या एका वाक्याने भारतीय उद्योगाचे स्वप्न बघणारे आश्वासक मन पेटून उठले होते. एका मोठय़ा स्वप्नाची पायाभरणी मनातल्या मनात सुरु झाली होती. त्या युवकाचे नाव होते जमशेटजी नुसेरवानजी टाटा. भविष्यातील भारताला उद्योगविश्वाची जाण आणि भान देणा:या या महामानवाचा जन्म दक्षिण गुजरातेतील नवसारी या गावी 3 मार्च 1839 रोजी झाला. त्यांच्या जन्मदिनाला अलीकडेच 175 वर्षे झाली.
सर्वस्वी प्रतिकूल वातावरणात आपले मत मांडून आपल्या कल्पनांना मूर्त स्वरूप देण्यासाठी झटणो यासाठी अतुलनीय धैर्य लागते. या धैर्याला तुम्ही शारीरिक, मानसिक अथवा आध्यात्मिक धैर्य असे कोणतेही नाव द्या. भारतीय उद्योगांचे आद्य संस्थापक जमशेटजी टाटा यांच्या द्रष्टेपणाची आठवण व त्यांनी देशासाठी केलेल्या अलौकिक योगदानाचे स्मरण आपण ठेवणो अगत्याचे ठरते. जमशेटजींच्या संदर्भात जवाहरलाल नेहरू यांनी हे उद्गार काढले होते. नेहरूजींच्या या उद्गारांत जमशेटजींचे मोठेपण सामावले आहे.
वास्तविक पाहता अत्यंत धार्मिक परंपरा लाभलेले टाटा हे पारशी झोरोस्ट्रियन घराणो धर्माचे आचरण करणारे होते. जमशेटजींचे वडील नुसेरवानजी यांनी आपली पिढय़ानपिढय़ा चालत आलेली धमर्गुरू होण्याची परंपरा मोडली आणि व्यवसाय करण्याच्या निर्धाराने त्यांनी मुंबई गाठली. छोटय़ा-छोटय़ा व्यवसायात त्यांनी आयुष्य वेचले; पण म्हणावे तसे व्यावसायिक यश त्यांना मिळाले नाही. त्यांच्या मुलाच्या भाग्यात मात्र ते जणू लिहून ठेवले असावे. वयाच्या 14 व्या वर्र्षी जमशेटजींनी मुंबई गाठली आणि एल्फिन्स्टन कॉलेजमध्ये ते दाखल झाले. 1858 मध्ये त्यांनी पदवी प्राप्त केली आणि वडिलांच्या व्यवसायात ते रुजू झाले. व्यवसायाच्या दृष्टीने हा काळ अतिशय वादळी होता, कारण 1857चे बंड ब्रिटिश सरकारने नुकतेच मोडून काढले होते. त्या काळी मान्य असलेल्या बालविवाह प्रथेला अनुसरून वयाच्या सोळाव्या वर्षी हिराबाई दाबू हिच्याशी त्यांचा विवाह झाला. त्यांना दोराब, धुनीबाई आणि रतन ही अपत्ये झाली. पुढे त्यांचे मोठे चिरंजीव दोराबजी यांनी 19क्4 ते 1932 पर्यंत टाटा समूहाचे अध्यक्षपद भूषविले. वयाच्या 29 वर्षापर्यंत जमशेटजी आपल्या वडिलांसोबत कार्यरत होते. 1868 मध्ये मात्र त्यांनी एकवीस हजार रुपये भांडवल उभारून स्वत:ची कंपनी स्थापली. मुंबईतील चिंचपोकळी येथील एक आजारी ऑइल मिल विकत घेऊन त्याचे कापड गिरणीत रूपांतर केले. ‘अलेक्झांड्रा मिल’ असे नामकरण केलेली ही कंपनी आर्थिक फायदा झाल्याने त्यांनी दोन वर्षानंतर विकून टाकली. त्यानंतर अवघ्या 35 व्या वर्र्षी 1874 मध्ये दीड लाख रुपये भांडवल उभारून नागपूरला आणखी एक कापड गिरणी विकत घेतली. त्या कंपनीचे नाव ‘एम्प्रेस मिल’ असे ठेवले. 1887 मध्ये कुल्र्याची धरमसी मिल विकत घेऊन त्याचे नामकरण ‘स्वदेशी मिल’ असे केले. येथील कापड त्या काळी चीन, कोरिया, जपान येथे निर्यात केले जात असे. एक यशस्वी उद्योजक होण्याचे श्रेय त्यांनी वडिलांसोबत व्यतीत केलेल्या 9 वर्षांच्या अनुभवविश्वात आहे. व्यापारातील प्रत्यक्ष कार्यानुभव, बंॅकिंग पद्धती आणि बाजारातील खाचाखोचा त्यांनी नेमकेपणाने टिपल्या. याच काळात त्यांना सामाजिक भानही आले. पूर्ण सचोटीने उद्योग आणि व्यापार करता येतो, हे त्यांनी दाखवून दिले. नंतर मात्र त्यांनी मागे वळून पाहिले नाही. कामगारहिताच्या अनेक गोष्टी त्यांनी आपल्या कारखान्यात सुरू केल्या. यामध्ये कारखान्यातील स्वच्छ व रमणीय परिसर, उत्पादकतेला पोषक असे वातावरण, आठ तासांचा दिवस, सहा दिवसांचा आठवडा, जास्त कामाचे वेतन (ओव्हरटाइम), पेन्शन फंड, अपघातग्रस्त व्यक्तीस नुकसान भरपाई, बोनस, ग्रॅच्युईटी, वैद्यकीय सुविधा, गुणवंत कामगार पुरस्कार अशा अनेक नावीन्यपूर्ण संकल्पना यशस्वी करून आपल्या आदर्श कृतीतून एक नवी दिशा त्यांनी जगभरातील उद्योगांना दिली. कारखान्याच्या आवारात लहान मुलांसाठी पाळणाघर या नावीन्यपूर्ण कल्पनेचे जनकत्व टाटा उद्योगाकडे जाते. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर भारत सरकारने या सुविधांचा समावेश असलेले अनेक कायदे केले. एखादे औद्योगिक शहर कसे उभारावे, याविषयी आपला मुलगा दोराबजी याला लिहिलेल्या पत्रत ते म्हणतात, ‘मोठाले रस्ते असावेत, या रस्त्यांलगत सावली देणारे वृक्ष असावेत, जागोजागी हिरवळ असलेल्या बागा असाव्यात. फुटबॉल, हॉकी अशा खेळांसाठी विस्तीर्ण राखीव जागा ठेवाव्यात. मंदिरे, मशिदी आणि चर्च यांकरिता मोकळ्या जागा राखून ठेवाव्यात.’ या त्यांच्या विचारांमधून सामान्य नागरिकांना कोणकोणत्या सुविधा द्यायला हव्यात, याची सुस्पष्ट कल्पना दिसते.
तरुणपणी इंग्लंड, अमेरिका, युरोप आणि जगातील अनेक देशांना भेटी दिल्याने त्यांचे अनुभवविश्व अतिशय समृद्ध झाले. ‘केल्याने देशाटन’ या उक्तीवर त्यांची अढळ श्रद्धा होती. भारतीयांना पारतंत्र्याच्या जोखडातून बाहेर काढायचे असेल तर स्वत: उद्योगांची निर्मिर्ती करणो आणि त्यामधून स्वावलंबी होणो, हा एकमेव मार्ग त्यांना स्पष्ट दिसू लागला. 1868पासून सुरू झालेली ही उद्योगयात्र त्यांच्या अखेरपर्यंत एखाद्या झंझावातासारखी होती. आपल्या आयुष्यात चार मोठी उद्दिष्टे त्यांनी ठरविली होती. स्टील कंपनीची उभारणी, राष्ट्रीय पातळीवरील विज्ञान-शिक्षण संस्था, वीज निर्मिर्ती आणि जागतिक दर्जाचे हॉटेल बांधणो ही त्यांच्या आयुष्यातील मोठी स्वप्ने होती, त्यासाठी ‘टाटा सन्स’ची उभारणी त्यांनी 1887मध्ये केली. त्यांच्या हयातीत ही सगळीच स्वप्ने खरी झाल्याचे पाहणो त्यांच्या नशिबी नव्हते. त्यांच्या वारसदारांनी त्यांच्या या स्वप्नांना केवळ मूर्त स्वरूप दिले नाही तर त्यांची जणू कायमस्वरूपी शिल्पं उभारली. या स्वप्नांनी त्यांना अक्षरश: झपाटले होते. ते सतत या गोष्टींचा विचार करीत असत आणि त्या दृष्टीने जगभरातील तज्ज्ञ शोधून काढत आणि त्यांच्या क्षमतांचा पुरेपूर वापर करून घेत, त्यासाठी योग्य मोबदला ते पात्र व्यक्तींना देत असत. स्टील कंपनीचा व्यवसाय शिकून घेण्यासाठी ते स्वत: अमेरिका आणि युरोपमध्ये फिरले आणि पोलाद कसे तयार करतात, हे शिकून घेतले. त्यांनी पोलाद क्षेत्रतील जगातील सर्वोत्कृष्ट अभियंते आणि तज्ज्ञ यांना एकत्र आणले. स्टील तयार करणारी कंपनी उभारण्यासाठी लागणारी योग्य जागा शोधण्यासाठी त्या काळी त्यांनी केलेला आटापिटा मुळातूनच वाचावा असा आहे. पहिल्या महायुद्धाच्या वेळी म्हणजे 1911-12 मध्ये टाटा स्टील कंपनी तेव्हाच्या बिहारमध्ये (जमशेदपूर किंवा आजचे टाटानगर) कार्यरत झाली. 19क्9मध्ये बंगलोर येथे ‘इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ सायन्स’ची स्थापना झाली. या संस्थेसाठी जमशेटजींनी आपल्या कमाईचा 25 टक्के इतका हिस्सा राखून ठेवला होता. भारतीय तरुणांमध्ये विज्ञान विषयाचे प्रेम वाढीस लागावे आणि त्यांनी भारताला विज्ञान-तंत्रज्ञानात स्वयंपूर्ण होण्यासाठी अथक संशोधन करावे, ही दूरदृष्टी त्यामागे होती. मुंबईतील कुलाबा येथील गेट-वे ऑफ इंडिया समोर ‘ताजमहाल हॉटेल’ ही भव्य वास्तू 19क्3मध्ये सर्वांसाठी खुली करण्यात आली. आज सुमारे अकराशे कोटींहून अधिक मूल्य असलेल्या या हॉटेलसाठी तेव्हा 42क् लाख रुपये इतका खर्च आला होता. हे हॉटेल बांधताना आंतरराष्ट्रीय गुणवत्तेच्या सर्वोत्कृष्ट गोष्टी त्यांनी वेगवेगळय़ा देशांतून आवर्जून मागविल्या होत्या. विजेची सुविधा असलेले हे त्या काळातील एकमेव हॉटेल होते. केवळ भारतीय म्हणून एका परदेशी हॉटेलमध्ये त्यांना प्रवेश नाकारला गेला होता. परकीयांची मक्तेदारी, मुजोर वागणूक आणि वर्णभेदाला टाटांनी दिलेले ‘ताज’ हे चोख प्रत्युत्तर होते. टाटा पॉवर ही वीजनिर्मिर्ती करणारी खासगी कंपनी 191क्मध्ये खोपोली येथे कार्यरत झाली.
जमशेटजी टाटा यांचे इंडियन नॅशनल कॉंग्रेसबरोबर जिव्हाळय़ाचे संबंध होते. दादाभाई नवरोजी, फिरोजशाह मेहता आणि दिनशा वाच्छा या विचारी नेत्यांचा त्यांच्यावर प्रभाव होता. ‘आर्थिक स्वयंपूर्णता असल्याविना मिळालेल्या राजकीय स्वातंत्र्याला काहीच अर्थ नाही’ या आपल्या विचारांशी ते ठाम होते म्हणूनच देशातील ग्रामीण भागात उद्योग निर्माण करण्यावर त्यांचा भर होता. ‘टाटा हे साहसाचे प्रतीक आहेत,’ हे महात्मा गांधींचे उद्गार टाटासंबंधी खूप काही सांगून जातात. टाटा समूहाने आजपर्यंत कापड, भारतीय रेल्वेसाठी इंजिने तयार करणो, विमानसेवा, वाहननिर्मिर्ती, सोडा अॅश प्रकल्प, घडय़ाळ निर्मिर्ती, ऑइल मिल, पुस्तक प्रकाशन, चहा उत्पादन, दूरसंचार सेवा, विमा, इन्फर्मेशन टेक्नॉलॉजी अशा अनेक व्यवसाय क्षेत्रत उत्तुंग भरारी घेतली. जमशेटजींनी घालून दिलेल्या मार्गदर्शक तत्त्वानुसार आजही हे उद्योग आपल्या सीमांचा विस्तार करीत आहेत.
‘भारतीय औद्योगिक क्रांतीचा पहिला शिल्पकार’ म्हणून जमशेटजी टाटा यांचे नाव देशाच्या इतिहासात अजरामर झाले आहे. 19 मे 19क्4 रोजी जर्मर्नीमधील ‘बाड नाऊहाइम’ येथे जमशेटजींची प्राणज्योत मालवली. त्यानंतर अवघ्या दोन महिन्यांतच 29 जुलै रोजी टाटा उद्योगसमूहाला जगात प्रचंड लौकिक यश देणारा एक तारा उदयाला येणार होता. ‘जे. आर. डी. टाटा’ यांच्या रूपात नियतीने आपल्या पाऊलखुणा काळाच्या गर्भात आधीच कोरून ठेवल्या होत्या.. टाटा कुटुंबातील एक ‘भारतरत्न’ जन्म घेणार होते..
(लेखक व्यवस्थापन सल्लागार आहेत.)